कोल्हापूर : प्रतिनिधी : आंतरराज्य टोळीकडून साथ चारचाकी आणि पाच दुचाकी अशी चोरलेली ६० लाख किमतीची वाहने पोलिसांनी जप्त केली. या गुन्ह्यात चोरट्यांचे महाराष्ट्र कर्नाटक कनेक्शन स्पष्ट झाले आहे. ही वाहने महाराष्ट्रातील विविध ठिकाणाहून चोरली जात. त्यानंतर ती कर्नाटकात विकण्यात येत होती. पोलिसांनी पाच संशयितांना अटक केली. त्यातील दोघे महाराष्ट्रातील तर तीन कर्नाटकातील आहेत. (Vehicle thieves Racket)
स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक चोरीला गेलेल्या वाहनांचा तपास करीत होते. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागातील पोलिस हवालदार राम कोळी आणि सुरेश पाटील यांना एक संशयित चोरीचा टेंपो घेऊन शिवाजी विद्यापीठ ते सरनोबतवाडी रस्त्यांवरील जलसंपदा कार्यालयाच्या गेटजवळ येणार असल्याची माहिती मिळाली. सापळा रचून नागेश हणमंत शिंदे (वय ३० रा. कोरोची, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) आणि त्याचा साथीदार संतोष बाबासो देटके (४० रा. तारळे, ता. पाटण, जि. सातारा) हे पिकअप टेंपो घेऊन जात असताना पोलिसांनी त्यांना अडवले. त्यांच्याकडे चौकशी केली असता टेंपो चोरीचा असल्याचे निदर्शनास आले. त्यासंदर्भात शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा झाला आहे.(Vehicle thieves Racket)
मुख्य सूत्रधार ताब्यात
नागेश शिंदे रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. पोलिसांनी त्यांच्याकडे कसून सुरू चौकशी केली. चौकशीत त्याने पाच मोटारसायकल आणि सहा चारचाकी वाहने चोरल्याची कबुली दिली. हे दोघे महाराष्ट्रातून वाहने चोरुन कर्नाटकात विक्री करत. कर्नाटकातील त्यांचे साथीदार मुस्तफा सुपे महमंद (वय ५०) आणि करीम शरीफ शेख (६४ रा. दोघे रा. टुमकूर, जि. बेंगलोर) यांना ताब्यात घेतले. महाराष्ट्र आणि कर्नाटक पोलिसांनी संयुक्त तपास करुन त्यांच्याकडून चोरीचे दोन टेंपो, दोन मारुती सुझुकी इको, एक बोलेरो पिकअप, एक ह्युंडाई वेरणा अशा सहा चारचाकी जप्त केल्या. त्यानंतर कोल्हापूर पोलिसांनी पुणे बंगलोर हायवेवर लक्ष्मीटेकडी येथे सापळा रचून इमामसोब रसूलसाब मुलनवार (वय ४५, रा. कुरटपेटी बेटगिरी, जि. गदग) याला ताब्यात घेऊन त्यांच्याकडून एक अशोक लेलँड कंपनीचा टेंपो जप्त केला.(Vehicle thieves Racket)
नागेश शिंदे आणि संतोष देटके महाराष्ट्रातून वाहने चोरुन कर्नाटकात मुस्तफा महंमद, करीम शेख आणि इमामसाब मुलनवार यांना विक्री करत असत. महंमद, शेख आणि मुलनवार हे तिघेही महाराष्ट्रातून चोरलेली वाहने कर्नाटकात विकत. चोरट्यांनी शिरोली एमआयडीसी, राजारामपुरी, जयसिंगपूर, कुरुंदवाड, शिरोळ, शहापूर इचलकरंजी, कुर्डुवाडी सोलापूर, शाहूपुरी, शिरोळ, कागल आणि गांधीनगर पोलिस हद्दीतून वाहने चोरली होती.
संशयित शिंदेच्या नावावर ९० गुन्हे
या गुन्ह्यातील संशयित नागेश शिंदे याच्यावर दुचाकी आणि चारचाकी वाहने चोरीचे ९० गुन्हे तर संतोष देटकेविरोधात चारचाकी वाहने चोरीचे सहा गुन्हे आहेत. करीम शेख याच्याकडे चोरीचे वाहने खरेदी केल्याप्रकरणी चार गुन्हे दाखल आहेत.
यांनी केला तपास
स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे, अतिष म्हेत्रे, पोलिस हवालदार रामचंद्र कोळी, सुरेश पाटील, महेश खोत, रुपेश माने, रोहित मर्दाने, विनोद कांबळे, संजय पडवळ, अमित सर्जे, संजय कुंभार, सुशील पाटील, राजेंद्र वरंडेकर तसेच सायबर पोलिस ठाण्याकडील सचिन बेंडखेळे, सुरेश बाबर, मीनाक्षी पाटील यांनी तपासात सहभाग होता.