जमीर काझी : मुंबई : अजितदादांच्या विमान दुर्घटनेला दोन महिने उलटूनही ब्लॅक बॉक्सचा अहवाल अद्याप आलेला नाही, सीआयडी चौकशीचा खुलासा नाही मग सत्य बाहेर कसे आणि केव्हा येणार? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी केला आहे. त्याचबरोबर भोंदू अशोक खरातकडून अजित दादाच्या फोटोसह काही नेत्यांच्या फोटोवर फुल्या का मारण्यात आल्या होत्या?, याचा तपास पोलिसांनी करण्याची गरज असल्याची मागणी त्यांनी केली.
पत्रकारांशी संवाद साधताना सत्तारूढ राष्ट्रवादीचे सरचिटणीस सूरज चव्हाण यांनी पक्षाला नुकसान पोहोचविण्यासाठी सुपारी दिल्याबाबतचा आरोप हा निव्वळ बालिशपणा आहे. त्यांना कोण अडचणीत आणत आहे, याचा शोध त्यांनी त्यांच्या मित्रपक्षात घ्यावा, असा टोलाही लगावला. (Why is there a cross marked over Ajit Dada’s photo)
ते म्हणाले, ‘विमान अपघाताबाबत रोहित पवार यांनी व्यक्त केलेल्या शंका रास्त आहेत. तपास यंत्रणांनी त्याचा गंभीरपणे विचार करणे गरजेचे आहे. अपघाताला दोन महिने उलटूनही लोकांच्या मनातील संशय कमी होण्याऐवजी वाढत आहे. सरकारला त्याबाबत गांभीर्य नाही हे स्पष्ट होते, असे सांगून शिंदे म्हणाले की, भोंदू अशोक खरात प्रकरणामध्ये काही मोठ्या नेत्यांच्या फोटोवर ‘फुल्या चर्चा आहेत, चौकशी झाली पाहिजे, अंधश्रद्धेविरोधी कायदा अधिक कडक करण्याची गरज आहे, तसेच धर्माच्या नावावर समाजात तेढ निर्माण करणारी वक्तव्ये टाळली पाहिजेत, अन्यथा समाजात तणाव वाढू शकतो. (Why is there a cross marked over Ajit Dada’s photo)
राष्ट्रवादीच्या एकीकरणाबाबत फुलस्टॉप
राष्ट्रवादी एकत्रीकरणाबाबत पूर्वी चर्चाच झाली नव्हती असे सांगणारे आता ती चर्चा झाली होती, हे मान्य करत आहेत. मात्र आम्ही एकत्रीकरणाबाबतचा विषय थांबवला असून सध्या आमचा पक्ष बळकट करण्यावर आमचा भर आहे. असे शशिकांत शिंदे यांनी स्पष्ट केले. (Why is there a cross marked over Ajit Dada’s photo)