मुंबई : विशेष प्रतिनिधी : भारतीय रेल्वेची गौरव यात्रा अंतर्गत सोमवारपासून (९ जून) सुरू होणारा छत्रपती शिवाजी महाराज सर्किट हा प्रवास एक प्रेरणादायी अनुभव असेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. (Bharat Gaurav)
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे छत्रपती शिवाजी महाराज सर्किट अंतर्गत भारत गौरव रेल्वेच्या प्रारंभ प्रसंगी ते बोलत होते.
ते म्हणाले की, शिवाजी महाराज यांचा इतिहास जिवंत ठेवण्याचे काम या रेल्वेच्या माध्यमातून होणार आहे. आज या रेल्वेतून सातशे पेक्षा जात प्रवासी प्रवास करत आहेत. यातील ८० टक्के प्रवासी हे चाळीस वर्षाच्या आतील आहेत जे आज छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास अनुभवण्यासाठी जात आहेत. शिवराज्याभिषेकास ३५१ वर्ष पूर्ण होत आहेत. या दिवशी ही रेल्वे सुरू होत असल्याचा आनंद आहे, असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. (Bharat Gaurav)
मोगल, परकीय आक्रमकांना पराभूत करून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची निर्मिती केली असे सांगून फडणवीस म्हणाले की, पुढे हे स्वराज्य अटकेपर्यंत विस्तारले. या गौरव यात्रेचा आजचा मुक्काम रायगड येथे असणार आहे. तसेच या यात्रेत शिवनेरी, लालमहाल, पुण्याची शिवसृष्टी अशा महत्त्वाच्या ठिकाणांना भेट देता येणार आहे.’ (Bharat Gaurav)
यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव तसेच सांस्कृतिक विभागाचे सचिव विकास खारगे, पर्यटन प्रधान सचिव अतुल पाटणे, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मनोज कुमार सूर्यवंशी, भारतीय रेल्वेचे जनरल मॅनेजर धर्मवीर मीना, आयआरसीटीसी चे राहुल हिमालियन, महाराष्ट्र पर्यटन विभागाचे विकास महामंडळाचे महाव्यवस्थापक चंद्रशेखर जयस्वाल, वरिष्ठ व्यवस्थापक संजय ढेकणे यांच्यासह रेल्वेचे अधिकारी, प्रवासी उपस्थित होते.
या रेल्वेमधून प्रवास करणाऱ्या पर्यटकांचे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडून पारंपरिक ढोल-ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले.
या ५ दिवसांच्या विशेष सहलीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनाशी संबंधित महत्त्वाच्या ऐतिहासिक स्थळांना भेट, इतिहासावर आधारीत कार्यक्रम आयोजित केले आहेत.
पाच दिवसांची ही यात्रा या ठिकाणांना भेट देईल
- किल्ले रायगड : छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक येथे झाला, ही स्वराज्याची राजधानी होती.
- लाल महाल, पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांचे बालपण येथे गेले.
- कसबा गणपती व शिवसृष्टी, पुणे : पुण्याचे ग्रामदैवत व छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील संग्रहालय.
- शिवनेरी किल्ला : छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थळ.
- भीमाशंकर ज्योतिर्लिंग : १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक प्रमुख धार्मिक स्थळ.
- प्रतापगड किल्ला : अफझल खानाचा वध करण्यात आलेले ऐतिहासिक ठिकाण.
- कोल्हापूर : महालक्ष्मी मंदिर
- पन्हाळा किल्ला : बाजीप्रभू देशपांडे यांच्या शौर्याचे प्रतीक
हेही वाचा :
ठाणे अपघातानंतर रेल्वेचा महत्त्वपूर्ण निर्णय
रेल्वेतून पडून पाच प्रवाशांचा मृत्यू