नमस्कार युवा मित्रांनो ! “एआय” या विषयावर बरेच लेख तुम्ही वाचले असतील. आज पाहूयात की ‘एआय’ला सामोरे कसे जायचे. एआयमुळे जसे काही ‘जॉब लॉसेस’ होतील तसे काही जॉब सुधारतीलही. म्हणजे एआयचे फायदे घेताना उद्भवणाऱ्या धोक्यांचा सामना कसा करायचा, हे नीटपणे पहावे लागेल व तशी तयारी करावी लागेल.
- डॉ. गिरीश जाखोटिया.
मागील दशकात “एकच मूल” या धोरणामुळे चीनमध्ये युवा कर्मचाऱ्यांची संख्या घटली. यास्तव अनेक कारखान्यांमध्ये व सेवाक्षेत्रात चीनने कृत्रिम बुद्धिमत्तेचा (Artificial Intelligence) उपयोग करीत भरपूर “ऑटोमेशन” (स्वयंचलित किंवा यंत्राधारित प्रक्रिया) आणले. यामुळे कामाचा आकार, वेग, अचूकता इ. गोष्टी सुधारल्या आणि खर्च कमी झाला. अर्थात या एआयवर आधारित ऑटोमेशनमुळे रोजगारात होणारी घट ही नजिकच्या काळात चीनसाठी आव्हानात्मक समस्या बनू शकेल. परंतु कल्पना करा की चीनसारखा ‘कम्युनिस्ट’ देश हा जागतिक बाजारपेठेत टिकण्यासाठी आर्टिफिशल इंटिलिजंसचा इतका वारेमाप उपयोग करतोय तर ‘भांडवलप्रधान’ देश हाच उपयोग कुठपर्यंत नेतील ? सर्वसाधारणपणे उद्योजकांची ऊर्मी ही अधिकाधिक विक्री करत अधिकाधिक नफा कमावण्याची असते. यामुळे बहुतांश कंपन्या या दरवर्षी विशिष्ट अशा व्यवसायवाढीच्या दरावर काम करीत असतात. जेव्हा जेव्हा यंत्रांवरील खर्च हा कामगारांच्या पगारापेक्षा कमी ठरतो (गुणवत्ता तीच ठेवून) तेव्हा तेव्हा बहुतेक उद्योजक हे यांत्रिकीकरणालाच प्राधान्य देतात. इथे मानवीय दृष्टिकोन वापरत कामगार – कपात न करणारे उद्योजक अगदीच विरळा. खूप धार्मिक मनोवृत्तीचे असणारे उद्योजकसुद्धा अशा वेळी सोयीने धर्म आणि उद्योग यामध्ये फारकत करीत उद्योजकीय निर्णयच घेतात जो त्यांच्या फायद्याचा असतो. बरेच भारतीय उद्योजक तर एका बाजूला कामगार – कपात करत दुसऱ्या बाजूला भरपूर धार्मिक देणग्या देतात. अशा सामाजिक वातावरणात “ऑटोमेशन”वर भर हा दिला जाणारच. अर्थात इथे दुसरी बाजू अशी की स्वस्त चिनी प्रॉडक्ट्सशी स्पर्धा करण्यासाठी भारतीय उद्योजकांनी चिन्यांप्रमाणेच ऑटोमेशन करणे ओघाने आलेच. (Artificial Intelligence )
एआयमुळे जी मानवी कामे रोबोटिक किंवा कमी कौशल्याची असतील ती आधी जातील. उदाहरणार्थ, तिकीट विंडोवरील काम, सामान्य कारकुनी काम, डेटा एंट्री व डेटा विश्लेषणाचे काम, लॉजिस्टिक किंवा दळणवळण व वेअरहौसिंगचे प्राथमिक प्लॅनिंग, सुट्या भागांचे एकत्रीकरण, हॉटेल व हॉस्पिटलमधील साधी कामे, शाळा – कॉलेजमधील रुटीन शिकवणे, प्रयोगशाळांमधील सामान्य प्रक्रिया, कारखान्यातील यांत्रिक कामे इत्यादी. अर्थात हे लगेच होणार नाही कारण एआय प्रणाली व तशी यंत्रे ही सुरुवातीला महाग असणार आणि ती रुळायलाही वेळ लागणार. एआयचा वापर स्वस्त व सोपा होऊ लागताच उद्योजक हे कामगारांचे वेतन कमी करण्याचा व अधिकाधिक कार्यक्षमतेसाठीचा दबाव आणू शकतात. (मोबाईलचा जसा वापर वाढत गेला तसे