सूर्यमालेतील मंगळ या ग्रहाबद्दल मानवाला नेहमीच कुतुहल वाटत आले आहे. मंगळावर पाणी असेल का, हा त्यातील सर्वात महत्त्वाचा आणि कुतुहलाचा भाग. तेथे नक्की पाणी आहे की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही पण आतापर्यंत त्याचा शोध घेण्यासाठी भरपूर संशोधन झाले आहे आणि होतही आहे. मंगळावर पाणी होते का? किंवा आताही ते असेल का? पाण्याचे काही पुरावे असतील तर तेथे जीवसृष्टीही असू शकेल का? अशा एक नव्हे तर नानाविध प्रश्नांचे काहूर मानवाच्या मनात आहे. वैज्ञानिक या प्रश्नांच्या उत्तरांचा शोध घेण्यसाठी अविरत पयत्न करीत असतात.
आतापर्यंतच्या विविध संशोधनातून मंगळावर पाणी असल्याचे काही पुरावे पुढे आल्याचा खुलासा शास्त्रज्ञांनी केला आहे. भूतकाळातील पाण्याच्या भूगर्भीय पुराव्यांमध्ये पुरामुळे कोरलेल्या प्रचंड बहिर्वाह वाहिन्या, प्राचीन नदी-खोऱ्याचे जाळे, डेल्टा आणि लेकबेड यांचा समावेश आहे हे पाणी भूगर्भातील खडकांच्या भेगांमध्ये लपलेले असावे, असा कयास आहे. मंगळाच्या पृष्ठभागाखाली पाणी असेल तर त्यामुळे मंगळावर पृष्ठभागाखाली जीवसृष्टी असण्याची शक्यताही निर्माण होते, असेही काही वैज्ञानिकांचे म्हणणे आहे.
मंगळाच्या दिशेने पहिले यशस्वी उड्डाण १४-१५ जुलै १९६५ रोजी नासाच्या मरिनर- ४ ने केले होते. १४ नोव्हेंबर १९७१ रोजी मरिनर- ९ यानाने मंगळाच्या कक्षेत प्रवेश केल्यावर दुसऱ्या ग्रहाची परिक्रमा करणारी ती पहिली स्पेस प्रोब बनली. भारतानेही मंगळयान मोहीम केली आहे . भारतीय अवकाश संशोधन संस्था अर्थात इस्रोने यशस्वी केलेल्या मोहिमेनुसार भारताचे मंगळयान आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावरून मंगळाच्या दिशेने ५ नोव्हेंबर २०१३ रोजी प्रक्षेपित केले गेले. यासाठी पीएसएलव्ही सी-२५ हे प्रक्षेपण अस्त्र वापरण्यात आले. साधारणतः २५ दिवस हे यान पृथ्वीच्या कक्षेत स्थिरावले आणि ३० नोव्हेंबरला हे यान पृथ्वीच्या कक्षेतून बाहेर पडून मंगळाकडे झेपावले आणि २४ सप्टेंबर रोजी हे यान मंगळाच्या कक्षेत स्थिरावले. भारतापूर्वी केवळ अमेरिका, सोव्हिएत युनियन आणि युरोपियन स्पेस एजन्सी (ESA) यांनी मंगळावर यशस्वीरीत्या संशोधन केले होते. सोव्हिएत युनियनने त्यांच्या मंगळ- 3 मोहिमेद्वारे मंगळावर पहिले यशस्वी सॉफ्ट लँडिंग केले. Bottom of Form
मंगळ हा सूर्यापासून चौथा ग्रह आहे. मंगळाचा पृष्ठभाग केशरी-लाल आहे, कारण तो लोह(III) ऑक्साईड धुळीने झाकलेला आहे, त्याला लाल ग्रह टोपणनावाने ओळखले जाते.