लंडन : दक्षिण आफ्रिकेने आयसीसी ट्रॉफी उंचावण्याचे स्वप्न अखेर शनिवारी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचे (डब्ल्यूटीसी) विजेतेपद पटकावून पूर्ण केले. अंतिम सामन्यामध्ये चौथ्या दिवशीच्या पहिल्या सत्रातच आफ्रिकेने गतविजेत्या ऑस्ट्रेलियावर ५ विकेट राखून विजय मिळवला. आयसीसी स्पर्धांमध्ये वारंवार विजेतेपदानजीक पोहोचून पराभूत झाल्यामुळे पडलेला ‘चोकर्स’चा शिक्काही आफ्रिकेने या विजेतेपदासह पुसून काढला. (South Africa Champions)
विजयासाठी २८२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेने शुक्रवारी तिसऱ्या दिवसअखेर २ बाद २१३ धावा करून विजयाची पायाभरणी केली होती. शनिवारी एडन मारक्रम आणि तेंबा बावुमा यांनी आफ्रिकेचा पाठलाग सुरू ठेवला. तिसऱ्याच षटकात कमिन्सने बावुमाला बाद करून आफ्रिकेची तिसरी विकेट काढली. दुखापतग्रस्त असतानाही बावुमाने १३४ चेंडूंचा सामना करत ५ चौकारांसह ६६ धावांची झुंजार खेळी केली. स्टार्कने ट्रिस्टन स्टब्जचा केवळ ८ धावांवर त्रिफळा उडवला. शतकवीर मारक्रमने डेव्हिड बेडिंघमसोबत पाचव्या विकेटसाठी ३५ धावांची भागीदारी रचून संघाला विजयानजीक पोहोचवले. (South Africa Champions)
विजयासाठी सहा धावांची आवश्यकता असताना मारक्रम हेझलवूडच्या गोलंदाजीवर बाद झाला. मारक्रमने २०७ चेंडूंमध्ये १४ चौकारांसह १३६ धावा केल्या. त्यानंतर, बेडिंघम आणि व्हेरिन यांनी ८४ व्या षटकात आफ्रिकेच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. ऑस्ट्रेलियाकडून स्टार्कने सर्वाधिक ३ विकेट घेतल्या. दोन्ही डावांत प्रत्येकी एक विकेट आणि दुसऱ्या डावात महत्त्वपूर्ण शतकी खेळी करणारा मारक्रम सामनावीर ठरला. दक्षिण आफ्रिकेचे हे दुसरे आयसीसी विजेतेपद ठरले. यापूर्वी, १९९८ मध्ये त्यांनी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा जिंकली होती. त्याचबरोबर, कर्णधार बावुमाच्या नेतृत्वाखाली एकही कसोटी पराभव न पत्करण्याची परंपराही आफ्रिकेने कायम राखली. बावुमाने आतापर्यंत १० कसोटींमध्ये आफ्रिकेचे नेतृत्व केले असून त्यांपैकी ९ कसोटी आफ्रिकेने जिंकल्या आहेत, तर एक अनिर्णित राहिली आहे. (South Africa Champions)
धावफलक : ऑस्ट्रेलिया – पहिला डाव २१२ आणि दुसरा डाव २०७.
दक्षिण आफ्रिका – पहिला डाव १३८ आणि दुसरा डाव (२ बाद २१३ वरून पुढे) : एडन मारक्रम झे. हेड गो. हेझलवूड १३६, तेंबा बावुमा झे. केरी गो. कमिन्स ६६, ट्रिस्टन स्टब्ज त्रि. गो. स्टार्क ८, डेव्हिड बेडिंघम नाबाद २१, काइल व्हेरिन नाबाद ४, अवांतर १४, एकूण ८३.४ षटकांत ५ बाद २८२.
बाद क्रम – ३-२१७, ४-२४१, ५-२७६.
गोलंदाजी – मिचेल स्टार्क १४.४-१-६६-३, जोश हेझलवूड १९-२-५८-१, पॅट कमिन्स १७-०-५९-१, नॅथन लायन २६-४-६६-०, ब्यू वेबस्टर ५-०-१३-०, ट्रॅव्हिस हेड २-०-८-०.
हेही वाचा :
आर्या-अर्जुन यांना मिश्रमध्ये सुवर्ण
सुरुची सिंहचा सुवर्णनेम