ढाका : बांगलादेशचा सर्वांत अनुभवी क्रिकेटपटू मुश्फिकूर रहीमने गुरुवारी ‘वन-डे’मधून निवृत्ती जाहीर केली. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेमध्ये बांगलादेशचे आव्हान साखळी फेरीत संपुष्टात आल्यानंतर काही दिवसांमध्येच रहीमने वन-डे क्रिकेटला अलविदा केला आहे. (Rahim)
एकोणीस वर्षांखालील बांगलादेश संघांचे कर्णधारपद भूषवल्यानंतर मुश्फिकूरने २००६ मध्ये बांगलादेशच्या वरिष्ठ संघाद्वारे आंतरराष्ट्रीय वन-डे पदार्पण केले. जवळपास १९ वर्षांच्या वन-डे कारकिर्दीत मुश्फिकूरने २७४ सामन्यांमध्ये ३६.४२ च्या सरासरीने ७,७९५ धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर ९ शतके व ४९ अर्धशतकांचा समावेश आहे. बांगलादेशचा तो सर्वाधिक वन-डे खेळणारा क्रिकेटपटू आहे. त्याचप्रमाणे, आंतरराष्ट्रीय वन-डे क्रिकेटमध्ये २५० सामन्यांचा टप्पा पार करणाऱ्या केवळ पाच यष्टिरक्षकांमध्ये त्याचा समावेश होतो. कुमार संगकारा (श्रीलंका), ॲडम गिलख्रिस्ट (ऑस्ट्रेलिया), मार्क बाउचर (दक्षिण आफ्रिका) आणि महेंद्रसिंह धोनी (भारत) हे या यादीतील अन्य यष्टिरक्षक आहेत. त्याने ३७ सामन्यांमध्ये बांगलादेशचे नेतृत्वही केले आहे. (Rahim)
मुश्फिकूरने फेसबुक पोस्ट लिहून निवृत्ती जाहीर केली. “मी या दिवसापासून वन-डे क्रिकेटमधून निवृत्त होत आहे. कारकिर्दीतील सर्व गोष्टींसाठी ईश्वराचे आभार. जागतिक स्तरावर आपल्या संघाचे यश मर्यादित असले, तरी मी देशासाठी मैदानावर उतरल्यानंतर दरवेळी मी १०० टक्के योगदान देण्याचा प्रयत्न केला. मागील काही आठवडे हे माझ्यासाठी आव्हानात्मक होतो आणि आता हेच माझे विधिलिखित असल्याची जाणीव मला झाली आहे. माझे कुटुंबीय, मित्रपरिवार आणि क्रिकेटप्रेमींचा मी खूप आभारी आहे. त्यांच्यामुळेच मी १९ वर्षे क्रिकेट खेळू शकलो,” असे मुश्फिकूरने पोस्टमध्ये म्हटले आहे. (Rahim)
मागील काही काळापासून मुश्फिकूरने गमावलेला फॉर्म हा बांगलादेश संघासाठी चिंतेचा विषय आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये बांगलादेशने खेळलेल्या दोन सामन्यांमध्ये, मुश्फिकूरला भारताविरुद्ध शून्य, तर न्यूझीलंडविरुद्ध केवळ २ धावा करता आल्या होत्या. रहीमने २०२२ च्या वर्ल्ड कपनंतर आंतरराष्ट्रीय टी-२०मधून निवृत्ती जाहीर केली होती. आता तो केवळ आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेट खेळणार आहे. (Rahim)
हेही वाचा :
Bangladesh
रावळपिंडी : चॅम्पियन्स ट्रॉफी वन-डे क्रिकेट स्पर्धेतील ‘ग्रुप ए’मधील पाकिस्तान-बांगलादेश सामना गुरुवारी पावसामुळे रद्द करण्यात आला. पाकिस्तान व बांगलादेश या दोन्ही संघांचा हा अखेरचा साखळी सामना होता. सामना रद्द झाल्याने दोन्ही संघांना प्रत्येकी १ गुण मिळाला असला, तरी त्यांना एकाही विजयाशिवाय स्पर्धेबाहेर जावे लागले. (Rain)
