मुंबई : विशेष प्रतिनिधी : मुंबईवरील दहशतवादी २६/११ च्या हल्लाप्रकरणी भाजप प्रवक्ते माधव भंडारी यांनी केलेल्या वक्तव्याचा समाचार घेत भंडारीचीच पोलिसांनी चौकशी केली पाहिजे, असा पलटवार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सोमवारी (२१ एप्रिल) केला.
सपकाळ म्हणाले, ‘‘ या प्रकरणातला आरोपी डेव्हिड कोलमन हेडली अद्याप फरार आहे. तहव्वूर राणाचे प्रत्यार्पण करून त्याला मुंबईत आणले आहे. भंडारीनीं केलेले वक्तव्य गंभीर असल्यामुळे त्यांनाही ताब्यात घेऊन त्यांची राणासोबत चौकशी करावी. त्यांच्या वक्तव्यानुसार त्यावेळी सरकारमध्ये असलेले अनेक नेते आज भाजपामध्ये आहेत. अजित पवारांसह अनेकजण त्यावेळीही आणि आताही मंत्रिमंडळात आहेत. त्यामुळे पवारांना मंत्रिपदावरून बरखास्त करून त्यांचीही चौकशी करावी. कायम राष्ट्रहिताच्या गप्पा मारणारे भाजपचे नेते किती खरे बोलतात ते समोर येईल. त्यामुळे भाजपाने ते किती खरे बोलतात हे समोर येईल, असा टोला त्यांनी लगावला.
मुंबईतील दहशतवादी हल्ल्यात काँग्रेस-राष्ट्रवादीचा हात होता, असा गंभीर आरोप माधव भंडारी यांनी केला होता. त्याला सपकाळ यांनी प्रत्युत्तर दिले.
‘जलजीवन’मध्ये भ्रष्टाचारामुळे माता-भगिनींचे बळी
दरम्यान, राज्यातील पाणीटंचाईवरून सपकाळ यांनी केंद्र आणि राज्य सरकारचा खरपूस समाचार घेतला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठा गाजावाजा करून जलजीवन मिशनची घोषणा करून २०२४ पर्यंत देशातील प्रत्येक घरात नळाद्वारे स्वच्छ पिण्याचे पाणी मिळेल असे सांगितले होते. मात्र २०२५ उजाडले तरी महाराष्ट्र तहानलेलाच आहे. हंडाभर पाण्यासाठी माता भगिनींना पायपीट आणि संघर्ष करावा लागत आहे. या योजनेतील भ्रष्टाचार माता भगिनींचे बळी घेत आहे, असा हल्लाबोलही त्यांनी केला.
यवतमाळ जिल्ह्यातील एक मुलगी पाणी आणण्यासाठी जात असताना तिचा मृत्यू झाला. नाशिक जिल्ह्यातील महिलांना हंडाभर पाण्यासाठी जीव धोक्यात घालून विहिरीत उतरावे लागते, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
राज्यातील पाणीटंचाईवरून सपकाळ यांनी केंद्र आणि राज्य सरकारचा खरपूस समाचार घेतला ते म्हणाले की, राजा उदार झाला आणि हाती भोपळा दिला, अशी सरकारची स्थिती आहे. घोषणा मोठमोठ्या होतात प्रत्यक्षात अंमलबजावणी होत नाही, हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. हर घर नल आणि हर नल जल असे नरेंद्र मोदी सातत्याने सांगत होते. यासाठी केंद्र व राज्य सरकारने जलजीवन मिशन योजना सुरु केली, पण केंद्रीय अर्थमंत्रालयानेच भ्रष्टाचार झाल्याचे मान्य करून एका नळाचा खर्च ३० हजारावरून १ लाख ३७ हजारांवर कसा गेला याचे स्पष्टीकरण मागवले आहे.
हिंदीच्या सक्तीमागे मोठे षडयंत्र
पहिलीपासून हिंदी सक्तीबाबत सपकाळ म्हणाले की, हे एक मोठे षडयंत्र असून मराठी भाषा आणि मराठी संस्कृती संपवण्यासाठीच हिंदी लादली जात आहे. शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याची मराठी भाषा संपवण्याचा हा डाव आहे. सरसंघचालक गोळवलकर यांच्या ‘बंच ॲाफ थॅाट्स’ या पुस्तकात जे लिहिले त्याची अंमलबजावणी सरकारकडून सुरु आहे. हिंदीची सक्ती अगोदर गुजरातमध्ये करावी, अशी मागणीही त्यांनी केली. संग्राम थोपटे यांनी काँग्रेस सोडल्याबाबत ते म्हणाले की, त्यांचे नाव विधानसभा अध्यक्षपदासाठी काँग्रेस पक्षाने निश्चित केले. पण देवेंद्र फडणवीसांनी त्यावेळी विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होऊ दिली नाही. त्यामुळे त्यांची संधी हुकली होती. ज्यांनी विश्वासघात केला, थोपटे त्यांच्याकडेच जात आहेत.
हेही वाचा :