अँड . पृथ्वीराज नारायण कदम (कराड )
तंत्रज्ञानाच्या क्रांतीमुळे आपण एका नव्या म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (Artificial intelligence) पर्वात प्रवेश करीत आहोत. अलीकडेच सर्वोच्च न्यायालयात झालेल्या राष्ट्रीय न्यायिक संग्रहालय आणि अभिलेखाच्या उद्घाटन समारंभाच्या निमित्ताने निवृत्त सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या म्हणजेच ए. आय. ॲडव्होकेटशी संवाद साधला होता. ही न्यायालयीन प्रक्रियेत ए.आय.च्या प्रवेशाची चाहूल आहे. प्रलंबित खटल्यांचा निपटारा करण्यासाठी भविष्यात ए.आय.ची मदत घेतली जाऊ शकते. न्यायव्यवस्थेसोबतच प्रत्येक क्षेत्रात ए.आय. मुसंडी मारत आहे. कला, संगीत, ऑटोमोबाईल, शेती, आरोग्य, शिक्षण अशा विविध क्षेत्रांत ए.आय. वापरला जाऊ शकतो.
कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे मानवी चुका कमी करणे तसेच वेळ वाचवणे यासारखे असंख्य फायदे होणार आहेत. सध्या ए.आय.ने सर्वच क्षेत्रांत प्रवेशाला सुरुवात केली आहे. ए.आय.चा वापर करून गाणी तसेच व्हिडिओ तयार होऊ शकतात. काल्पनिक छायाचित्रे वास्तवासारखी तयार केली जाऊ शकतात. ए.आय. व्हिडिओमध्ये काल्पनिक पात्र हुबेहूब हवे त्या कलाकारासारखे तयार केले जाऊ शकते. संगीतकाराशिवाय म्युझिक आणि गीतकाराशिवाय गाणे ए.आय. लिहू शकते..
चित्रपटाच्या कथेपासून ते व्हिज्युअल इफेक्टसपर्यंत असे सर्व काही ए.आय. मानवी हस्तक्षेपाशिवाय तयार करू शकते. ए.आय.मुळे अनेक पुनरावृत्तीची कामे स्वयंचलित होतात. त्यातून अधिकचे श्रम आणि मनुष्यबळ वाचणार आहे. उद्योग, व्यवसाय आणि घरगुती कामांमध्येही याचा मोठा फायदा होत आहे. ए.आय.मुळे रोबोटिक्स, ऑटोमेटेड वाहने, स्मार्ट होम उपकरणे यासारख्या तंत्रज्ञानाने वेग घेतला आहे. मानवी जीवन आणखीनच सुलभ, सोपे, सुकर होणार आहे.
कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे जरी मानवी जीवनात सुलभता व तत्परता येणार असली प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात. या प्रणालीचे जसे फायदे आहेत तसेच त्याचे काही तोटेही दुर्लक्षित करता येणार नाहीत. ए.आय.च्या मानवी सहभागाशिवाय चालणाऱ्या स्वयंचलित प्रणालीमुळे अनेक क्षेत्रांत मनुष्यबळाची गरज कमी होऊन नोकऱ्या संपुष्टात येऊ शकतात. त्यामुळे बेरोजगारीसारखी समस्या आणखी फोफावू शकते. या प्रणालीसाठी मोठ्या प्रमाणात डेटा गोळा केला जातो, ज्यामुळे व्यक्तिगत माहितीचा गैरवापर होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे ए.आय. प्रणालीवर आपण अवलंबून राहिल्यास समाजात तांत्रिक परावलंबन होण्याची शक्यता निर्माण होणार आहे. शिवाय यामध्ये तांत्रिक बिघाड झाल्यास मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
ए.आय.चा वापर फसवणूक, बनावट व्हिडिओ तयार करणे (डीपफेक्स) आणि सायबर गुन्ह्यांसाठी होऊ शकतो, ज्यामुळे सायबर गुन्ह्याची संख्या वाढू शकते. या तंत्रज्ञानाने शैक्षणिक क्षेत्रात केलेले पदार्पण हे चिंतन करायला लावणारे आहे. चॅटजीपीटी सारखे ॲप वापरून शालेय विदयार्थी हवे ते मसुदे, निबंध, पत्रलेखन लिहून घेताना दिसत आहेत. हा संकेत यॊग्य नसून ए.आय.वर सतत अवलंबून राहिल्यास विद्यार्थ्यांच्या स्वयंपूर्णतेवर परिणाम होऊ शकतो, तसेच मुलांच्या सर्जनशीलतेवर याचा परिणाम होऊन कल्पनाशक्तीचा वापर कमी होणार आहे. त्यामुळे मुलांना स्वतःचा दृष्टिकोन विकसित करण्यात अडचण होणार आहे. त्यामुळे देशाची भावी पिढी सक्षम घडणार नाही. अशा परिस्थितीत मुलांचा शैक्षणिक पाया बिघडून शिक्षणाचे उद्दिष्टच धोक्यात येऊ शकते.
थोडक्यात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर योग्य ठिकाणी योग्य त्या प्रमाणात होणे गरजेचे आहे. ए.आय. वापरून केवळ सोशल मीडियावर विनोदी मिम्स, रिल्स बनवणे तरुणांसाठी फायदेशीर ठरणार नाही. याऐवजी आपण कृत्रिम बुद्धिमत्तेचा सकारात्मक उपयोग कृषी, प्रदूषण नियंत्रण, आरोग्य, पायाभूत सुविधा, शिक्षण यांसारख्या क्षेत्रांत करून मानवी जीवनात प्रवेश केलेल्या या ए.आय. युगाचे स्वागत करायला हवे.