दोन दिवसांपूर्वी रावळपिंडी स्टेडियमवरच ‘ग्रुप बी’मधील ऑस्ट्रेलिया व दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामना रद्द करण्यात आला होता. त्यानंतर, आज या स्टेडियमवरील सलग दुसरा सामना रद्द झाला. या चॅम्पियन्स ट्रॉफीमधील रावळपिंडी स्टेडियमवरचा हा अखेरचा सामना होता. यानंतर पाकिस्तानातील उर्वरित सामने लाहोर व कराची येथे रंगणार आहेत. गुरुवारी पावसाने जराही उसंत न घेतल्यामुळे मैदानावरील अच्छादन सकाळपासूनच कायम ठेवण्यात आले. अखेर दुपारी ४ वाजता ॲड्रियन होल्डस्टिक आणि मायकेल गॉफ या पंचांनी मैदानाची पाहणी करून सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला.(Rain)
पाकिस्तान व बांगलादेश या दोन्ही संघांना साखळी फेरीत प्रत्येकी दोन पराभव पत्करावे लागल्याने त्यांचे स्पर्धेतील आव्हान याअगोदरच संपुष्टात आले होते. त्यामुळे, गुरुवारचा सामना केवळ औपचारिकतेपुरताच होता. याबरोबरच पाकिस्तानवर सलग तिसऱ्या आयसीसी स्पर्धेमध्ये साखळी फेरीतच गाशा गुंडाळण्याची नामुष्की ओढावली. याआधी २०२३ चा वन-डे वर्ल्ड कप आणि २०२४ च्या टी-२० वर्ल्ड कपमध्ये पाकचे आव्हान साखळीतच संपुष्टात आले होते. (Rain)
हेही वाचा :
ढाका : बांगलादेशच्या पदच्युत पंतप्रधान शेख हसीना यांना आमच्याकडे सोपवा, अशी विनंती बांगलादेशच्या अंतरिम सरकारने भारत सरकारला केली आहे. तसे राजनयिक पत्र भारताला दिल्याचे सरकारच्यावतीने सोमवारी (दि.२३) सांगण्यात आले. (Sheikh Hasina)
विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाखालील तीव्र निदर्शनादरम्यान हसीना यांना देश सोडून परागंदा व्हावे लागले. या आंदोलनाने त्यांची १६ वर्षांची राजवट उलथवून टाकण्यात आली. ७७ वर्षीय हसीना ५ ऑगस्टपासून भारतामध्ये निर्वासित जीवन जगत आहेत.
ढाकास्थित आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणाने हसीना यांच्याविरोधात ‘मानवता आणि नरसंहाराविरुद्धच्या गुन्ह्यांसाठी’ अटक वॉरंट जारी केले आहे. त्यांच्यासह अनेक माजी कॅबिनेट मंत्री, सल्लागार आणि लष्करी आणि नागरी अधिकाऱ्यांचाही वॉरंट बजावलेल्यांमध्ये समावेश आहे.
परराष्ट्र व्यवहार सल्लागार म्हणजेच परराष्ट्र मंत्री तौहीद हुसेन यांनी यासंदर्भात पत्रकारांना सांगितले की, ‘आम्ही भारत सरकारला एक मौखिक राजनयिक संदेश पाठवला आहे. न्यायिक प्रक्रियेसाठी शेख हसीना यांना बांगलादेशला पाठवण्यात यावे. (Sheikh Hasina)
तत्पूर्वी, गृह सल्लागार जहाँगीर आलम यांनी सांगितले की, पदच्युत पंतप्रधान हसीना यांना भारताने बांगला देशकडे सोपवण्याची मागणी करणारे पत्र त्यांच्या कार्यालयाने परराष्ट्र मंत्रालयाला पाठवले आहे. आम्ही त्यांच्या प्रत्यार्पणाबाबत परराष्ट्र मंत्रालयाला पत्र पाठवले आहे. ही प्रक्रिया सध्या सुरू आहे, असे त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.
आलम म्हणाले की, ढाका आणि नवी दिल्ली यांच्यात प्रत्यार्पण करार आधीच झालेला आहे. या करारानुसार हसीना यांना बांगलादेशात परत आणले जाऊ शकते.
