डॉ. व्ही.एन. शिंदे
ग्लोबल वॉर्मिंगवर स्वीडनमधील सोळा वर्षांची तरुणी ग्रेटा थनबर्ग जगातील राष्ट्रप्रमुखांना सुनावते, “सारे काही चुकीचे घडत आहे. मी इथे असायला नको होते. मी सागराच्या पल्याड असणाऱ्या माझ्या शाळेत असायला हवे होते. तुम्ही सर्वांनी आमची स्वप्ने, बालपण आणि आनंद चोरला आहे. तुमचे शब्द पोकळ आहेत. लोक दुःखाने त्रस्त आहेत. ते मरत आहेत. पूर्ण जैवसाखळी, पर्यावरण कोलमडत चालले आहे. तरीही तुम्ही सर्वजण पैशाचा आणि आर्थिक विकासाचा विचार करत आहात. हे करायचे तुमचे धाडस कसे झाले? पुढच्या पिढीच्या हे लक्षात येत आहे. आमचे डोळे तुमच्यावर रोखलेले आहेत. जर तुम्ही आम्हाला अयशस्वी करण्यासाठी प्रयत्न करणार असाल तर आम्ही तुम्हाला कधीच माफ करणार नाही.” तिचं हे वक्तव्य वाचताना ग्रेटाच्या अपेक्षांप्रमाणे काम करणारी एक ११४ वर्षांची तरुणी आठवायची.
ती म्हणजे सालूमर्दा थिमक्का!
‘सालूमर्दा’ हे तिचे टोपण नाव. तिचे खरे नाव आहे, आलदा मरादा थिमक्का. १९११ मध्ये कर्नाटक राज्यातील गुबी तालुक्यातील एका गावात तिचा जन्म झाला. घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची. तिची आई विजयम्मा आणि वडील चिकरंगय्या हे मजुरीचे काम करायचे. थिमक्का शाळेत गेलीच नाही. सुरुवातीला जनावरांना चारा आणणे, त्यांना पाणी पाजणे ही कामे तिच्यावर सोपवली गेली. दहा वर्षांची होताच, तीही गावाजवळच्या खाणीवर काम करू लागली. त्या काळातील रीतीप्रमाणे तिचे वयाच्या अठराव्या वर्षी जवळच्याच हुलीकल गावातील बिकला चिकय्या यांच्याशी लग्न झाले. तिचे सासरही गरीब होते. मोलमजूरी करून जगत होते. (Saalumarada Thimmakka No More)
लग्नानंतर ती पतीबरोबर कामाला जाऊ लागली. अनेक वर्षे गरिबीतही सुखाचा संसार करणाऱ्या थिमक्का यांच्या संसारवेलीवर फुले काही फुलली नाहीत. आपल्याला मूलबाळ नाही, याची अंतर्मनात सल होती. त्यावरून आजूबाजूचे लोक नावे ठेवायचे. वयाच्या चाळीसाव्या वर्षापर्यंत मूल होण्याची वाट पाहिली. शेवटी ही पोकळी भरून काढण्यासाठी तिने मनाशी एक निर्णय घेतला. तो निर्णय मूल दत्तक घ्यायचा नव्हता, तर “मूलबाळ नाही; तर आपण झाडे लावायची आणि त्यांचे संगोपन करून आपल्या मुलांप्रमाणे करायचे,” असा होता. (Saalumarada Thimmakka No More)
वडाची झाडे लावली
हुलीकल गावापासून कुदूर गावापर्यंतचा साडेचार किलोमीटरचा रस्ता निवडला. या रस्त्यावर झाडे लावायचा निर्णय घेतला. थिमक्कांच्या माहेरी गावाजवळ वडाची भरपूर झाडे होती. वडावर भरपूर पक्षी राहतात; ते डेरेदार वृक्ष होतात, म्हणून वड निवडला. या रस्त्यावर तसेच हुलीकल गावाच्या आजूबाजूच्या भागात वडाची झाडे नव्हती. रस्त्यावर तर कसलीच झाडे नव्हती. बाजूच्या गावात भरपूर वडाची झाडे होती. त्यांच्या फांद्यांपासून नवी झाडे येतात, हे थिमक्कांना माहीत होते. त्यांनी पावसाळ्याच्या सुरुवातीला या झाडांच्या फांद्या आणल्या. आणि पहिल्या वर्षी दहा झाडे लावली. या झाडांना दररोज पाणी घालू लागल्या. मुलाप्रमाणे त्यांची काळजी घेऊ लागल्या. लवकरच त्यावर कोंब फुलले. या कोंबाबरोबर थिमक्कांच्या चेहऱ्यावर हसू फुलले.
