मुंबई : प्रतिनिधी : मतदानाच्यादिवशी दुबार, तिबार मतदार करणारे आले तर तिथेच फोडून काढा, असे आवाहन मनसेप्रमुख राज ठाकरे, आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले. मतदार यादीचे घोळाचे पुरावे घेऊन न्यायालयाचे दरवाजे ठोठावणार असल्याचेही ठाकरे बंधूंनी सांगितले.
सदोष मतदार याद्या करुन निवडणूक घ्या या मागणीसाठी महाविकास आघाडी, मनसे आणि विरोधी पक्षांनी मुंबईत विराट मोर्चा काढला. मोर्चात मुंबई, ठाणे, पालघरमधील विरोधी पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. त्यानंतर झालेल्या जाहीर सभेत ठाकरे बंधूंनी मतदार याद्यातील घोळाचे पुरावे देत निवडणूक आयोगाला इशारेही दिले. (Thackeray brothers’ appeal)
राज ठाकरे यांनी मुंबईतील सहा लोकसभा मतदार संघ, ठाणे, नवी मुंबईतील लोकसभा मतदार संघातील दुबार मतदारांची आकडेवारी सांगून पुरावेही दाखवले. दुबार मतदार असल्याचे भाजप, शिवसेना शिंदे गटाचे लोकही मान्य करत आहे. मतदार याद्या स्वच्छ करा आणि त्यानंतर निवडणूक घ्या, अशी मागणी त्यांनी केली. कार्यकर्त्यांनी मतदार याद्यांवर जोरात काम करावे. चेहरे कळालेच पाहिजेत. तीच माणसे मतदान करताना दिसली पाहिजेत. जर दुबार, तिबार मतदारवाले आले, तर तिथे फोडून काढायचे, बडव, बडव बडवायचे आणि त्यानंतर पोलिसांच्या ताब्यात द्यायचे. त्याशिवाय ते वठणीवर येणार नाहीत, असा इशाराही ठाकरे यांनी दिला. (Thackeray brothers’ appeal)
उद्धव ठाकरे यांनी मतचोर जिकडे दिसतील तिकडे त्याला फटकावलेच पाहिजे असे सांगून लोकशाही मार्गाने फटकावा. आम्हाला कायदा हातात घ्यायचा नाही. पण कायद्याचा खोटा दंडुका जर तुम्ही आमच्या डोक्यावर मारणार असाल तर त्यासंबधी निर्णय घ्यायला महाराष्ट्राची जनता सक्षम आहे. मतचोरीचे पुरावे घेऊन न्यायालयात जाणार असल्याचेही ठाकरेंनी स्पष्ट केले.
मतचोरीचे खूप पुरावे आपल्याकडे आहेत. हे सर्व पुरावे घेऊन लवकरच न्यायालयात जाणार आहोत. तिथे न्याय मिळण्याची अपेक्षा आहे. मात्र, यापुढे मतचोर दिसेल त्याला तिथेच लोकशाहीच्या मार्गाने ठोका, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले. तसेच मतचोरी केलीत तर ही जनतेची वज्रमूठ तुमच्या टाळण्यात हाणल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. (Thackeray brothers’ appeal)