हेही वाचा :
किंग्जटाउन : जाकेर अलीचे नाबाद अर्धशतक आणि गोलंदाजांच्या प्रभावी कामगिरीच्या जोरावर बांगलादेशने वेस्ट इंडिजला तिसऱ्या टी-२० मध्ये ८० धावांनी नमवले. याबरोबरच मालिकेतील तीनही सामने जिंकून बांगलादेशने ३-० असा एकतर्फी मालिकाविजय साकारला. बांगलादेशला प्रथमच वेस्ट इंडिजविरुद्ध एकतर्फी मालिका जिंकण्यात यश आले. (Bangladesh T-20)
टी-२० मालिकेपूर्वी झालेली बांगलादेशविरुद्धची वन-डे मालिका विंडीजने ३-० अशी जिंकली होती. त्याचा वचपाही बांगलादेशने काढला. अखेरच्या टी-२० मध्ये बांगलादेशच्या ७ बाद १८९ धावांच्या प्रत्युत्तरात यजमानांचा डाव १६.४ षटकांमध्ये १०९ धावांत संपुष्टात आला. बांगलादेशतर्फे जाकेर अलीने ४१ चेंडूंमध्ये नाबाद ७२ धावांची खेळी करताना ३ चौकार व ६ षटकार लगावले. त्याला परवेझ हुसैन इमोन (३९ धावा) आणि मेहदी हसन मिराझ (२९ धावा) यांच्याकडून उपयुक्त साथ लाभली.
दुसरीकडे, विंडीजचे फलंदाज बांगलादेशच्या गोलंदाजांचा सामना करण्यात अपयशी ठरले. रोमारिओ शेफर्डचा अपवाद वगळता विंडीजच्या एकाही फलंदाजास वैयक्तिक ३० धावांचा टप्पाही ओलांडता आला नाही. शेफर्डने २७ चेंडूंमध्ये एक चौकार व तीन षटकारांसह ३३ धावा केल्या. बांगलादेशकडून रिशाद हुसैनने ३, तर तस्किन अहमद आणि माहेदी हसन यांनी प्रत्येकी २ विकेट घेतल्या. (Bangladesh T-20)
हेही वाचा :
महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : विंडीजविरुद्धच्या टी-२० मालिकेत फलंदाजांच्या अपयशानंतरही गोलंदाजांनी प्रभावी कामगिरी करून बांगलादेशला वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात २७ धावांनी विजय मिळवून दिला. या विजयासह बांगलादेशने तीन सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. (Bangladesh)
या सामन्यात वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. बांगलादेशने २० षटकांत ७ बाद १२९ धावा केल्या. बांगलादेशची अवस्था १७ व्या षटकामध्ये ७ बाद ८८ अशी झाली होती, तेव्हा संघाचे शतक पूर्ण होण्याबाबतही साशंकता होती. तथापि, तळातील शमिम हुसैनच्या फटकेबाजीमुळे बांगलादेशला सव्वाशे धावांचा टप्पा ओलांडता आला. शमिमने १७ चेंडूंमध्ये प्रत्येकी २ चौकार व षटकारांसह नाबाद ३५ धावा फटकावल्या. विंडीजच्या गुडाकेश मोतीने दोन विकेट घेतल्या. (Bangladesh)
हे सहज पार करता येण्याजोगे आव्हानही विंडीज संघाला झेपले नाही. रॉस्टन चेस व अकिल हुसैन वगळता विंडीजच्या एकाही फलंदाजास वैयक्तिक ३० धावांचा टप्पा पार करता आला नाही. चेसने ३४ चेंडूंत ३२, तर हुसैनने ३१ चेंडूंमध्ये ३१ धावा केल्या. बांगलादेशतर्फे तस्किन अहमदने ३, तर मेहदी हसन, रिशाद होसेन आणि तन्झिम हसन यांनी प्रत्येकी २ विकेट घेतल्या. (Bangladesh)
हेही वाचा :
महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : बांगला देशविरूद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात वेस्ट इंडिजचा गोलंदाज जेडेन सिल्सने घरच्या मैदानावर ऐतिहासिक कामगिरी केली आहे. सामन्यात प्रथम फलंदाजी करताना बांगला देशचा पहिला डाव १६४ धावांवर आटोपला. गोलंदाजीमध्ये जेडेन सिल्सने महत्वाची भूमिका बजावली. गोलंदाजीत त्याने १५.५ षटकात फक्त ५ धावा देत ४ बळी घेतले. यात त्याने १० षटके निर्धाव टाकली.
