Home » Blog » Uddhav Thackrey in Dharashiv: उद्धव ठाकरेंचा अतिवृष्टीग्रस्तांना दिलासा; शेतकऱ्यांशी संवाद

Uddhav Thackrey in Dharashiv: उद्धव ठाकरेंचा अतिवृष्टीग्रस्तांना दिलासा; शेतकऱ्यांशी संवाद

by प्रतिनिधी
0 comments
Uddhav Thackrey in Dharashiv

धाराशीव : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी (२५ सप्टेंबर) मराठवाड्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाचा दौरा केला. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या व्यथा त्यांनी ऐकल्या. (Uddhav Thackrey in Dharashiv)

कळंब तालुक्यातील इटकूर गावातील शिलाताई मोरे ह्यांच्या घरात पाणी शिरून नुकसान झाले आहे. त्या घराची त्यांनी पाहणी केली.

‘‘पाच-सात शेळ्या वाहून गेल्या, मुलांच्या वह्या-पुस्तकं वाहून गेली. शेती सगळी खरवडून गेली. काहीही राहिलं नाही,’’ अशी व्यथा एका महिलेने यावेळी उद्धव ठाकरे यांच्यासमोर बोलून दाखवली. येथील अनेक ग्रामस्थांची उद्धव ठाकरे यांनी भेट घेत त्यांच्याशी संवाद साधला, त्यांना दिलासा दिला.

बळीराजाच्या आनंद अस्मानी संकटानं हिरावून घेतलाय, तो आनंद पुन्हा मिळवून देण्यासाठी आम्ही बळीराजासोबत आहोत, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी अतिवृष्टीग्रस्तांना आश्वस्त केले. (Uddhav Thackrey in Dharashiv)

गेल्या काही दिवसांपासून परतीच्या पावसाने राज्यात धुमाकूळ घातला आहे. विशेषतः मराठवाड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे लाखो हेक्टर शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे ग्रामीण जीवन उद्ध्वस्त झाले आहे. अनेक घरांची पडझड झाली आहे. जीवित आणि वित्तहानी मोठ्या प्रमाणात झाली आहे. या पार्श्वभूमीवर सरकारमधील मंत्र्यांसह विरोधी पक्षाचे नेतेही अतिवृष्टीग्रस्त भागाचा दौरा करत आहेत.
दरम्यान, बुधवारी (२४ सप्टेंबर) मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून राज्यातील पूर परिस्थिती व शेतकऱ्यांच्या मागणीकडे लक्ष वेधले आहे. महाराष्ट्रात अतिवृष्टीने जो धुमाकूळ घातला आहे.कित्येक ठिकाणी जमीन पूर्णपणे खरवडून वाहून गेलेली आहे. मे महिन्याच्या मध्यात जो पाऊस सुरु झाला आहे, त्याने जवळजवळ उघडीप घेतलीच नाहीये. त्यामुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. राज्याची ग्रामीण  अर्थव्यवस्था पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे. त्यामुळे सरकारने कुठल्याही निकषांच्या चौकटी न लावता, सरसकट ओला दुष्काळ जाहीर करावा. एकरी किमान ३० हजार रुपये नुकसान भरपाई घोषित करा. त्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करावा आणि मदतीचे पॅकेज केंद्राकडून मिळवावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00