नागपूर : प्रतिनिधी : पक्षापेक्षा मंत्र्यांना इतर कामे जास्त असतील तर बदल करावा लागेल. त्यांना आपली जागा मोकळी करावी लागेल, असा दम उप मुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वक्षीय मंत्र्यांना दिला. नागपूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिंतन शिबिरात ते बोलत होते. या शिबिराला राष्ट्रवादीचे मंत्री, खासदार, आमदारांसह वरिष्ठ नेते उपस्थित होते. (Nationalist Chintan Shibir)
राष्ट्रवादीच्या चितंन शिबिराचे उद्घाटन सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास ध्वजवंदनाने झाले. यावेळी पक्षाचे काही मंत्री, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित नव्हते. यावर अजित पवारांनी आपल्या भाषणात नाराजी व्यक्त करत पक्षाच्या मंत्री, नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी वेळ पाळलीच पाहिजे, अशी सूचना केली. (Nationalist Chintan Shibir)
अजित पवार म्हणाले “आपल्या पक्षाच्या वतीने आयोजित राष्ट्रवादी चिंतन शिबिरात तुम्हा सर्वांचे मी सर्वप्रथम स्वागत करतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून आज माझं मन खूप भरून आलं आहे. या सभागृहात आपले जवळपास पाचशे वरिष्ठ पदाधिकारी, नेते, सहकारी उपस्थित आहेत. मी आजूबाजूला पाहतो तेव्हा मला गर्दी दिसत नाही, मला माझे कुटुंब दिसते. तुमच्या प्रत्येकाच्या पाठीशी लाखो लोक उभे आहेत, आणि तुम्हा सर्वांच्या उपस्थितीमुळे मला नव्या उमेदीने, नव्या आशेने पुढे जाण्याची ताकद मिळते.” असे म्हणत आपल्या भावना व्यक्त केल्या. (Nationalist Chintan Shibir)
खासदार प्रफुल्ल पटेल यांनी भाषणात पक्षाचे काही पालकमंत्री राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेत नसल्याचे सांगून नाराजी व्यक्त केली. तसेच काही पालकमंत्री सहलीला आल्यासारखे जिल्ह्यात येतात याकडे लक्ष वेधले. प्रफुल्ल पटेल यांच्या टीकेचा सूर लक्षात घेऊन अजित पवारांनी पक्षापेक्षा मंत्र्यांना इतर काम जास्त असतील तर बदल करावा लागेल, असा सज्जड दम दिला. तसेच ज्यांना ज्या जिल्ह्याचे पालकमंत्रिपद मिळाले त्यांना त्या जिल्ह्यात जावेच लागेल. लोकांमध्ये फिरून काम करावी लागतील, काहीजण फक्त झेंडावंदनला जाऊन दिखावा करतात, अशा कानपिचक्यादेखील त्यांनी मंत्र्यांच्या दिल्या. यावेळी अजित पवार म्हणाले की, “याआधी कार्यकर्त्यांनी इतर पक्षात काम केले असेल, पण शिव-शाहू विचारधारा घेऊन आपण पुढे जात आहोत. मी मराठा जातीत जन्माला आलो असलो तरी सर्व समाजाच्या विकासाची जबाबदारी माझी तसेच आपली आहे. आपला पक्ष कुठल्या एका जातीचा, धर्माचा नाही,” असे ते म्हणाले. (Nationalist Chintan Shibir)
“आपण भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीच्या सरकारमध्ये आहोत. अनेक लोकं मला विचारतात की आपण हे पाऊल का टाकले? वैयक्तिक नात्यांच्यामध्ये वेदना आपण का स्वीकारल्या? पण मनापासून सांगतो, ही सत्ता किंवा पदांच्यासाठी उचलेले पाऊल नव्हते. महाराष्ट्राला प्रगती, स्थिरता आणि ठोस निर्णयाची गरज आहे. यासाठी हा मार्ग स्वीकारला,” असे म्हणत अजित पवार यांनी शरद पवारांची राष्ट्रवादी सोडून भाजप – शिवसेना शिंदे गटासोबत जाण्याचे कारण सांगितले. (Nationalist Chintan Shibir)