जमीर काझी : मुंबई : महापालिका निवडणुकीमध्ये शिवसेनेचे मंत्री असलेल्या जिल्ह्यांमध्येच पक्षाची कामगिरी असमाधानकारक झाली आहे. त्यामुळे संबंधिताकडून कामाचा अहवाल मागविला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
राज्यातील २९ महापालिकांमध्ये एकूण २८६९ जागांसाठी १५,९०० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यापैकी सर्वाधिक म्हणजे १४२५ भाजपाचे नगरसेवक निवडून आले आहेत. तर दुसऱ्या क्रमांकावर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे ३९९ नगरसेवक निवडून आले आहेत. शिंदे यांच्या शिवसेनेची कामगिरी ठाणे, कल्याण डोंबिवली या महापालिकांमध्ये चांगली राहीली असली तरी मुंबईसह राज्यभरात कामगिरी असमाधानकारक आहे.
ठाण्यासह कल्याण डोंबिवलीत शिवसेनेला चांगले यश
राज्यात शिवसेनेचे ५५ आमदार आहेत. महापालिका निवडणुकीसाठी प्रत्येक जिल्ह्याची जबाबदारी संबंधित मंत्री आणि आमदारांवर सोपवली होती. ठाणे हा शिवसेनेचा (शिंदे) बालेकिल्ला आहे. त्यामुळे ठाण्यातील यश अपेक्षित होते. त्याचबरोबर कल्याण डोंबिवलीतही शिवसेनेची कामगिरी ही भाजपापेक्षा चांगली राहीली. असे असलेतरी इतर महापालिकांमध्ये शिवसेना पिछाडीवर गेल्याचं चित्र आहे. यामुळे शिंदे हे जबाबदारी दिलेल्या मंत्र्यांवर नाराज असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे, ज्या मंत्र्यांकडे महत्त्वाच्या महापालिकांची जबाबदारी सोपवण्यात आली होती, तिथेच पक्षाची कामगिरी अत्यंत सुमार राहिल्याचे निकालांतून स्पष्ट झाले. (Eknath Shinde will seek a report from the ministers)
या मंत्र्यांची सुमार कामगिरी
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याकडे जबाबदारी असलेल्या मुंबई महापालिकेत २२७ पैकी शिवसेनेला अवघ्या २९ जागांवर समाधान मानावं लागले. मंत्री प्रताप सरनाईक यांच्या मीरा-भाईंदर महापालिकेत ९५ पैकी फक्त ३ जागा वाट्याला आल्या. नाशिकमध्ये मंत्री दादा भुसे यांच्याकडं जबाबदारीवर असतानाही १२२ पैकी केवळ २६ जागांवर शिवसेनेला विजय मिळविता आला. तर छत्रपती संभाजीनगरमध्ये मंत्री संजय शिरसाट यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेला ११५ पैकी फक्त १३ जागा मिळाल्या आहेत.
अहवाल मागवून तंबी देणार
अपेक्षित यश मिळवू न शकलेल्या जिल्ह्यांतील मंत्र्यांच्या कामगिरीची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गंभीर दखल घेतल्याची माहिती आहे. निवडणुकीत पक्षाची कामगिरी सुमार ठरल्यानं जबाबदारी पार पाडण्यात अपयशी ठरलेल्या मंत्र्यांचा कामगिरी अहवाल मागवून तंबी देणार असल्याची माहिती आहे. महापालिका आणि नगरपालिका निवडणुकांमध्ये पक्ष काही ठिकाणी दुसऱ्या क्रमांकावर राहिला असला, तरी निवडणुकीत अपेक्षित यश साधता न आल्यानं नेतृत्व अस्वस्थ आहे. (Eknath Shinde will seek a report from the ministers)
मंत्र्यांच्या कामगिरीचा आढावा मागवला जाणार
महापालिका निवडणुकांपूर्वीच एकनाथ शिंदे यांनी मंत्र्यांना निवडणुकीत चांगली कामगिरी करण्याबाबत स्पष्ट इशारा दिला होता. जिल्हा परिषद, नगरपालिका आणि महापालिका निवडणुका या शिवसेनेच्या मंत्र्यांसाठी पक्षबांधणीच्या दृष्टीनं परीक्षा ठरणार असल्याचं पक्षांतर्गत स्पष्ट करण्यात आलं होतं. मात्र, या कसोटीत अपयशी ठरलेल्या मंत्र्यांच्या कामगिरीचा आढावा मागवला जाणार असल्याचं सूत्रानं सांगितलं आहे.
ही अंतर्गत बाब
जिल्हा परिषदेच्या निवडणुकांसाठी पक्षसंघटन बळकट करण्याची जबाबदारी सोपवण्यासाठी पुन्हा नव्यानं आढावा घेऊन नेत्यांची निवड केली जाणार आहे. याबाबत ईटीव्ही भारतशी बोलताना खासदार नरेश म्हस्के म्हणाले, “पक्ष संघटनेबाबतची भूमिका उपमुख्यमंत्री एकनाथ त्या नेत्यांकडे स्पष्ट करतील. ही अंतर्गत बाब आहे. याबाबत जो विचार करायचा, तो शिंदे साहेब करतील. पण, मंत्रिमंडळातील भाकरी फिरवण्याबाबतची माहिती मला नाही. माझा मंत्रिमंडळाशी कोणताही संबंध नाही. त्याबाबत मी बोलणं उचित ठरणार नाही.”
एकंदरीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनंतर शिवसेनेत मोठ्या फेरबदलांची चाहूल लागली आहे. महापालिका निवडणुकीत समाधानकारक कामगिरी न झाल्यानंतर मंत्रिमंडळातही भाकरी फिरवली जाणार का? याकडंही सर्वांचं लक्ष लागलं आहे. (Eknath Shinde will seek a report from the ministers)