मुंबई : प्रतिनिधी : राज्यातील पायाभूत सुविधा विकास, शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी आणि पर्यावरण व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यासाठी ‘मित्र’ आणि बायसॅग-एन यांच्यात झालेला सामंजस्य करार महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या सामंजस्य करारामुळे महाराष्ट्राच्या सर्वांगीण आणि तंत्रज्ञानाधिष्ठित विकासाला चालना मिळेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. (Memorandum of Understanding between MITRA and BISAG-N. MITRA)
वर्षा निवासस्थान येथे मित्र (महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मेशन) आणि बायसॅग-एन (भास्कराचार्य नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर स्पेस अप्लिकेशन अन्ड जिओ इन्फॉर्मेशन ) यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. याप्रसंगी माजी सहकार मंत्री आमदार दिलीप वळसे पाटील, मित्र संस्थेचे उपाध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर, मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव लोकेश चंद्रा, मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव श्रीकर परदेशी, मित्र – महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन) चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी, बायसॅग-एन महासंचालक डॉ. टी. पी. सिंह, मित्र चे वरिष्ठ सल्लागार डॉ. विराज लोलियाना, संशोधन अधिकारी सुमीरन बलसेकर, दिपंकर होवाळ, संकेत निंबाळकर, प्राजक्ता माळी तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते. (Memorandum of Understanding between MITRA and BISAG-N. MITRA)
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, या प्रकल्पाच्या माध्यमातून स्थानिक वैशिष्ट्यांसह, भौगोलिक, ऐतिहासिक वैशिष्ट्ये एकत्र केली जाणार आहेत. भू-स्थानिक माहितीचे व्यवस्थापन व विश्लेषण करण्यासाठी विविध स्रोतांमधून आणि विविध स्वरूपांतील माहिती संकलित करून तिचे सखोल विश्लेषण व निरीक्षण केले जाणार आहे. या माहितीच्या आधारे शासकीय योजना, विविध प्रकल्प आणि कार्यक्रमांचे संनियंत्रण, मूल्यमापन व अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे करता येईल. यामुळे लाभार्यांची निवड अधिक अचूक पद्धतीने करता येणे शक्य होणार आहे. तसेच वस्तुनिष्ठ व सखोल विश्लेषणाच्या माध्यमातून सामाजिक-आर्थिक समतोल राखत शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यास मदत होईल. (Memorandum of Understanding between MITRA and BISAG-N. MITRA)