नागपूर : रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेमध्ये विदर्भाचा संघ तिसऱ्या विजेतेपदाच्या नजीक असून रविवारी संघाला विजेतेपदावर नाव कोरण्याची सुवर्णसंधी आहे. केरळविरुद्धच्या अंतिम सामन्यात शनिवारी चौथ्या दिवशी विदर्भाने दुसऱ्या डावाध्ये ४ बाद २४९ धावा केल्या. पहिल्या डावातील ३७ धावांच्या आघाडीमुळे विदर्भाकडे आता एकूण २८६ धावांची आघाडी आहे. हा सामना अनिर्णित राहिल्यास पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर विदर्भ विजेता ठरेल. केरळसमोर मात्र विजयासाठी अखेरच्या दिवशी सहा विकेट घेण्याबरोबरच विदर्भाचे लक्ष्य पार करण्याचे अशक्यप्राय आव्हान असेल. (Vidarbha Ranji)
व्हीसीए स्टेडियमवर सुरू असणाऱ्या या सामन्यामध्ये तिसऱ्या दिवशी केरळचा पहिला डाव ३४२ धावांत आटोपला. चौथ्या दिवशी, करुण नायरचे नाबाद शतक आणि दानिश मालेवारच्या अर्धशतकाच्या जोरावर विदर्भाने दुसऱ्या डावामध्ये अडीचशे धावांच्या आसपास मजल मारली. दिवसाच्या सुरुवातीच्या तीन षटकांमध्येच विदर्भाने दोन्ही सलामीवीर गमावले होते. त्यानंतर मात्र, मालेवार आणि करुण नायर यांनी तिसऱ्या विकेटसाठी १८२ धावांची भागीदारी रचली. पहिल्या डावामध्ये दीडशतक ठोकणाऱ्या मालेवारने दुसऱ्या डावात १६२ चेंडूंमध्ये ५ चौकारांसह ७३ धावा केल्या. (Vidarbha Ranji)
मालेवार बाद झाल्यानंतर करुणने यश राठोडसह संघाचे द्विशतक पूर्ण केले. राठोड २४ धावा करून परतला. त्यानंतर, करुण आणि कर्णधार अक्षय वाडकर यांनी दिवसाची उर्वरित षटके खेळून काढली. करुणने यंदाच्या रणजी मोसमातील चौथे शतक झळकावताना २८० चेंडूंमध्ये १० चौकार व २ षटकारांसह नाबाद १३२ धावांची खेळी केली. वाडकर ४ धावांवर खेळत होता. (Vidarbha Ranji)
संक्षिप्त धावफलक : विदर्भ – पहिला डाव ३७९ आणि दुसरा डाव ९० षटकांत ४ बाद २४९ (करुण नायर खेळत आहे १३२, दानिश मालेवार ७३, यश राठोड २४, एमडी निधीश १-३७, अक्षय चंद्रन १-२९) विरुद्ध केरळ – पहिला डाव १२५ षटकांत सर्वबाद ३४२.
हेही वाचा :