नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर हे मंगळवारी पुन्हा इंग्लंडला रवाना होणार आहेत. मागील आठवड्यात गंभीर कौटुंबिक कारणांमुळे तातडीने इंग्लंड दौऱ्यातून भारतात आले होते. भारत-इंग्लंड कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यापूर्वी ते संघासोबत रुजू होतील. (Gambhir)
गंभीर यांच्या मातोश्रींना हृदयविकाराचा झटका आल्यामुळे ते मायदेशी परतल्याचे आता स्पष्ट करण्यात आले आहे. कसोटी मालिकेपूर्वी भारत आणि भारत अ यांच्यामध्ये बेकेनहॅम येथे झालेल्या तीनदिवसीय सराव सामन्यासाठी गंभीर अनुपस्थित होते. त्यांच्या अनुपस्थितीत सहायक प्रशिक्षक रायन टेन डॉएश्ट, सितांशू कोटक आणि मॉर्ने मॉर्केल यांनी संघाला मार्गदर्शन केले. गंभीर यांच्या मातोश्रींची प्रकृती आता स्थिर असल्यामुळे त्यांनी इंग्लंडला रवाना होण्याचा निर्णय घेतला आहे. भारत-इंग्लंड यांच्यातील पहिली कसोटी लीड्स येथील हेडिंग्ले स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. (Gambhir)
दरम्यान, इंग्लंडमधील खेळपट्ट्या फिरकी गोलंदाजीस अनुकूल दिसत असून आगामी मालिकेत फिरकी गोलंदाज महत्त्वाची भूमिका बजावतील, असे फिरकीपटू कुलदीप यादवने सांगितले. भारताचा कसोटीतील प्रमुख फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनच्या निवृत्तीनंतर भारतीय संघाचा हा पहिलाच परदेश दौरा आहे. त्यामुळे, भारतीय फिरकीची मदार प्रामुख्याने रवींद्र जडेजा आणि कुलदीप यादव या फिरकी गोलंदाजांवर आहे. त्यांच्या साथीला वॉशिंग्टन सुंदर आहे. त्या पार्श्वभूमीवर कुलदीपने हे मत व्यक्त केले. येथील खेळपट्ट्यांवर सुरुवातीचे दोन दिवस वेगवान गोलंदाजीस पूरक असतील. त्यानंतर मात्र फिरकी गोलंदाजांना खेळपट्टीकडून साथ मिळेल, असे कुलदीप म्हणाला. (Gambhir)
हेही वाचा :
आर्या-अर्जुन यांना मिश्रमध्ये सुवर्ण