मुंबई : मुंबईने रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेमध्ये शनिवारी तिसऱ्या दिवशीच मेघालयवर डावाने विजय नोंदवून बोनस गुण वसूल केला. या विजयासह गतविजेत्या मुंबईने ‘ग्रुप ए’च्या गुणतक्त्यात अग्रस्थानी झेप घेतली असून उपांत्यपूर्व फेरी गाठण्याचा मुंबईचा मार्ग जवळपास मोकळा झाला आहे. अन्य सामन्यात दिल्लीने रेल्वे संघावर डावाने मात केली. (Ranji Trophy)
मेघालयचा पहिला डाव अवघ्या ८६ धावांत संपवल्यानंतर मुंबईने ६७१ धावांवर डाव घोषित करून ५८५ धावांची महाकाय आघाडी घेतली होती. या आघाडीला प्रत्युत्तर देताना मेघालयचा दुसरा डाव शनिवारी १२९ धावांत संपुष्टात आला. दुसऱ्या डावात मुंबईकडून शार्दुल ठाकूर आणि तनुष कोटियन या दोघांनीही प्रत्येकी ४ विकेट घेतल्या. पहिल्या डावात हॅट्ट्रिकसह चार विकेट आणि एकूण सामन्यात ८ विकेट घेणारा शार्दुल सामनावीर ठरला. (Ranji Trophy)
एक डाव ४५६ धावांनी विजय नोंदवल्यामुळे मुंबईला बोनस गुणही मिळाला. त्यामुळे, ग्रुप एमध्ये त्यांनी २९ गुणांसह अग्रस्थान पटकावले. या ग्रुपमधील दुसऱ्या व तिसऱ्या स्थानी असणाऱ्या अनुक्रमे जम्मू व काश्मीर आणि बडोदा संघामध्ये सध्या सामना सुरू आहे. बडोद्याला विजयासाठी रविवारी अखेरच्या दिवशी ३०७ धावांची गरज आहे. सध्या जम्मू आणि काश्मीरचे २९, तर बडोद्याचे २७ गुण आहेत.या दोन्हीपैकी कोणताही संघ जिंकल्यास मुंबईचा संघ दुसऱ्या स्थानी कायम राहील. प्रत्येक गटातून पहिले दोन संघ उपांत्यपूर्व फेरी गाठणार असल्याने मुंबईचा उपांत्यपूर्व फेरीचा मार्ग जवळपास मोकळा झाला आहे. (Ranji Trophy)
‘ग्रुप डी’मध्ये दिल्लीने रेल्वेवर एक डाव १९ धावांनी मात केली. दिल्लीने पहिल्या डावामध्ये १३३ धावांची आघाडी घेतल्यानंतर रेल्वेचा दुसरा डाव ११४ धावांमध्ये संपवला. भारताचा अनुभवी फलंदाज विराट कोहली दिल्लीकडून खेळत असल्याने हा सामना बहुचर्चित ठरला होता. पहिल्या डावामध्ये कोहली केवळ ६ धावांवर बाद झाल्यामुळे दुसऱ्या डावात त्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा क्रिकेटप्रेमी बाळगून होते. तथापि, दिल्लीच्या डावाने विजयामुळे कोहलीला पुन्हा फलंदाजीची संधीच मिळाली नाही. साखळीतील सात सामन्यांअखेर दिल्लीचा संघ २ विजय व २१ गुणांसह गटात तिसऱ्या स्थानी राहिला. या गटामध्ये सौराष्ट्र व तमिळनाडू हे संघ प्रत्येकी २५ गुणांसह अनुक्रमे पहिल्या व दुसऱ्या स्थानी आहेत. त्यामुळे, हे दोन्ही संघ उपांत्यपूर्व फेरीत दाखल होणार असून दिल्लीचे आव्हान साखळीतच संपुष्टात आले. (Ranji Trophy)
हेही वाचा :
क्रीडा तरतुदींमध्ये ३५० कोटींची वाढ
भारत विश्वचषकाच्या अंतिम फेरीत
रणजी स्पर्धेत विराट कोहली फ्लॉप