मोबाईल स्वस्त होत गेले.) मुळात आज जगभरातील अनेक कारखान्यात रोबोट वापरले जाताहेत जिथे मनुष्यबळ कमी उपलब्ध असते किंवा अधिक खर्चिक असते. चीनमध्ये वेतनवाढ खूप झाल्याने एआयचा वापर स्वस्त वाटू लागला. थोडक्यात असे की जिथे जिथे मानवी मेंदूचा वापर कमी आहे किंवा मानवी श्रमाऐवजी यांत्रिक श्रम स्वस्त आहे तिथे तिथे एआयचा वापर हा वाढत जातोय. जपान, स्वीडन, ऑस्ट्रेलिया या देशांत आणि अमेरिकेत सामूहिक शेती करण्यात एआयचा वापर वाढतो आहे. ईंन्फरमेशन टेक्नॉलॉजी म्हणजे आयटीच्या क्षेत्रात हा वापर केव्हाचाच सुरू झालाय कारण बहुतांश भारतीय आयटी कंपन्यांमधील अनेक कर्मचारी हे ‘रोबोटिक कामे’च करत आले आहेत. यामुळे आयटीमध्ये परदेशी काम करणाऱ्या अनेक भारतीय तरुणांचे जॉब आज नाहिसे होऊ लागलेत. (Artificial Intelligence )
एआयचाच वापर करुन आम्हाला आमचे व्यावसायिक कौशल्य सुधारावे लागेल जेणेकरून आम्ही एआयपेक्षा अधिक चांगले काम अचूकतेने, कमी वेळेत व स्वस्तात करू शकू. एआय ही एक कृत्रिम बुद्धिमत्ता असल्याने मानवी कल्पनाक्षमतेची ती आज तरी बरोबरी करू शकणार नाही. ‘इंट्यूटिव्ह’ म्हणजे पटकन डोक्यात येणारी कल्पना अथवा समस्येचे उत्तर मानवी मेंदूच देऊ शकतो. उदाहरणार्थ, डेटा प्रोसेसिंग हे एआय करु शकेल परंतु त्यातून निघणाऱ्या निरीक्षणांचा वापर करून कल्पक सूचना किंवा उत्तरे मानवी मेंदू अधिक नीटपणे देऊ शकेल. चार संभाव्य उत्तरे एआयने दिल्यानंतर ग्राहकाला किंवा आपल्या कंपनीतील वरीष्ठांना भावणारे अथवा सोयीचे वाटणारे एक सर्वोत्तम उत्तर आपल्यालाच निवडावे लागेल. यासाठी अंदाज बांधणारी “जजमेंटल मानवी कुवत” ही एआयपेक्षा जास्त असेल. एआयकडे मानवी भावनांना ओळखत भावनिक प्रतिसाद देण्याची कुवत आज नसल्याने “इमोशनल कोशंट” जिथे प्रभावीपणे व्यापारी फायद्यासाठी वापरता येऊ शकतो तिथे मानवी मेंदूच काम करू शकेल. उदाहरणार्थ, खरेदी – विक्री करताना समोरच्याचा अंदाज घेत व्यापारी शर्ती व अटींबाबत करावयाची घासाघीस ही चतुर मानवी मेंदूच करु शकेल. म्हणजे आपले जॉब टिकवायचे असतील तर “व्यावहारिक व भावनिक विश्लेषण आणि संभाषण” आम्हाला आत्मसात करावे लागेल. जिथे प्रासंगिक विश्लेषण व प्रतिसाद हे चौफेर आणि परिस्थितीनुरूप बदलावे लागत असेल तिथे मानवी मेंदू सरस ठरेल. मानवी कौशल्य, अनुभव व जजमेंट यांचे उत्तम कॉम्बिनेशन जो वेगाने करू शकेल तो एआयला पर्याय ठरू शकेल. उदाहरणार्थ, एआयवर चालणारे यंत्र हे स्वयंपाकाची प्रक्रिया चालवू शकेल परंतु मीठ – मिरची – मसाल्याचे चवदार मिश्रण ठरविणाऱ्या एखाद्या सुगरणीची ते बरोबरी करू शकणार नाही. एआय एखादी चांगली चप्पल बनवू शकेल परंतु “बांधणीची कोल्हापुरी” चप्पल ते बनवू शकणार नाही कारण ती नजाकतीने बांधायला मानवी हस्तकलाच लागेल. थोडक्यात असे की एआयचा वेग व वॉल्यूम आणि मानवी जजमेंटल कौशल्य यांची सांगड आता आम्ही घालू शकलो तर आमचा जॉब टिकेल.