पतीचीही मदत
आपल्या पत्नीला यामध्ये मिळणारा आनंद पाहून त्यांचे पती चिकय्या त्या कामात मनापासून रस घेऊ लागले. चिकय्या खड्डा खोदायचे, लावण्यासाठी फांद्या आणायचे. थिमक्का झाड लावायच्या. जवळच्या विहिरीतून एक भांडे डोक्यावर आणि एक कमरेवर घेऊन पाणी आणायच्या. पाणी घातले की त्याला कुंपण घालायचे आणि मग दुसरे झाड लावायचे. अशा पद्धतीने पुढच्या वर्षीच्या पावसाळ्यात या दांपत्याने पंधरा झाडे लावली. (Saalumarada Thimmakka No More)
तिसऱ्या वर्षी हा आकडा वीस झाला. झाडे पावसाळ्याच्या सुरुवातीलाच लावायचा थिमक्कांचा कटाक्ष असे. या काळात झाडे लावली तर पाणी कमी लागते. पावसाळा संपेपर्यंत त्या रोपाची मुळे जमिनीत आतवर शिरतात. अशी थिमक्कांनी ३८४ वडाची झाडे या एकाच रस्त्याच्या कडेला लावली. झाडे लावल्यानंतर त्यांची पाने बकऱ्या आणि इतर जनावरांनी खाऊ नयेत, म्हणून काटेरी झाडांच्या फांद्या त्या झाडाभोवती लावल्या. (Saalumarada Thimmakka No More)
सालूमर्दा ही ओळख बनली (Saalumarada Thimmakka No More)
दररोज सकाळची कामे आटोपताच ही जोडी पाण्याने भरलेली भांडी घेऊन निघायची. जवळच्या विहीर आणि पाणवठ्यावरून पाणी घ्यायचे आणि ते झाडांना घालायचे, हे या दोघांचे नित्याचे काम झाले होते. आठवड्यात प्रत्येक झाडाला किमान दोनदा पाणी मिळाले पाहिजे, याकडे लक्ष असायचे. हे सारे काम पायी चालत असायचे. कामावर जाताना आणि येतानाही हे काम करायच्या. (Saalumarada Thimmakka No More)
हे सारे कोणत्या शासकीय योजनेचा भाग नव्हते. त्यांना या कामासाठी कोणी मजुरी देत नव्हते. त्यांना हे काम करताना पाहून अनेकजण नावे ठेवायचे. हातावरचे पोट असणारी ही जोडी कोणाकडेही लक्ष न देता, कोणतीही अपेक्षा न ठेवता आपले काम करत राहिली. वडाच्या झाडाला एकदा का फळे यायला सुरुवात झाली की ते झाड पुन्हा मरत नाही. हे दांपत्य तोवर झाडांची काळजी घेत असे.
