अहमदाबाद : रॉयल चॅलेंज बेंगळुरू संघाने इंडियन प्रीमियर लीग टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या विजेतेपदाचा चषक उंचावताना अनेक विक्रमांवरही नाव कोरले. २००८च्या पहिल्या आयपीएल मोसमात कोलकाता नाइट रायडर्सविरुद्ध पहिला सामना खेळल्यापासून तब्बल ६,२५५ दिवसांनी बेंगळुरूने आयपीएलचे विजेतेपद पटकावले. यादरम्यान, बेंगळुरूने आयपीएल आणि चॅम्पियन्स लीग मिळून एकूण २८६ सामने जिंकले. बेंगळुरू व त्याच्या खेळाडूंनी नोंदवलेल्या अन्य काही विक्रमांवर टाकलेला हा दृष्टिक्षेप. (RCB Records)
८ – आयपीएल विजेतेपद पटकावणारा बेंगळुरू रॉयल चॅलेंजर्स हा एकूण आठवा संघ ठरला. आयपीएलच्या पहिल्या मोसमापासून स्पर्धेत असणाऱ्या केवळ पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स या संघांना अद्याप आयपीएल विजेतेपद पटकावता आलेले नाही.
१ – आयपीएलच्या दोन अंतिम सामन्यांमध्ये सामनावीराचा पुरस्कार पटकावणारा कृणाल पंड्या हा पहिलाच खेळाडू ठरला. मंगळवारी बेंगळुरूतर्फे खेळताना सामनावीर ठरलेल्या कृणालने यापूर्वी, २०१७च्या मोसमात मुंबई इंडियन्सकडून अंतिम सामना खेळतानाही सामनावीराचा पुरस्कार पटकावला होता.
४ – कर्णधार म्हणून पहिल्याच मोसमात आयपीएलचे विजेतेपद जिंकणारा बेंगळुरूचा रजत पाटिदार हा चौथा कर्णधार ठरला. यापूर्वी, शेन वॉर्नने राजस्थानतर्फे २००८मध्ये, रोहित शर्माने मुंबईतर्फे २०१३मध्ये आणि हार्दिक पंड्याने गुजराततर्फे २०२२मध्ये पहिल्या प्रयत्नात आयपीएल चषक उंचावला होता.
४–० कृणाल पंड्याने आतापर्यंत चार आयपीएल अंतिम सामने खेळले असून हे चारही सामने त्याच्या संघाने जिंकले आहेत. यापूर्वी, कृणालने २०१७, २०१९ आणि २०२० च्या मोसमात मुंबई इंडियन्सतर्फे आयपीएलचे अंतिम सामने खेळले होते. कृणालपेक्षा अधिक आयपीएल विजय केवळ रोहितच्या नावावर असून त्याने आतापर्यंत खेळलेल्या सर्व ६ आयपीएल अंतिम सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे.
७७१ – विराट कोहलीने या सामन्यात ३ चौकार लगावून आयपीएलमध्ये सर्वाधिक चौकार मारण्याचा विक्रम स्वत:च्या नावे केला. त्याने ७६८ चौकार लगावणाऱ्या शिखर धवनला मागे टाकले. विराटच्या नावावर आता ७७१ चौकार आहेत.
हेही वाचा :
सूर्यकुमार ठरला ‘मौल्यवान’ खेळाडू
आरसीबी आयपीएल चॅम्पियन्स