मुंबई : प्रतिनिधी : युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळांच्या यादीत छत्रपती शिवरायांच्या अलौकिक इतिहासाची साक्ष देणाऱ्या पन्हाळ्यासह राज्यातील ११ किल्ले व तामिळनाडूतील एक जिंजी किल्ला अशा १२ किल्ल्यांचा समावेश झाला आहे. या यादीत १२ किल्ल्यांचा सहभाग झाल्याने जगभरातील पर्यटक या किल्ल्यांना भेट देणार असल्याने राज्य सरकार, जिल्हा प्रशासनासह शिवप्रेमींची जबाबदारी वाढली आहे. (12 Forts in UNESCO list)
भारतातील मराठा लष्करी भूप्रदेशासाठी जागतिक वारसा नामांकनाचा प्रस्ताव राज्य शासनाच्या वतीने ‘युनेस्को’ला पाठवण्यात आला होता. छत्रपती शिवरायांच्या जाज्वल्य इतिहासाची साक्ष देणार्या राज्यातील पन्हाळा, रायगड, राजगड, प्रतापगड, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सुवर्णदुर्ग, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, खांदेरी तसेच तामिळनाडू राज्यातील जिंजी अशा १२ किल्ल्यांचा समावेश आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांनी विशेष प्रयत्न केले. सांस्कृतिक मंत्री अशिष शेलार यांनी युनोस्कोच्या कार्यालयाला भेट देऊन बारा किल्ल्यांच्या समावेशासाठी मुलाखत दिली. त्यामुळे हा दावा प्रबळ झाला. (12 Forts in UNESCO list)
जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेशासाठी नामांकनाच्या मूल्यांकनासाठी ‘युनेस्को’च्या शिष्टमंडळाने बारा किल्ल्यांची पाहणी केली होती. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण (एएसआय), महाराष्ट्र राज्य पुरातत्त्व विभाग, वन विभाग आणि स्थानिक प्रशासन यांच्या अधिकार्यांसह ‘युनेस्को’च्या पथकाने किल्ल्याची सखोल पाहणी करुन माहिती घेतली होती. (12 Forts in UNESCO list)
जागतिक वारसास्थळांच्या यादीत पन्हाळा किल्ल्याचा समावेश झाल्यानंतर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या प्रमुख उपस्थितीत पन्हाळा किल्ल्यावर आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी यडगे यांनी पन्हाळगडावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मंदिरातील शिवरायांच्या पुतळ्यास बाजीप्रभू देशपांडे आणि वीर शिवाजी काशिद यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. लेझीम व पथकासह भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. प्रमुख उपस्थित होते. तसेच उपविभागीय अधिकारी समीर शिंगटे, मुख्याधिकारी चेतन कुमार माळी, माजी नगराध्यक्ष आसिफ मोकाशी, अधिकारी, कर्मचारी व पन्हाळ्यावरील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये पन्हाळा किल्ल्याचे नाव समाविष्ट झाल्याबद्दल जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी प्रशासन व स्थानिक नागरिकांचे अभिनंदन करुन आता पन्हाळा व कोल्हापूरकरांची जबाबदारी वाढली असल्याचे प्रतिपादन केले.