१९७८ नंतर कसोटी क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा सिल्स पहिलाच गोलंदाज ठरला आहे. गोलंदाजी करताना त्याने ०.३ च्या सरासरीने गोलंदाजी केली. याआधी हा विक्रम भारताचा वेगवान गोलंदाज उमेश यादव याच्या नावावर होता. २०१५ साली द.आफ्रिकाविरूद्ध झालेल्या कसोटी सामन्यात ०.४२ च्या सरासरीने गोलंदाजी केली होती. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात प्रथम भारताच्या बानू नाडकर्णी यांनी हा विक्रम केला होता. १९६४ मध्ये त्यांनी चेन्नईच्या मैदानावर इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात एकूण ३२ षटकांमध्ये २७ षटके निर्धाव टाकली होती. यात त्यांनी फक्त पाच धावा दिल्या होत्या.
सामन्यात फलंदाजी करताना बांगला देशची सुरूवात खराब झाली. सलामीवीर महमुदुल हसन जॉय (३) मोमिनुल हक (०) दोघे १० धावांवर तंबूत परतले. यानंतर शादमान इस्लाम व शहादत होसिन यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पहिल्या दिवसाअंती शहादत होसिनने आपले अर्धशतक पुर्ण केले. बांगला देशने पहिल्या दिवशी २ बाद ६९ अशा धावा उभारल्या, पण दुसऱ्या दिवशी बांगल देशचा डाव घरंगळला. दुसऱ्या दिवशी अवघ्या ३ खेळाडूंनी दुहेरी धावा केल्या. वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांनी बांगलादेशचा डाव १६४ धावांवर गुंडाळला. यात जेडेन सिल्स (४), शामर जोसेफ (३), केमार रोच (२), अल्झारी जोसेफ (१) विकेट्स घेतल्या.
आपला सख्खा शेजारी बांगला देश शांत होण्याची चिन्हे दिसत नाहीत. सतत कोणत्या ना कोणत्या कारणावरून तेथे हिंसा भडकते आहे आणि त्यामुळे या छोट्याशा देशाचे स्वास्थ्य बिघडून गेले आहे. आधी पंतप्रधान शेख हसीना यांच्याविरोधात देशात प्रचंड आंदोलन झाले आणि त्या आंदोलनाची परिणती म्हणजे शेख हसीना यांना देश सोडून पलायन करावे लागले. सध्याच्या हिंसाचाराचे कारण वेगळे आहे. इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा कॉन्श्यसनेस (इस्कॉन) या आंतरराष्ट्रीय संघटनेशी संबंधित असलेल्या चिन्मय कृष्ण दास ब्रह्मचारी यांना राजद्रोहाच्या आरोपावरून अटक करण्याचा आदेश न्यायालयाने दिला. त्यानंतर चिन्मय कृष्ण यांचे समर्थक आणि पोलिसांदरम्यान झालेल्या हिंसाचारात सैफुल इस्लाम नामक वकिलाचा मृत्यू झाला. त्यावरून परिस्थिती चिघळली. स्वत:ला चिन्मय कृष्ण हे ‘बांगलादेश सम्मीलित सनातन जागरण जोती’ या संघटनेचे प्रवक्ते आहेत. ऑक्टोबरमध्ये बांगलादेशाच्या ध्वजाचा अपमान केल्याचा आरोप चिन्मय कृष्ण यांच्यावर आहे. ज्या दिवशी माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी देशातून पलायन केले, त्यादिवशी त्यांनी एका जमावाला बांगला देशाच्या झेंड्याच्या जागी इस्कॉनला भगवा झेंडा लावण्यासाठी चिथावणी दिल्याचा आरोप आहे. देश कुठलाही असला तरी बहुसंख्य आणि अल्पसंख्यांकांमधील संबंध सारखेच असतात. हिंदू कट्टरपंथी भारतात ज्या त-हेचा व्यवहार मुस्लिमांशी करतात, तसाच व्यवहार पाकिस्तान किंवा बांगला देशातील मुस्लिम तेथील हिंदू अल्पसंख्यांकांशी करतात, हे अनेकदा आढळून आले आहे. बांगला देश सरकारच्या एका प्रतिनिधीच्या म्हणण्यानुसार चिन्मय कृष्णा यांच्यावर ते कुठल्या समुदायाचे नेते आहेत, म्हणून नव्हे, तर त्यांना राजद्रोहाच्या आरोपावरून कारवाई करण्यात आली आहे. बांगला देशातील हिंदूंच्या सुरक्षिततेच्या मागणीसाठी चिन्मय कृष्णा यांनी ऑगस्टपासून सातत्याने आंदोलने केली आहेत. अशाच एका आंदोलनादरम्यानच्या कथित प्रकारावरून त्यांच्यावर कारवाई झाली आहे.
