Home » Blog » महाराष्ट्रातील निकालाचे आकडे आश्चर्यकारक

महाराष्ट्रातील निकालाचे आकडे आश्चर्यकारक

राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांचे मत

by प्रतिनिधी
0 comments
Sharad Pawar Kolhapur

कोल्हापूर : प्रतिनिधी : महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत लागलेले निकाल आणि पक्षांना मिळालेली टक्केवारी याचा विचार करता ते अविश्वसनीय आणि आश्चर्यकारक आहेत, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले. (Sharad Pawar Kolhapur)

एका खासगी कार्यक्रमासाठी पवार शनिवारी कोल्हापुरात आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पवार यांनी या निवडणुकीत राजकीय पक्षांना मिळालेल्या मतांची टक्केवारी आणि मिळालेले यश याकडे आकडेवारीसह लक्ष वेधले.

ते म्हणाले, ८० लाख मते मिळालेल्या पक्षाचे १५ उमेदवार निवडून आले आहेत तर ७९ लाख मते मिळालेल्या पक्षाचे ५७ उमेदवार निवडून आले. त्यांना एक लाख मते कमी मिळाली आहेत. तरीही त्यांचे इतके उमेदवार निवडून आले. दुसरीकडे ५८ लाख मते मिळालेल्या पक्षाचे ४१ उमेदवार निवडून आले आणि  ७२ लाख मते घेतलेल्या पक्षाचे केवळ दहाच उमदेवार निवडून आले आहेत. हा सर्व प्रकार अविश्वसनीय आणि आश्चर्यकारक आहे.

राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर विरोधकांनी ईव्हीएमविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. पवार यांनीही सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. निवडणुकीनंतर महाराष्ट्रात एक उत्साहाचे वातावरण असते. मात्र तसे वातावरण आता दिसत नाही. छोट्या राज्यात विरोधी पक्ष सत्तेत आहे तर मोठ्या राज्यात भाजप आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. आम्ही इव्हीएमच्या खोलात गेलेलो नाही. जोपर्यंत विश्वासार्ह माहिती मिळत नाही तोपर्यंत त्यावर भाष्य करणे योग्य नाही. आम्हाला वातावरण अनुकूल होते. सभा जोरदार झाल्या, पण निकाल वेगळा लागला. प्रचाराची सभा बघूनच कोणता उमेदवार जिंकणार हे कळते. कोल्हापुरातही आमच्या उमेदवारांच्या सभा जोरदार झाल्या. पण त्यांचा पराभव झाला. भविष्यातील सर्व निवडणुका आघाडीच्या माध्यमातून एकत्रच लढणार आहोत. (Sharad Pawar Kolhapur)

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मिळालेल्या क्लीन चिटसंदर्भात प्रश्न विचारला असता, ‘मग त्यांचं काय? त्यांचा निकाल लागला आहे. त्याच्यावर आता काय भाष्य करायचं? ज्यांनी निर्णय घेतले त्यांनी एकदा लोकांसमोर स्वच्छ चित्र मांडावे, असे शरद पवार म्हणाले.

मोठ्या राज्यांत भाजप, छोट्या राज्यांत इतर पक्ष

महाराष्ट्राच्या निवडणुकाआधी चार राज्यांच्या निवडणुका झाल्या. हरियाणात मी स्वत: गेलो होते. तिथे भाजपची अवस्था अतिशय कठीण होती. पण तिथे भाजपा सत्तेवर आली. काश्मिरमध्ये निवडणूक झाली. तिथे फारूक अब्दुल्ल यांचा पक्ष आला. महाराष्ट्राची निवडणूक झाली. येथे भाजपला यश आले. झारखंडमध्ये मात्र त्यांचा पराभव झाला. म्हणजे मोठी राज्ये आहेत तिथे भाजप आणि छोटी राज्ये आहेत तिथे अन्य पक्ष सत्तेवर आले आहेत. कदाचित ते आम्ही एका ठिकाणी सत्तेत आहोत विरोधी पक्षही काही राज्यात सत्तेवर आले आहे, असे सांगून त्याचे समर्थन करू शकतात, अशी टीकाही पवार यांनी भाजपवर केली.

मारकडवाडीला जाणार

राज्यात निवडणूक प्रक्रिया होऊन गेली आहे. माळशिरस विधानसभा मतदारसंघातील मारकडवाडीतील लोकांनी मतपत्रिकेवर मतदान घेण्यासाठी आंदोलन सुरू केले आहे. पण प्रशासनाने त्याला विरोध दर्शविला. तेथे १४४ सारखे कलम लावले. त्याची गरजच काय? त्यामुळे गावातल्या लोकांचे म्हणणे काय आहे, हे जाणून घेण्यासाठी मी मारकडवाडीत जाणार आहे, असे  पवार यांनी सांगितले.

हेही वाचा :

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00