किंग्जस्टन : वेस्ट इंडिजच्या कसोटी संघाचा नवा कर्णधार म्हणून अष्टपैलू रॉस्टन चेसच्या नावाची शनिवारी घोषणा करण्यात आली. पुढील महिन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध मायदेशी खेळल्या जाणाऱ्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेपासून चेस विंडीजच्या कर्णधारपदाची सूत्रे हाती घेईल. याचबरोबर उपकर्णधार म्हणून डावखुरा फिरकीपटू जोमेल वॉरिकनची निवड करण्यात आली. (Roston Chase)
या वर्षी मार्च महिन्यात सलामीवीर क्रेग ब्रेथवेट हा विंडीज कसोटी संघाच्या कर्णधारपदावरून पायउतार झाला होता. त्यानंतर सुमारे दोन महिन्यांनी वेस्ट इंडिज क्रिकेट संघटनेने (डब्ल्यूआयसीबी) नवा कसोटी कर्णधार जाहीर केला आहे. विशेष म्हणजे, ३३ वर्षीय चेस मागील दोन वर्षांहून अधिक काळ आंतरराष्ट्रीय कसोटी खेळलेला नाही. तो अखेरचा कसोटी सामना मार्च २०२३ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला होता. उजवा फलंदाज आणि ऑफस्पिनर असणाऱ्या चेसने कारकिर्दीत ४९ कसोटींत ५ शतके व ११ अर्धशतकांसह २,२६५ धावा केल्या आहेत. त्याचबरोबर त्याच्या नावावर ८५ विकेटही जमा आहेत. नवा उपकर्णधार जोमेल वॉरिकनने आजवर १९ कसोटींमध्ये ७३ विकेट घेतल्या आहेत. या वर्षाच्या सुरुवातीस पाकिस्तानविरुद्ध २ कसोटींच्या मालिकेत ३२ वर्षीय वॉरिकनने १९ विकेट घेऊन मालिकावीराचा पुरस्कार पटकावला होता. त्याच्या या कामगिरीमुळे विंडीजला ही मालिका १-१ अशी बरोबरीत सोडवता आली होती. (Roston Chase)
सध्याच्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेमध्ये (डब्ल्यूटीसी) विंडीजची कामगिरी निराशाजनक राहिली. या चक्रामध्ये विंडीजने खेळलेल्या १३ कसोटी सामन्यांत केवळ ३ विजय मिळवता आल्यामुळे गुणतक्त्यात त्यांचा संघ आठव्या स्थानी राहिला. नव्या डब्ल्यूटीसीमध्ये विंडीजचा संघ सलामीची मालिका २५ जूनपासून ऑस्ट्रेलियाविरुद्ध मायदेशात खेळणार आहे. त्यानंतर, ऑक्टोबरमध्ये विंडीज दोन कसोटींच्या मालिकेसाठी भारताचा दौरा करणार आहे. (Roston Chase)
हेही वाचा :
डब्ल्यूटीसी विजेत्या संघाचे बक्षीस जाहीर