आज सर्व वृक्ष त्या रस्त्याची शोभा वाढवत दिमाखात उभे आहेत. या वृक्षलागवडीमुळेच थिमक्का यांची “सालूमर्दा” अशी ओळख झाली. कन्नड भाषेत सालूमरेगळू म्हणजे झाडांची ओळ. त्यावरून त्यांची नवी ओळख तयार झाली आणि आज त्या त्याच नावाने सर्वत्र ओळखल्या जातात. (Saalumarada Thimmakka No More)
आठ हजार झाडे लावली
या पती-पत्नीने साडेतीनशेपेक्षा जास्त झाडे लावली आणि जगवली आहेत. १९९१ मध्ये त्यांच्या पतीचे निधन झाले. मात्र थिमक्का यांनी आपला झाडे लावण्याचा वसा काही सोडला नाही. आजवर आठ हजारपेक्षा जास्त झाडे लावली. सत्तरपेक्षा जास्त वर्षे त्या झाडे लावत आहेत. वनस्पतीशास्त्रातील तज्ज्ञांच्या मते, त्यांनी लावलेल्या झाडांची किंमत १.७५ कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. सत्तर-ऐंशी वर्षांपूर्वी लावलेल्या झाडांनी आता मोठा आकार धारण केला आहे. (Saalumarada Thimmakka No More)
त्यांनी आयुष्यभर पर्यावरणाची, निसर्गाची आणि मानवतेची सेवा केली आहे. त्यातून त्यांनी कोणत्याही धनाची अपेक्षा केली नाही. त्यांनी केलेल्या कार्याचे मूल्य पैशात मोजता येत नाही. त्यातून त्यांचे दैन्य संपले नाही. त्यांना केवळ पाचशे रुपये दरमहा पेन्शन मिळत असे. तीही त्यांनी मागील काही वर्षांपासून घेणे बंद केले. त्यांना सन्मानाने जगता यावे, अशी व्यवस्था शासनाने करावी, एवढीच त्यांची माफक मागणी होती.
थिमक्काच्या झोपडीत खासदार
कोणताही गाजावाजा न करता, कसलीही अपेक्षा न ठेवता झाडे लावणाऱ्या थिमक्कांना १९९५ साली ओळख मिळायला सुरुवात झाली. झाले असे की, थिमक्कांनी झाडे लावलेल्या रस्त्यावरून एक खासदार गाडीतून चालले होते. अचानक त्यांना अस्वस्थ वाटू लागले. जरा मोकळ्या हवेत बरे वाटेल म्हणून ते गाडीच्या बाहेर आले. रस्त्यावर आल्यावर गर्द सावलीत त्यांना एकदम बरे वाटले. (Saalumarada Thimmakka No More)
गर्द झाडी पाहून झाडे कोणी लावली, याची चौकशी केली. याच गावातील थिमक्काचे नाव समजले. खासदारसाहेब थेट थिमक्काच्या झोपडीत गेले. दावणगिरी आणि चित्रदुर्ग येथे त्यांच्या कार्यक्रमात थिमक्काच्या कार्याचे त्यांनी कौतुक केले. त्यानंतर पत्रकारांचे आणि प्रसारमाध्यमांचे लक्ष त्यांच्याकडे गेले आणि थिमक्का हे नाव जगभर पोहोचले.
त्यानंतर त्यांना शेकडो पुरस्कार प्रदान करण्यात आले. सिद्धरामय्या मुख्यमंत्री असताना त्यांनी “सालूमर्दा थिमक्का शेड प्लॅन” या वृक्षलागवड योजनेसाठी मोठी तरतूद उपलब्ध करून दिली. भारत सरकारने त्यांना नॅशनल सिटिझन अवॉर्ड, इंदिरा प्रियदर्शिनी वृक्षमित्र पुरस्कार या पुरस्कारासह २०१९ मध्ये पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मान केला. कर्नाटक राज्य सरकारनेही त्यांना अनेक पुरस्कार प्रदान केले आहेत.