कोणतेही नवे तंत्रज्ञान हे साधारणपणे टप्प्याटप्प्याने सुधारत जाते व त्याचा स्वीकारही आस्तेकदमच होतो. यामुळे आपणांस सावरण्याची व त्या नव्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेण्याची संधी व पुरेसा कालावधी मिळू शकतो. सध्याचे आर्टिफिशल इंटिलिजंस हे पहिल्या पातळीवर आहे. यांस “आर्टिफिशल नॅरो इंटिलिजंस” म्हटले जाते जे रोबोटिक्सच्या वरच्या पातळीवर आहे. म्हणजे हे किचकट व मोठ्या माहितीचे विश्लेषण – वर्गीकरण करु शकते, रेडिमेड लेख बनवून देऊ शकते, आकृत्या काढून देऊ शकते व मागील डेटा वापरून पुढची काही भाकिते करु शकते. परंतु हे माणसाप्रमाणे तार्किक (Reasoning) विचार करू शकत नाही. ही शक्यता दुसऱ्या पातळीवर असेल जिला म्हटलं जातं “आर्टिफिशल जनरल इंटिलिजंस”. हल्ली ‘सेल्फ लर्निंग मशिन्स’बद्दल जी चर्चा होते ती या दुसऱ्या पातळीला लागू होऊ शकते. या पातळीवर एआय स्वतःच स्वतःमधील सुधारणा करु शकेल. एआय यंत्रातील (Hardware) किंवा प्रणालीमधील (Software) तर्कनिष्ठ बदल करण्याची ही पातळी एकूणच खूप क्रांतिकारी असेल. मानवी मेंदू व एआय प्रणालीमधील ही स्पर्धा असेल. तिसऱ्या व अंतीम पातळीला “आर्टिफिशल सुपर इंटिलिजंस” हे नाव दिलं गेलंय. या पातळीवर एआयला भावना असतील. म्हणजे मानवी मेंदू व एआय मधील फरक इथे जवळपास संपुष्टात येईल. मी “जवळपास” यासाठी म्हटलं कारण मानवी मेंदू हा विविध प्रकारची कामे एकाच वेळी करु शकतो ज्यासाठी विविध प्रकारची कल्पकता आवश्यक असते. माफ करा, स्वस्तुती होईल. मी माझं उदाहरण इथे देतो. फायनान्स, ह्यूमन रिसोर्स मॅनेजमेंट व स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट या भिन्न भिन्न विषयांवर ग्रंथ लिहिताना मी कादंबरी, कविता संग्रह, वैचारिक ग्रंथही लिहिले आहेत. बुद्धिबळ खेळणे व गाणे, हे दोन्ही मी बऱ्यापैकी जमवतो. म्हणजे असं की मनुष्य आपल्या एकाच मेंदूचा विविधांगी वापर करू शकतो जे तिसऱ्या पातळीवरही एआयला जमणार नाही. थोडक्यात असे की एआय एखाद्या उद्योगाचा ‘सीईओ’ किंवा एखाद्या संघाचा ‘संघनायक’ होऊ शकणार नाही. जॉबच्या भाषेत बोलायचं झाल्यास जे कर्मचारी “मल्टिस्किलिंग” मध्ये निष्णात असतील ते एआयवर मात करून पुढे जातील. अर्थात उद्योजकांसाठी मल्टिस्किल्ड कर्मचारी हा प्रगत एआयपेक्षाही स्वस्त असेल. (Artificial Intelligence )
