कोल्हापूर : प्रतिनिधी : सतेज चषक फुटबॉल स्पर्धेमध्ये वेताळमाळ तालीम मंडळाने बलाढ्य शिवाजी तरुण मंडळाचा टायब्रेकरमध्ये ४-२ अशा गोल फरकाने पराभव केला. ‘वेताळमाळ’ उपांत्य फेरीत दाखल झाला. पूर्णवेळेत सामना गोल शून्य बरोबरच होता. पाटाकडील तालीम मंडळ आयोजित ही स्पर्धा छत्रपती शाहू स्टेडियमच्या हिरवळीवर खेळवली जात आहे. (Vetalmal)
शिवाजी संघाला वेताळमाळ संघाने कडवी झुंज दिली. पूर्वार्धात दोन्ही संघांनी आघाडीसाठी प्रयत्न केले, पण अचूक समन्वयाअभावी गोल होऊ शकला नाही. मध्यंतरास गोल फलक कोरा होता.
उत्तरार्धात गोल नोंदवण्यासाठी दोन्ही संघांनी जोरदार चढाया केल्या. शिवाजी संघाकडून संकेत साळोखे, बसंत सिंग, सिद्धेश साळोखे, दर्शन पाटील, देवराज मंडलिक, खुर्शीद अली, इंद्रजीत चौगुले यांनी जोरदार प्रयत्न केले. ‘वेताळमाळ’कडून प्रणव कणसे, आकाश माळी, सर्वेश वाडकर, राहुल पाटील, थुलुंगा ब्रह्मा यांनी चांगल्या चढाया केल्या. (Vetalmal)
दोन्ही संघांकडून गोल होऊ शकला नाही. पूर्ण वेळेत सामना गोल शून्य बरोबरीत सुटल्यानंतर मुख्य पंचांनी टायब्रेकरचा निर्णय घेतला. त्यामध्ये वेताळमाळ तालीम मंडळाने बाजी मारली. त्यांच्या पार्थ मोहिते, प्रणव कणसे, संदीप पोवार, थुलुंगा ब्रह्मा यांनी गोल केले. शिवाजी संघाकडून सुयश हांडे आणि बसंत सिंग यांनी गोल केले. खुर्शीद अली, मयुरेश चौगुले यांचे फटके ‘वेताळमाळ’च्या गोलरक्षकाने रोखले. ‘वेताळमाळ’ने सामना ४-२ अशा फरकाने जिंकून उपांत्य फेरीत प्रवेश केला. (Vetalmal)
वेताळमाळ संघाचा विशाल कुरणे सामनावीर ठरला. ११ मार्च रोजी वेताळमाळ तालीम मंडळ आणि खंडोबा तालीम मंडळ यांच्या उपांत्य लढत होणार आहे.
हेही वाचा :
विराट, रोहितच्या निवृत्तीची चर्चा नाही