मुंबई; प्रतिनिधी : अंधेरी परिसरात एका रहिवाशी इमारतीच्या दहाव्या मजल्यावर पहाटेच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत तिघांचा होरपळून मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांमध्ये दोन ज्येष्ठ नागरिकांचा समावेश आहे. चंद्रप्रकाश सोनी (वय ७४), कांता सोनी (वय ७४), पेलूबेता (वय ४२)अशी मृतांची नावे आहेत.
अंधेरीतील लोखंडवाला परिसरातील रिया पॅलेस इमारतीला पहाटेच्या सुमारास आग लागली. ही इमारत १४ मजली असून इमारतीच्या १० व्या मजल्यावर आग लागली. या आगीत दोन ज्येष्ठ नागरिकांसोबत एका कर्मचाऱ्याचा होरपळून मृत्यू झाला आहे. या आगीचे कारण अद्याप समोर आलेले नाही; मात्र शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे.
आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान तत्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि आगीवर नियंत्रण मिळवले. कुलिंगचे काम सुरू केले आणि इमारतीच्या १०व्या मजल्यावरील रूममधील तिघांनाही उपचारासाठी तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मुंबईतील कूपर रुग्णालयात तिघांना दाखल करण्यात आले; मात्र रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच तिघांचा मृत्यू झाल्याचे जाहीर करण्यात आले.
मृताची मुले अमेरिकेत वास्तव्यास असून हे दाम्पत्य मुंबईत राहत होते. या वयोवृद्ध दाम्पत्यांसोबत एक नोकरसुद्धा राहत होता. मृतक नोकराचा श्वास गुदमरल्याने मृत्यू झाला आहे. त्याच्या अंगावर कोणत्याही जखमा नाहीत. मृतक दाम्पत्याचा बेड हा पूर्णपणे जळालेल्या अवस्थेत आढळून आला. घरात नेमकी आग कशी लागली याबाबतची माहिती समोर आलेली नाही. शेजारील व्यक्तींनी या दाम्पत्याच्या घरातून धूर येत असल्याचे पाहिले. त्यानंतर घराचा दरवाजा ठोठावला; मात्र कोणताही प्रतिसाद आला नाही. मग शेजाऱ्यांनी पोलिस आणि अग्निशमन दलाला याबाबत कळवले. अग्निशमन दल आणि पोलिसांनी घराचा दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर तिघांनाही तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र तिघांचाही मृत्यू झाला.