बांगला देशातील सरकारी धोरणांविरोधातील आणि अन्य अंतर्गत कारणांवरून सुरू असलेला संघर्ष वेगळा आहे. त्या संघर्षाची परिणती शेख हसीना यांच्या देश सोडून जाण्यात झाली. परंतु भारतीय उपखंडातील अन्य देशांप्रमाणे इथल्या संघर्षाला हिंदू-मुस्लिम संघर्षाचा एक पदर आहेच. अशा संघर्षात अल्पसंख्य सतत भरडले जातात आणि बांगला देशात हिंदू अल्पसंख्य असल्यामुळे त्यांना तिथे त्रास सहनकरावा लागत आहे. शेख हसीना यांच्या विरोधातील आंदोलनापासून बांगलादेशात अल्पसंख्याक, त्यातही हिंदू नागरिकांच्या मालमत्ता आणि प्रार्थनास्थळांवरील हल्ले वाढले आहेत. त्याचे कारणही हास्यास्पद म्हणता येईल असे आहे. शेख हसीना यांना भारताने आश्रय दिला, याचा अर्थ भारत सरकारशी त्यांची जवळीक आहे, अशा समाजातून आणि हिंदू म्हणजे भारतप्रेमी असे गृहित धरून अशा प्रकारचे हल्ले झाले. शेख हसीना यांच्याविरुद्ध गंभीर स्वरूपाचे खटले चालवायचे असल्यामुळे त्यांना बांगलादेशात परत पाठवावे, अशी मागणी बांगला देशाच्या काळजीवाहू सरकारने केली आहे. या मागणीस भारताने प्रतिसाद दिलेला नसल्यामुळे बांगलादेश सरकारही दुखावले आहे. परंतु काळजीवाहू सरकारचे प्रमुख नोबेल पारितोषिक विजेते अर्थतज्ज्ञ मोहम्मद युनूस यांच्या सबुरीच्या धोरणामुळे प्रकरण हाताबाहेर गेलेले नाही. बांगलादेशातील लोकभावनेचा आदर राखत भारताशी जुळवून घेण्याचे त्यांचे धोरण आहे. मूर्खांची जमात सगळ्या देशांमध्ये असते, तशी ती बांगला देशातही आहेच. त्याचा फटका तेथील हिंदूंना बसत आहे. हिंदूंवरील हल्ल्यासंदर्भात भारत सरकारने बांगलादेशातील काळजीवाहू सरकारला लक्ष घालण्याचे आवाहन केले होते. त्याची दखल घेऊन मोहम्मद युनूस यांनी एका मंदिराला भेट देऊन, धार्मिक सलोखा राखण्यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही दिली होती. बांगला देशातील हिंदूंच्या सुरक्षिततेसंदर्भात भारत सरकारने लक्ष घालणे समजू शकते, परंतु चिन्मय कृष्णा यांच्या अटकेवरून दोन्ही देशांमध्ये तणाव येणे योग्य नाही. कारण हा मुद्दा देशांतर्गत आहे आणि त्यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा आहे. न्यायालयीन प्रक्रियेतून त्यावर तोडगा निघू शकेल, ही प्रक्रिया निष्पक्षपणे चालावी यासाठी आग्रह धरणे समजू शकते. परंतु त्याआधीच अंतर्गत बाबींमध्ये ढवळाढवळ करणे संकेतांना धरून नाही. बांगला देशातील हिंदूंची भारताला काळजी वाटणे स्वाभाविक आहे, परंतु आंतरराष्ट्रीय संकेतांचे भान राखायला हवे. त्याबाबत सातत्याने जाहीर भूमिका घेणे धार्मिक ध्रुवीकरणाला खातपाणी घालणारे ठरू शकते. बांगला देश सरकारकडेच पाठपुरावा करून हिंदूंच्या सुरक्षिततेची काळजी घ्यायला हवी.