पाठ्यपुस्तकात थिमक्का (Saalumarada Thimmakka No More)
त्यांच्या जीवनकार्यावरील कवितेचा समावेश सीबीएसईने त्यांच्या अभ्यासक्रमात केला आहे. कर्नाटक शासनाच्या साक्षरता मोहिमेसाठी बनवलेल्या पुस्तकातही थिमक्कांची माहिती समाविष्ट केली आहे. त्यांच्या नावाने अमेरिकेतही पर्यावरणविषयक कार्य करणारी संस्था स्थापन झाली आहे. थिमक्का यांचे नाव म्हैसूरमध्ये उभारण्यात आलेल्या उद्यानाला देण्यात आले. बीबीसीने जगातील सर्वात प्रभावशाली १०० महिलांच्या यादीत थिमक्कांचे नाव समाविष्ट केले आहे.
पद्मश्री पुरस्कार स्वीकारल्यानंतर थिमक्का म्हणाल्या, “मी एका हाताने पुरस्कार घेतला आणि दुसऱ्या हाताने आशीर्वाद दिले. या गावात काहीतरी आणखी चांगले व्हायला हवे. गरोदर महिलांना बाळंतपणासाठी जाणे अवघड होते. इथे प्रसूतीगृह व्हावे. माझ्याकडे पैसे नाहीत. मी ते उभारू शकत नाही. माझ्या मागणीकडे कोणीच लक्ष देत नाही.”
पृथ्वी बचाव संघटना
वय झाले तरी थिमक्का शांत बसल्या नाहीत. त्यांनी या कामासाठी धडपडणाऱ्या बी. एन. उमेश यांना आपला मानसपुत्र मानले आहे. त्यांच्यामार्फत ‘पृथ्वी बचाओ’ ही संघटना चालवली जाते. त्यांनी एक रोपवाटिका सुरू केली आहे. ज्या शेतकऱ्यांना झाडे लावायची आहेत त्यांना रोपे पुरवतात. आजवर पाच लाखांपेक्षा जास्त रोपे दिली आहेत. पाच लाखांपेक्षा जास्त विद्यार्थी आणि युवकांना प्रेरित करून पर्यावरणरक्षणाची, वृक्षलागवड आणि संवर्धनाची शपथ दिली आहे. (Saalumarada Thimmakka No More)
रस्ता रुंदीकरणाचे संकट
मध्यंतरी २०१९ मध्ये त्यांनी लावलेली झाडे बागेपल्ली–हालगुरू रस्ता रुंदीकरणासाठी तोडण्याची कार्यवाही होणार होती. मात्र थिमक्का यांनी याबद्दल थेट मुख्यमंत्र्याकडे धाव घेतली आणि प्रस्तावाचा पुनर्विचार करण्यात आला. झाडे वाचवण्यात थिमक्का यशस्वी झाल्या. झाडे तोडण्याबद्दल त्या अत्यंत कडव्या होतात. “झाडे तोडायला कोणी आले तर त्याला माझ्या शरीरावरून जावे लागेल,” असे त्या ठणकावत. (Saalumarada Thimmakka No More)
शंभरी ओलांडलेल्या आजीचा तरुणीला लाजवेल असा जोश पाहिला की अधिकारी निस्तब्ध होत. सर्वांना त्यांची दखल घ्यावी लागते. थिमक्का म्हणत, “प्रत्येकाने एक झाड लावले आणि जगवले, तर बालकांचे आयुष्य सुखी आणि आनंदी होईल.”
वय वर्षे ११२. या वयात निवांत राहायचे, मात्र थिमक्का या वयातही पहाटे चार-साडेचारला उठत. स्वतःचे सारे स्वतःच आवरत. तासभर देवपूजेत घालवत. त्यानंतर इतर कामे सुरू होत. त्यांनी ज्वारी, बाजरी खाऊन कित्येक वर्षे झाली होती. थोडासा भात हाच त्यांचा आहार. असे असूनही त्या कार्यक्रमांना बाहेर जात. मुलाखती देत. अशी ही झाडांची आई. निसर्गाची सेवा करणारी निसर्गकन्या! ११४ व्या वर्षी तिनं जगाचा निरोप घेतला. भावपूर्ण आदरांजली.
(पर्यावरण अभ्यासक आणि लेखक असलेले डॉ. व्ही. एन. शिंदे हे शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव आहेत.)