गोकर्ण : येथील घनदाट जंगलात एक रशियन महिला तिच्या दोन मुलांसह सापडली. ती या ठिकाणी कशी पोहोचली याचे कोडे अद्याप कर्नाटक पोलिसांना उलगडलेले नाही. गस्तीवर असताना या पोलीस पथकाला गुहेसमोर कपडे सुकत टाकल्याचे दिसून आले. पोलिसांनी अत्यंत आश्चर्यकारकपणे आणि तितक्याच सावधगिरीने पावले टाकली. (Russia woman found in cave)
तेथे शोध घेतला असताना ही महिला दोन मुलींसह दिसून आली. नीना कुटीना ऊर्फ मोही अशी तिने आपली ओळख सांगितली. ती बिझनेस व्हिसावर भारतात आली. या व्हिसाची मुदत २०१७ मध्येच संपली आहे. ती गोव्यामार्गे गोकर्ण येथे पोहोचली. या तिघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले असून, सध्या तिला एका आश्रमात ठेवण्यात आले आहे, असे एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.
किर्रर्र झाडीने वेढलेल्या जंगलाच्या मध्यभागी ती मुलींसह गेल्या दोन आठवड्यांपासून पूर्णपणे एकांतवासात राहत होती. (Russia woman found in cave)
या नैसर्गिक गुहेतच तिने एक साधे घर बनवले होते. तिथे मोहीने रुद्र मूर्ती ठेवून निसर्गाच्या सान्निध्यात आध्यात्मिक शांती मिळविण्यासाठी ‘पूजा’ आणि ध्यानात दिवस घालवले. तिच्यासोबत तिच्या मुलींशिवाय अन्य कोणीही नसल्याचे पोलिसांना आढळले आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
शुक्रवारी (११ जुलै) या भागात भूस्खलन झाले होते. यानंतर नियमित गस्त घालत असताना, सर्कल पोलिस निरीक्षक श्रीधर आणि त्यांच्या पथकाला या गुहेबाहेर कपडे सुकत टाकलेले दिसले.
उत्सुकतेपोटी आणि सावधगिरी बाळगून, अधिकाऱ्यांनी रामतीर्थ टेकडीच्या दाट झुडपांमधून मार्ग काढला. त्यावेळी त्यांना मोही आणि तिची दोन मुले गुहेत सापडली. (Russia woman found in cave)
उत्तर कन्नडचे पोलिस अधीक्षक एम. नारायण यांनी शनिवारी (१२ जुलै) पीटीआयशी बोलताना सांगितले की, “आमच्या गस्ती पथकाला रामतीर्थ टेकडीच्या गुहेबाहेर कपडे सुकत टाकल्याचे दिसून आले. जेव्हा त्यांनी शोध घेतला तेव्हा त्यांना मोही आणि तिची मुले दिसून आली.”
ते म्हणाले, “ती आणि तिची मुले जंगलात कशी जिवंत राहिली आणि त्यांनी काय खाल्ले याचे आश्चर्यच आहे. सुदैवाने, जंगलात असताना तिच्या किंवा मुलांबाबात काहीही अनुचित घडले नाही.” ही महिला गोव्याहून गुहेत पोहोचली असावी, असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला.
तिच्या व्हिसाची मुदत २०१७ मध्ये संपली होती. ती भारतात किती काळ राहत आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही, असेही ते म्हणाले.
श्री नारायण पुढे म्हणाले, ‘‘आम्ही साध्वी चालवत असलेल्या आश्रमात तिची राहण्याची व्यवस्था केली आहे. आम्ही तिला गोकर्णहून बेंगळुरूला घेऊन जाण्याची आणि हद्दपारीची प्रक्रिया सुरू केली आहे.’’ एका स्थानिक स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने, रशियन दूतावासाशी संपर्क साधण्यात आला आणि तिला हद्दपार करण्यासाठी औपचारिकता सुरू करण्यात आली आहे.
हेही वाचा :
अंतराळ माणूस पाठवण्यासाठी ‘गगनयान’च्या इंजिनची यशस्वी चाचणी
शाळकरी मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न आणि…