ढाका : वृत्तसंस्था : बांगला देशातील सत्ताबदलानंतर देशाच्या व्यापार आणि परराष्ट्र धोरणातही बदल होताना दिसत आहेत. कराचीहून एक मालवाहू जहाज चट्टोग्रामला पोहोचले आहे. अनेक वर्षांनंतर पाकिस्तान आणि बांगला देशात व्यापार-उदीम सुरू होत आहे. त्यातून भारताला शह देण्याचा प्रयत्न आहे.
शेख हसीना सत्तेतून बाहेर पडल्यानंतर बांगला देशच्या परराष्ट्र आणि व्यापार धोरणात मोठे बदल होतील, असे मानले जात होते. दोन्ही देशांमधील ऐतिहासिकदृष्ट्या तणावपूर्ण संबंधांमध्ये बदल म्हणून याकडे पाहिले जाऊ शकते, असा दावाही पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी केला आहे. आतापर्यंत दोन्ही देशांच्या संबंधांमध्ये १९७१ च्या युद्धाची छाया महत्त्वाची भूमिका बजावत होती. १९७१ च्या नऊ महिन्यांच्या मुक्ती संग्रामात पाकिस्तानी लष्कराने बांगला देशातील जनतेवर अगणित अत्याचार केले. सुमारे ३० लाख लोक मारले गेले. हजारो लोकांवर अत्याचार झाले. महिलांवर बलात्कार झाले आणि लाखो लोक घर सोडून पळून गेले. या जुन्या आठवणी आजपर्यंत दोन्ही देशांच्या संबंधांवर प्रभाव टाकत होत्या. या अत्याचारांबद्दल पाकिस्तानकडून कधीही खेद किंवा माफी मागितली गेली नाही. उलट १९७१ च्या बांगला देश घटनेसाठी पाकिस्तानने नेहमीच भारताला जबाबदार धरले.
पाकिस्तानचा आरोप आहे, की बांगला देशात कोणतेही अत्याचार झाले नाहीत; पण हे सर्व भारताने प्रायोजित केले होते. त्याचा उद्देश पाकिस्तानचे जनक मोहम्मद अली जिना यांचा प्रकल्प अयशस्वी करणे हा होता. पाकिस्तानी लष्कर आपल्या देशातील जनतेमध्ये भारताला आपला शत्रू बनवून देशाच्या राजकारणात स्वत:साठी महत्त्वाचे स्थान मिळवते. याची मदत घेऊन पाकिस्तानी लष्कराने बांगला देशात झालेल्या अत्याचारांबद्दल कधीही माफी मागितलेली नाही. बांगला देशातील मुक्तिसंग्राम हा अलीकडच्या काळापर्यंत महत्त्वाचा मुद्दा होता. बांगलादेशात शेख हसीना यांच्या सरकारच्या काळात पाकिस्तान आणि बांगला देश यांच्यातील संबंध खूपच खराब राहिले. पाकिस्तानी लष्कराने केलेल्या अत्याचाराच्या प्रकरणात न्याय मिळाला नाही, असे बांगला देश म्हणत आहे. त्यांच्या राजवटीत देशद्रोही किंवा रझाकारांना युद्ध गुन्हेगार म्हणून संबोधून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.
शेख हसीना यांचा कार्यकाळ १९९६-२००१ आणि २००९-२०२४ असा होता. हसीना यांनी २०१० मध्ये युद्ध गुन्हेगारांवर खटला चालवण्यासाठी आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणाची स्थापना केली. एवढेच नाही तर हसीना यांनी पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या ‘जमात-ए-इस्लामी’वरही बंदी घातली होती. २०१३ मध्ये ‘जमात’चा नेता अब्दुल कादिर मुल्लाला ३४४ लोकांच्या हत्येसाठी आणि युद्ध गुन्ह्यांसाठी ‘आयसीटी’ने दोषी ठरवले होते. हसीना यांच्या राजवटीत फाशी देण्यात आलेला तो पहिला रझाकार होता. त्याच्या फाशीवर पाकिस्तानचे तत्कालीन गृहमंत्री निसार अली खान चौधरी यांनी ही दुर्दैवी घटना असल्याचे म्हटले होते. पाकिस्तानशी असलेल्या निष्ठेमुळेच त्यांना फाशी देण्यात आल्याचे चौधरी म्हणाले होते. बांगला देशमध्ये अब्दुल कादिर मुल्लाला फाशी दिल्याने हसीनाला पाकिस्तानच्या विरोधाला सामोरे जावे लागले होते. पाकिस्तानच्या ‘नॅशनल असेंब्ली’ने मुल्लाच्या फाशीला विरोध करणारा ठराव मंजूर केला. पाकिस्तानला बांगला देशचे स्वातंत्र्य अजून पचवता आलेले नाही, असे म्हणणाऱ्या हसीनाकडून याचे उत्तर आले. बांगला देशमध्ये पाकिस्तानचे अनेक मित्र असल्याचे त्यांनी सांगितले.
