बेंगळुरू : भाषेवरून लोकभावना दुखावल्या गेल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करा, अशी सूचना कर्नाटक उच्च न्यायालयाने अभिनेते कमल हासन यांना केली. तसेच तुम्हीच निर्माण केलेल्या परिस्थितीमुळे तुम्ही पुन्हा संरक्षण मागताय, असेही फटकारले. (K’taka HC nudges Kamal Haasan)
त्यांचा ‘ठग लाईफ’ हा चित्रपट ५ जून रोजी प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाच्या ऑडिओ रिलीज दरम्यान कन्नड भाषेच्या उत्पत्तीबद्दल त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर कमल हासन यांच्या ‘राजकमल फिल्म व्हेंचर्स’ने याचिका दाखल केली आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी पोलिस संरक्षण मिळावे, अशी मागणी यात करण्यात आली आहे.
त्यावर सुनावणी करताना कर्नाटक उच्च न्यायालयाच्या एकल न्यायाधीशांच्या खंडपीठाने कमल हासन यांना दिलगिरी व्यक्त करण्याची सूचना केली. कन्नड कार्यकर्ते आणि संस्कृती मंत्री शिवराज तंगडागी यांनी कमल हासन यांनी माफी मागावी, अशी मागणी करणारी याचिकाही दाखल केली आहे. (K’taka HC nudges Kamal Haasan)
उच्च न्यायालयाचा सल्ला अभिनेता-निर्मात्यासमोर ठेवण्यासाठी निर्मिती संस्थेच्या वकिलांनी वेळ मागितला. त्यानंतर याचिकेची सुनावणी दुपारच्या सत्रात करण्यात आली.
कमल हासनचे वकील म्हणाले…
याचिकाकर्त्याचे प्रतिनिधित्व करणारे वरिष्ठ वकील चिनप्पा यांनी हासन यांच्या विधानाबाबत आणि ते माफी मागेल का याबद्दल खंडपीठाने अनेक प्रश्न उपस्थित केले. चिनप्पा म्हणाले, “स्पष्टपणे सांगायचे तर चित्रपटाचे प्रदर्शन थांबवता येत नाही… केएफसीसी किंवा कर्नाटक सरकारही ते थांबवू शकत नाही. कमल हासन यांचा कन्नडविरुद्ध काहीतरी बोलण्याचा हेतू नव्हता. कन्नड चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार श्री शिव राजकुमार प्रेक्षकांमध्ये उपस्थित होते. त्यांनी त्यांच्या (कमल हासन) विधानाचे स्वागत केले आहे.” याकडे त्यांनी लक्ष वेधले. (K’taka HC nudges Kamal Haasan)
कमल हासन यांनी नंतर दिलेले उत्तर (न्यायालयात सादर केलेले) हे माफीनामा नव्हते हे लक्षात घेऊन खंडपीठाने निरीक्षण नोंदवले की, ‘‘कोणत्याही नागरिकाला जनतेच्या भावना दुखावण्याचा अधिकार नाही. लोक तीन गोष्टींबद्दल खूप भावनिक आहेत – पाणी, जमीन आणि भाषा… भाषिक आधारावर राज्यांची निर्मिती झाली आहे. सार्वजनिक क्षेत्रातील एखाद्या व्यक्तीने असे विधान केले तर त्यामुळे काय घडले? तर अशांतता आणि असंतोष. कर्नाटकच्या लोकांनी काय मागितले होते- तर माफी. ती तुम्ही मागा, दिलगिरी व्यक्त करा. तुम्हीच निर्माण केलेल्या परिस्थितीमुळे उलट तुम्हीच पोलिस संरक्षण मागण्यासाठी या न्यायालयासमोर आला आहात.’’
हेही वाचा :
गिरीश महाजन दलाल : राऊतांची टीका