Home » Blog » विलंबामुळे भाजपच्या गोटात अस्वस्थता

विलंबामुळे भाजपच्या गोटात अस्वस्थता

शिंदे यांची कथित नाराजी; शाह साधणार संवाद, भाजप-शिंदे यांच्यात दरी

by प्रतिनिधी
0 comments
Government Maharashtra file photo

मुंबईः महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले. त्यानंतर राज्यात तत्काळ सरकार स्थापन होईल, असा दावा केला जात होता; पण आता काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कथित नाराजीमुळे अद्याप सरकार स्थापन करता आले नाही. या पार्श्वभूमीवर भाजपच्या गोटातील हालचाली वाढल्या असून, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह लवकरच राज्यातील भाजप नेत्यांशी संवाद साधणार आहेत.

महाराष्ट्र विधानसभेत सत्ताधारी महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले. त्यात भाजपला सर्वाधिक १३२ जागा मिळाल्या, तर शिंदे यांच्या शिवसेनेला ५७ व अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला ४१ जागांवर समाधान मानावे लागले. यामुळे साहजिकच शिंदे यांच्या ताब्यातील मुख्यमंत्रिपद भाजपच्या दिशेने गेले. आता भाजपने या पदावर देवेंद्र फडणवीस यांची निवड केल्याची माहिती आहे. या घटनाक्रमामुळे शिंदे नाराज झाल्याची चर्चा आहे. त्यांच्या नाराजीमुळेच राज्यात अद्याप सरकार स्थापन झाले नसल्याची माहिती आहे. या पार्श्वभूमीवर भाजपच्या गोटातील हालचालींत मोठी वाढ झाली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, महायुती सरकार स्थापन करण्याचा तिढा अद्याप सुटला नसल्यामुळे भाजपच्या गोटात अस्वस्थता वाढली आहे. यामुळे आता दिल्लीतून चक्रे फिरवली जात आहेत. या प्रकरणी शाह लवकरच राज्यातील नेत्यांशी संवाद साधणार असल्याची माहिती आहे.

दुसरीकडे, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही आपल्या पक्षाच्या नवनिर्वाचित आमदारांची ऑनलाईन बैठक घेतली. त्यात सरकार स्थापनेपूर्वी व नंतर कोणती काळजी घ्यायची यासंबंधी मार्गदर्शन करण्यात आले. भाजप आमदारांची येत्या दोन किंवा तीन डिसेंबर रोजी गटनेता निवडण्यासाठी बैठक होणार असल्याचीही माहिती आहे. त्यानंतर पाच तारखेला नव्या सरकारचा शपथविधी होईल. या शपथविधीला सर्वच आमदारांना हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिंदे यांनी उपमुख्यमंत्रिपद स्वीकारण्याची तयारी दर्शवली असली तरी ते गृहमंत्रालयावर ठाम आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शाह यांच्याशी चर्चा होऊनही खात्यांबाबत महायुतीत खडाजंगी सुरू आहे. भाजपला गृह, महसूल, उच्च शिक्षण, कायदा, ऊर्जा, ग्रामीण विकास स्वत:कडे ठेवायचा आहे. त्यांनी शिवसेनेला आरोग्य, नगरविकास, सार्वजनिक बांधकाम, उद्योग देऊ केले आहेत, तर राष्ट्रवादी काँग्रेसने अजित गटाला अर्थ, नियोजन, सहकार, कृषी ही खाती देऊ केली आहेत.

वादाच्या पार्श्वभूमीवर भाजप विधिमंडळ पक्षाची बैठकही दोन दिवसांनी पुढे ढकलण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, १ डिसेंबरला होणारी बैठक आता तीन डिसेंबरला होणार आहे. या दिवशी दिल्लीतून दोन निरीक्षक मुंबईत येणार असून, आमदारांशी चर्चा करून ते मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्याची अधिकृत घोषणा करतील. संघाकडून हिरवा कंदील मिळाल्यानंतर मुख्यमंत्रिपदासाठी फडणवीस यांचे नाव निश्चित करण्यात आले आहे. ५ डिसेंबर रोजी दुपारी एक वाजता आझाद मैदान, मुंबई येथे शपथविधी होणार आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीचे प्रत्येकी एक उपमुख्यमंत्रीही शपथ घेणार आहेत.

गृहमंत्रिपदावरून पेच

शिंदे सरकारमध्ये उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे गृहखाते होते. त्यांना हे मंत्रिपद सोडायचे नाही. आम्हाला उपमुख्यमंत्रिपद मिळत असेल, तर गृहखातेही मिळायला हवे, असा शिंदे गटाचा युक्तिवाद आहे. शाह यांच्यासोबत झालेल्या बैठकीतही यावर तोडगा निघू शकला नाही. यापूर्वी गृहखाते फडणवीस यांच्याकडे होते. त्यामुळे फडणवीस कोणत्याही परिस्थितीत गृहमंत्रिपद सोडण्यास तयार नाहीत. या वादामुळे शाह यांच्या बैठकीत मंत्रिमंडळ स्थापनेवर कोणताही तोडगा निघू शकला नसल्याचे मानले जात आहे. गृहमंत्रिपद भाजप कधीही जाऊ देणार नाही, असेही जाणकारांचे मत आहे.

सर्व जिल्ह्यात जल्लोष करण्याचे आदेश

शपथविधीसाठी मुहूर्त काढण्यात आला आहे. या सोहळ्याची भाजपकडून जय्यत तयारी सुरू आहे. दरम्यान, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज भाजप आमदारांशी व्हीसीद्वारे संवाद साधला. बावनकुळे यांनी पाच डिसेंबर रोजी होणाऱ्या शपथविधीला उपस्थित राहण्याच्या आमदारांना सूचना दिल्या आहेत. भाजपच्या सर्व आमदारांना आपल्या जिल्ह्यात जल्लोष करण्याचे भाजप प्रदेशकडून आदेश देण्यात आले आहेत. शपथविधीसाठी प्रत्येक जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांना बोलावले जाणार आहे. सुरक्षेच्या दुष्टीने येणाऱ्या सर्वांना पास देण्यात येणार आहेत.

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00