भारताशी चांगले संबंध त्याचबरोबर हसीना यांच्या कार्यकाळात भारत आणि बांगलादेश यांच्यातील संबंध खूप सुधारले आणि बांगलादेशच्या स्वातंत्र्यात भारताने घेतलेल्या भूमिकेचेही खूप कौतुक झाले; परंतु आता बांगला देशात सरकार बदलल्यानंतर पाकिस्तान पुन्हा बांगला देशाच्या जवळ जात आहे. बांगला देशात भारतविरोधी विचारसरणी वाढत आहे. काही काळापूर्वी इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रावर स्थानिक लोकांनी हल्ला केला. बांगला देशात एक असा वर्ग आहे, जो १९७१ च्या घटनेला विरोध करतो. ते १९७१ ला बांगलादेश आणि बंगाली राष्ट्रवादाचा विजय मानत नाहीत. १९७१ मध्ये फाळणीनंतर अशा प्रकारचे लोक जन्माला आले. झिया उल हक यांच्या काळात पाकिस्तान आणि बांगला देशातील संबंध चांगले झाले होते. आता युनूस मोहंमद यांच्या काळात पुन्हा एकदा पाकिस्तानने बांगला देशाशी हातमिळवणी केली आहे.
भारताबरोबरचे शत्रुत्व वाढणार
बांगला देशाच्या राजधानीत भारतविरोधी विचार असलेल्या लोकांचा वाढता प्रभाव पाहून आगामी काळात बांगला देशचे भारताविषयीचे शत्रुत्व आणखी वाढेल आणि त्याचवेळी पाकिस्तानसोबतचे संबंध आणखी सुधारतील, असा अंदाज आहे.
ढाका : बांगला देशातील सत्तापालट आणि रक्तरंजित हिंसाचारानंतर देश सोडून गेलेल्या शेख हसीना यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. (Sheikh Hasina)
स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, देशातील एका न्यायालयाने मानवतेविरुद्ध गुन्हे केल्याच्या आरोपावरून त्याच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी केले आहे. शेख हसीना बांगला देशातून हेलिकॉप्टरने देशाबाहेर पडल्या आणि दिल्लीजवळच्या हिंडन एअरबेसवर उतरल्या. तेव्हापासून त्या भारतात राहतात; मात्र त्यांच्या ठावठिकाणाबाबत कोणतीही माहिती नाही. त्यांना सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आले आहे.
शेख हसीनाविरोधात न्यायालयात अर्ज दाखल करणारे वकील मोहम्मद ताजुल इस्लाम म्हणाले, की हा एक संस्मरणीय दिवस आहे. त्याचवेळी बांगला देशातील आंदोलनादरम्यान मारल्या गेलेल्या शेकडो लोकांपैकी एकाच्या कुटुंबीयांनी ही चांगली बातमी असल्याचे सांगितले. आम्हाला आशा आहे, की आता शेख हसीना यांच्यावरील खटला पुढे जाईल आणि आम्हाला न्याय मिळेल. बांगला देशात गेल्या १५ वर्षांपासून शेख हसीना सत्तेवर होत्या. पंतप्रधान असताना मोठ्या प्रमाणावर लोकांना अटक केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. याशिवाय राजकीय विरोधकांची हत्या करण्यात आली.
बांगला देश आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधीकरणाचे मुख्य वकील ताजुल इस्लाम यांनी सांगितले, की शेख हसीना यांना १८ नोव्हेंबर रोजी न्यायालयाने हजर करण्याचे आदेश दिले आहेत. इस्लाम म्हणाले, ‘शेख हसीना जुलै ते ऑगस्ट या काळात देशात हिंसाचार पसरवणाऱ्यांचे नेतृत्व करत होत्या, ज्यात शेकडो लोक मारले गेले.’ शेख हसीना व्यतिरिक्त न्यायालयाने त्यांचा पक्ष अवामी लीगचे सरचिटणीस कैदुल कादर यांनाही अटक करण्यास सांगितले आहे. या दोन नेत्यांशिवाय इतर ४४ जणांवर अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. या ४४ जणांची नावे जाहीर करण्यात आलेली नाहीत.
