मुंबई : प्रतिनिधी : मुंबई महानगरपालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाची चर्चा सुरू असताना आज गुरुवारी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. दोघांमध्ये ताज लँड एन्डमध्ये चर्चा झाली. (Raj Thakare meet Fadanvis)
लोकसभा, विधानसभा निवडणुकीनंतर आता राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीचे पडघम वाजू लागले आहेत. राज्यात सत्ताधारी असलेले भाजप, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट महायुती म्हणून निवडणूकीच्या रिंगणात उतरणार आहेत. तर विधानसभा निवडणूकीत बॅकफूटवर पडलेल्या शिवसेना उद्धव ठाकरे यांनी नवा भिडू शोधण्यासाठी मनसेला टाळी देण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. महाराष्ट्र हितासाठी दोन्ही बंधू एकत्र येणार अशी हवा झाली आहे. शिवसेना आणि मनसेचे कार्यकर्तेही दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावे, अशी मनधरणी केली जात आहे. शिवसेनेचे युवा नेते आमदार अदित्य ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना आणि मनसेकडून त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छाचे फलक झळकू लागले आहेत. (Raj Thakare meet Fadanvis)
एकीकडे कार्यकर्त्यांमध्ये दोन्ही ठाकरे मनोमिलनाची उत्सुकता ताणली असताना राज ठाकरे यांनी अद्याप कोणतेही भाष्य केलेले नाही. उद्धव ठाकरे यांच्याकडून महाराष्ट्राच्या मनात काय आहे ते होईल असा सूचक इशारा दिला होता. शिवसेना आणि मनसेची महानगरपालिकेच्या निवडणुकीत एकत्र येणार अशी चर्चा सुरू असताना आज राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने राजकीय तज्ज्ञांच्या भुवया उंचावल्या आहेत. फडणवीस आणि ठाकरे यांची अचानक भेट झाल्याने तर्कवितर्क लढवले जात आहेत. दोघांमध्ये अर्धा तासाहून अधिक काळ चर्चा झाली. पण चर्चेचा तपशील अजून स्पष्ट झालेला नाही. पण महानगरपालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवरच दोघांमध्ये चर्चा झाल्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. (Raj Thakare meet Fadanvis)
लोकसभा निवडणूकीत मनसेने भाजपला मदत केली. पण विधानसभा निवडणूकीत भाजपकडून मनसेला सहकार्य झाली नसल्याची भावना आहे. त्यामुळे मनसेचा एकही आमदार निवडून आलेला नाही. फडणवीस यांच्या भेटीनंतर राज ठाकरे काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राज ठाकरे भाजप बरोबर जाणार की शिवसेना उद्धव ठाकरे गटाबरोबर की शिवसेना शिंदे गटाबरोबर जाणार याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत.