Home » Blog » Zakir husain Vhatakar त्यांनी जवळ घेतलं, कडकडून मिठी मारली…

Zakir husain Vhatakar त्यांनी जवळ घेतलं, कडकडून मिठी मारली…

उस्तादांसाठी तबला बनवणारे व्हटकर यांची आठवण

by कुमार कांबळे
0 comments

कोल्हापूर : कुमार कांबळे : ‘गेल्याच ऑगस्टला त्यांची भेट झाली होती. त्यांनी जवळ घेतलं… कडकडून मिठी मारली…माझ्या डोक्यावरून हात फिरवला… एवढ्या वर्षांत असं कधीच घडलं नव्हतं. नियतीच्या मनात काय होतं माहीत नव्हतं. पण हृदय पिळवटून टाकणारी बातमी धडकली आणि या सगळ्या आठवणी दाटून आल्या.’ (Zakir husain Vhatakar )

झाकीर हुसेन यांच्यासाठी गेली अनेक वर्षे तबला बनवणारे कारागीर हरिदास व्हटकर यांच्या मनात उस्तादांविषयीच्या आठवणी दाटून आल्या. गेल्या ऑगस्टमध्येच ही भेट झाली होती. ती कदाचित पुन्हा होणार नाही म्हणून की काय? असे राहून राहून आता वाटतंय, असं सांगताना व्हटकर यांच्या मनातील घालमेल जाणवत होती. त्यांच्याशी फोनवरून संपर्क साधला असता त्यांनी उस्तादांविषयीच्या आठवणींना उजाळा दिला. (Zakir husain Vhatakar )

व्हटकर कुटुंबीय मूळचे मिरजेचे. हरिदास रामचंद्र व्हटकर यांचे आजोबा केरप्पा आणि वडील रामचंद्र यांच्या पावलावर पाऊल ठेवत ते या व्यवसायात आले. त्यांची तिसरी पिढी आता या व्यवसायात आहे. कमालीची प्रयोगशीलता जपणाऱ्या हरिदास यांना उस्ताद झाकीर हुसेन यांच्या भेटीची ओढ होती. एक ना एक दिवस त्यांची भेट होईलच, असे त्यांचे स्वप्न होते. आपल्या प्रयोगशीलतेला आणि कलेला वाव मिळावा त्यानिमित्ताने उस्ताद झाकीर हुसेन यांची भेट कधी ना कधी मुंबईत होईलच या आशेने त्यांनी आपले बस्तान मुंबईला हलवले. सध्या माहीम आणि कांजूरमार्ग येथे त्यांची दुकाने आहेत.(Zakir husain Vhatakar )

लवकरच त्यांच्या प्रतिभेची तबला क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी दखल घेतली. हरिदास यांचे काम उस्ताद झाकीर हुसेन यांच्यापर्यंत पोहोचले. त्यांची प्रतिभा आणि अप्रतिम कारागिरी पाहून प्रभावित झालेल्या उस्तादजींनी लगेचच हरिदास यांना तबला बनवायला सांगितला. आणि त्या दिवसांपासून हरिदास आणि उस्ताद झाकीर हुसेन यांचे नाते जुळले. वाद्यातील गुंतागुंतीचे विचार आणि वाद्याच्या सर्व पैलूंबद्दलच्या मोलाच्या टिप्सही अनेकदा उस्तादांनी त्यांना दिल्याचे ते कृतज्ञतापूर्वक सांगतात.

उस्तादजी आणि त्यांचे शिष्यगण यांच्यासाठी अगणित तबले बनविण्याचे भाग्य मला लाभल्याचे हरिदास सांगतात. ते म्हणाले, ‘पोट आणि उस्तादजींची भेट या ओढीने मी मुंबईत आलो. माझ्या कामाचे कौतुक उस्तादजीने केले. मला संधी दिली. वाद्यातले बारकावे वेळोवेळी सांगितले. मार्गदर्शन केले. त्याचे मोल शब्दांत करता येत नाही.’

उस्तादजींचा त्यांच्यावर मोठा लोभ होता. म्हणून त्यांनी व्हटकर यांना दोनवेळा अमेरिकेलाही बोलावून घेतले. तेथे त्यांच्यासाठी आणि त्यांच्या शिष्यांसाठी तबले बनवून दिले. २०१६ आणि २०१८ सालात या भेटी झाल्या. गेल्या ऑगस्ट २०२४ ची भेट मात्र अखेरची ठरली. ती भेट आणि त्या भेटीत जाणवलेला कमालीचा ओलावा मी विसरू शकत नाही, अशा भावनाही व्हटकर यांनी बोलून दाखवल्या.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00