हेही वाचा :
महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : बांगला देशविरूध्द होणाऱ्या तीन सामन्यांच्या टी-20 सामन्यांच्या मालिकेसाठी शनिवारी (दि.२८) भारतीय निवड समितीने १५ सदस्यांचा संघ जाहीर केला. यामध्ये भारतीय संघाच्या कर्णधार पदाची धुरा सूर्यकुमार यादवकडे सोपवण्यात आली आहे. तर, वेगवान गोलंदाज मयांक यादव आणि फिरकी गोलंदाज वरुण चक्रवर्ती यांचे संघात पुनरागमन झाले आहे. बांगला देशविरूद्धच्या टी-20 मालिकेला 6 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. भारतीय निवड समितीने जाहीर केलेल्या संघात अभिषेक शर्माची सलमीवीर म्हणून निवड झाली आहे. त्याच्यासोबत संजू सॅमसनला सलामीला येण्याची संधी मिळेल अशी शक्यता आहे. तर मधल्या फळीची जबाबदारी कर्णधार सूर्यकुमार यादव, रिंकू सिंगही, नितिश कुमार रेड्डी, रियान पराग यांच्या खांद्यावर आहे. (IND vs BAN T20 Series)
हार्दिक अनुभवी अष्टपैलू खेळाडू
या मालिकेत हार्दिक पंड्याकडे सर्वात अनुभवी अष्टपैलू खेळाडू म्हणून पाहिले जात आहे. परंतु, हार्दिकला यावेळी शिवम दुबेकडून चांगलीच स्पर्धा आहे. त्याचबरोबर संघात वॉशिंग्टन सुंदरसारख्या अष्टपैलू खेळाडूला स्थान मिळाले आहे.
मयांक यादवला संधी
मयांक यादवने आयपीएलमधील वेगवान गोलंदाजीच्या सर्वांना प्रभावित केले होते. परंतु, दुखापतीमुळे तो बराच काळ मैदानाबाहेर होता. त्याने बंगळूरच्या एनसीएमध्ये उपचार घेतले. यानंतर प्रभावी कामगिरी करत भारतीय संघात स्थान मिळवले आहे.
वरुण चक्रवर्ती-जितेश शर्मा यांचे पुनरागमन
कोलकाता नाईट रायडर्सचा मिस्ट्री स्पिनर म्हणून समोर आलेला वरुण चक्रवर्तीला पुन्हा एकदा भारतीय संघात स्थान मिळाले आहे. गेल्या सीझनमध्ये कोलकातासाठी केलेल्या शानदार कामगिरीच्या जोरावर त्याने पुन्हा संधी मिळवली आहे. याचबरोबर जितेश शर्माचेही संघात पुनरागमन झाले आहे. दुसरा यष्टिरक्षक म्हणून त्याचा संघात समावेश करण्यात आला आहे. (IND vs BAN T20 Series )
मुख्य खेळाडूंना विश्रांती
बांगला देशविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी ऋषभ पंतला विश्रांती देण्यात आली आहे. भारताला आगामी काळात ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिका खेळायची आहे. याचबरोबर यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराह यांनाही विश्रांती दिली आहे. पुढील कसोटी सामने लक्षात घेता या खेळाडूंच्या वर्कलोड मॅनेजमेंटसाठी विश्रांती देण्यात आली आहे. याशिवाय इशान किशनला पुन्हा संधी मिळालेली नाही. त्याने अलीकडेच देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली होती; तर रोहित शर्मा, विराट कोहली आणि रवींद्र जडेजा यांनी टी-20 प्रकारातून विश्रांती घेतली आहे.
बांगलादेशविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी भारतीय संघ :
सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, रिंकू सिंह, हार्दिक पंड्या, रियान पराग, नितीश कुमार रेड्डी, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, वरुण चक्रवर्ती, जितेश शर्मा, अर्शदीप सिंग, हर्षित राणा आणि मयंक यादव.
हेही वाचा :