इटावा (उत्तर प्रदेश) : भागवत कथावाचन करणाऱ्या यादव समाजातील एका कथावाचकाला ब्राह्मण समाजाचे प्राबल्य असणाऱ्या गावात नाक घासून माफी मागायला लावण्यात आले. तसेच त्याचे मुंडन करून त्याला एका महिलेचे पाय धरायला लावले. शिवाय त्याच्यावर मूत्रही टाकण्यात आले. याबाबतचा एक व्हिडीओ समाजमाध्यमांत प्रचंड व्हायरल झाला आहे. (Bhagwat Narrator beaten)
या घटनेने उत्तर प्रदेशमधील इटावामध्ये संतापाची लाट उसळली आहे. या घटनेला कारणीभूत असलेल्यांना तत्काळ अटक करण्याची मागणी समाजवादी पक्षाचे खासदार जितेंद्र दोहरे यांनी केली आहे.
ही घटना बकेवर पोलीस ठाण्याच्या दादरपूर गावातील आहे. यादव नाव असल्याचे सांगितल्यावर मारहाण केल्याचे संत यादव या भागवत कथावाचकाने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. यासंबंधीचा व्हीडीओही मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. यामध्ये काही गावगुंड या कथावाचकाचे डोके भादरताना आणि त्यांना मारहाण करताना तसेच नाक घासून माफी मागायला लावत असल्याचे दिसते. (Bhagwat Narrator beaten)
कथावाचक मुकुट मणी सिंह यादव इटावातील सिव्हिल लाइनमध्ये राहतात. ते मूळचे कानपूरचे आहेत. त्यांचे दोन सहकारी संत सिंह यादव आणि श्याम कठेरिया इटावातीलच बकेवर येथील आहेत. मुकुट मणी सिंहने दिलेल्या माहितीनुसार, ते भागवत कथा सांगतात. २१ ते २७ जूनअखेर त्यांना कथावाचनासाठी दादरपूरमध्ये आमंत्रित केले होते. तेथीलच पाठक बाबा या व्यक्तीच्या माध्यमातून पप्पू बाबा या व्यक्तीने हा कार्यक्रम ठेवला होता.
कथावाचकांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, कथावाचनाच्या पहिल्या दिवशी संध्याकाळी जेवण करताना पप्पू बाबाने त्यांची जात विचारली. त्यावर त्यांनी आपण यादव असल्याचे सांगितले. त्यावर त्यांनी संतापून त्यांनी तू दलित असल्याचा आरोप केला. त्याचवेळी काही तरुणांनी त्यांना गराडा घातला. ब्राह्मणांच्या गावात भागवत सांगायची तुझी हिम्मत कशी झाली, असे विचारत पप्पू बाबा संतापून त्यांच्या अंगावर गेले. गावगुंडांनी त्यांना खेचत आणले. या झटापटीत त्यांचे कपडे फाटले.
गावगुंडांनी त्याला लाखोली वाहिली. त्यांच्यापैकीच कुणीतरी ट्रिमर आणला. मुकुट मणी सिंह यादव यांची शेंडी कापली. त्यानंतर मुंडन केले. पप्पू बाबाबरोबर अतुल, डीलर, मनीष यांच्यासह ५० जणांनी शिवीगाळ केली. लाथाबुक्क्या आणि चपलांनी मारहाण केली. त्यानंतर महिलेच्या पायावर नाक घासायला लावले. त्यानंतर गावगुंडांनी त्यांचे सहकारी संत सिंहसोबतही असेच वर्तन केले, मुंडन केले आणि हार्मोनियमही तोडून टाकले. (Bhagwat Narrator beaten)
ही घटना समजताच इटावाचे समाजवादी पक्षाचे खासदार जितेंद्र दोहरे यांनी सपा कार्यकर्त्यांसह पोलिस अधीक्षक ब्रिजेश कुमार श्रीवास्तव यांची भेट घेतली. घटनेला कारणीभूत असलेल्या सर्व आरोपींवर कडक कारवाईची मागणी केली. श्रीवास्तव यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन बकेवर ठाण्याच्या अंमलदाराला सर्वांविरोधात एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले. दोषींना लवकरच अटक करण्यात येईल, त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दिले.