मुंबई : आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सतर्फे सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज बनलेल्या जसप्रीत बुमराहने लसिथ मलिंगा हाच आपल्यापेक्षा सरस असल्याचे मत मांडले. लखनौ सुपरजायंट्सविरुद्धच्या सामन्यात बुमराहने २२ धावांत ४ विकेट घेतल्यानंतर त्याच्या नावावर आयपीएलमध्ये एकूण १७४ विकेट झाल्या. त्याने १७० विकेट घेणाऱ्या मलिंगाला मागे टाकून मुंबईतर्फे आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत अग्रस्थान पटकावले. (Bumrah on Malinga)
बुमराहने १३९ सामन्यांमध्ये २२.३८ च्या सरासरीने १७४ विकेट घेतल्या आहेत. त्यामध्ये तीनवेळा चार विकेट, तर दोनदा पाच विकेटचा समावेश आहे. मलिंगाने २००९ ते २०१९ या मोसमांत मुंबईकडून १२२ आयपीएल सामने खेळताना १९.७९ च्या सरासरीने १७० विकेट घेतल्या होत्या. मलिंगा मुंबईचा प्रमुख गोलंदाज असतानाच बुमराहने २०१३ मध्ये संघात पदार्पण केले होते. २०१३, २०१५, १०१७ आणि २०१९ या चार मोसमांमध्ये मुंबईला आयपीएलचे विजेतेपद मिळवून देण्यात या दोघांचाही महत्त्वाचा सहभाग होता. (Bumrah on Malinga)
रविवारी मुंबईने लखनौविरुद्धचा सामना ५४ धावांनी जिंकल्यानंतर बुमराह डगआउटमध्ये सध्या मुंबईचा गोलंदाजी प्रशिक्षक असणाऱ्या मलिंगाला भेटला. त्यावेळी प्रसारमाध्यमांनी मलिंगाला मागे टाकल्याबद्दल बुमराहची प्रतिक्रिया मागितली. त्यावर ‘मलिंगा हा अद्यापही सरस गोलंदाज आहे,’ असे बुमराह म्हणाला. त्यावर मलिंगानेही ‘बुमराह हा सर्वोत्तम गोलंदाज आहे,’ अशी प्रतिक्रिया दिली. या सामन्यानंतर मुंबईच्या ड्रेसिंग रुममध्ये झालेल्या सोहळ्यात ट्रेंट बोल्टने बुमराहला सर्वोत्तम गोलंदाजाची ट्रॉफी दिली. यावेळी मनोगत व्यक्त करताना बुमराहने ‘आपण आत्मसंतुष्ट न होता, ही घोडदौड अशीच सुरू ठेवावी,’ असे सांगितले. (Bumrah on Malinga)
रोहित शर्माने यावेळी सर्वोत्कृष्ट फलंदाजाचे पारितोषिक रायन रिकलटन आणि सूर्यकुमार यादव यांना प्रदान केले. लखनौविरुद्ध रिकलटनने ५८, तर सूर्यकुमारने ५४ धावांची खेळी केली होती. मुंबईने लखनौला पराभूत करताना यंदाच्या आयपीएलमधील सलग पाचवा विजय नोंदवला. सध्या मुंबईचा संघ १० सामन्यांअखेर १२ गुणांसह गुणतक्त्यात तिसऱ्या स्थानी आहे. मुंबईचा पुढील सामना १ मे रोजी राजस्थान रॉयल्सविरुद्ध जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर होणार आहे.
हेही वाचा :
एकाच मैदानावर कोहलीची सर्वाधिक अर्धशतके
वैभव सूर्यवंशीला सेहवागचा कडक सल्ला