एआयच्या संभाव्य वाईट परिणामांना तोंड देण्यासाठी वेगवेगळ्या आघाड्यांवर वेगवेगळ्या पद्धतीने मुकाबला करावा लागेल. “श्रम + बुद्धिजीवी कौशल्य” अशा मिश्रणावर तरूणांना आपली उपयुक्तता वाढवावी लागेल. शेतकऱ्यांना एकत्र येऊन (जे मी गेली वीस वर्षे सांगतोय) एआयवर आधारित मोठ्या शेतीचे ऑटोमेशन करावे लागेल. एकत्र येण्यानेच हा खर्च पेलवता येईल. आपल्या मुलांना एआय – आधारित कौशल्ये शिकवावी लागतील. दिवसेंदिवस शिक्षणाचे खासगीकरण चालू असताना खासगी संस्थांमधून एआय शिकणे खूप खर्चिक असेल. यासाठी सहकारी तत्वावर युवकांनीच “एआय प्रशिक्षण केंद्रे” चालवायला हवीत. सुरुवातीला ऑनलाइन चालविण्याने कमी खर्चात प्रशिक्षण देता येईल. येणाऱ्या काळात एआयच्या प्राबल्यामुळे एआय विकत घेऊ शकणाऱ्या धनिकांची मक्तेदारी वाढू शकेल. यांस उत्तर म्हणून सामान्य शेतकऱ्यांनी व कष्टकऱ्यांनी एकत्र येऊन जमीन कसावी आणि शेवटच्या ग्राहकापर्यंत पोहोचावे. काही झालं तरी एआय धान्य पिकवू शकणार नाही. शेतकऱ्यांनी घाईने आपल्या शेतकी जमिनी अमीरांना किंवा कार्पोरेट्सना विकू नयेत. “छोटे शेतकरी – छोटे दुकानदार – ग्राहक संघ” एकत्र आले तर स्थानिक अर्थव्यवस्था ही स्थानिकांना म्हणजे या तिन्ही गटातील युवकांना रोजगार देऊ शकेल. यामुळे पूंजीपतींच्या “एआय आक्रमणा”लाही तोंड देता येईल. ग्राहकांनी आपल्या पुढील पिढ्यांचा रोजगार टिकविण्यासाठी एआय – चलित मोठ्या मॉल्सऐवजी स्थानिक छोट्या दुकानदारांना व शेतकरी संघटनांना प्राधान्य द्यावे. शहरांमधील कामगारांना संघटित होऊन नवी एआय – आधारित कौशल्ये युवा श्रमिकांना उपलब्ध करून द्यावी लागतील. यासाठी स्वतःचाच मोठा फंड उभा करावा लागेल. सामाजिक संस्थांनी एआयचे सामाजिक, सांस्कृतिक व आर्थिक दुःष्परिणाम आणि “एआय – एक दुय्यम सहाय्यक” म्हणून उपलब्ध होणारे त्याचे उचित फायदे सामान्य जनतेला समजावून द्यावेत. अशा जागरणातूनच सामान्य लोक सतर्क होतील व एआयसंबंधी योग्य ती पावले उचलतील. वर नमूद केल्याप्रमाणे अधिक चांगली व्यावसायिक कौशल्ये असणाऱ्या तरुणांनी जपान, ऑस्ट्रेलिया, स्विडन इ. देशांना स्थलांतरित व्हावे व तेथील अधिकच्या अर्थार्जनातून आणि ज्ञानार्जनातून आपल्या भारतीय भावंडांना मदत करावी.
आता एआयच्या बाबतीत भारतीय सामाजिक व औद्योगिक परिस्थितीकडे थोडं खोलात जाऊन पाहूयात. महाराष्ट्र, गोवा, गुजरात, कर्नाटक, आंध्र, तमिळनाडू, केरळ व तेलंगणा या राज्यातील उद्योजकांनी आर्टिफिशल इंटिलिजंसचा वापर करीत येणाऱ्या काळात उत्पादन व सेवा या दोन्ही क्षेत्रांत मोठी कामगार – कपात केली तर उत्तर भारतीय कामगारांचे भवितव्य काय असेल ? तसेही लोकसंख्यावाढीत उत्तर भारतीय बिमारू राज्ये ही आजही आघाडीवर असतात आणि विकसनशील दक्षिणी राज्यांमध्ये हाच वाढीचा दर हल्ली घटतो आहे. उत्तर भारतीय मतदारांचा वापर करीत एखादा राजकीय पक्ष पुनः पुन्हा सत्तेत येऊ शकेल परंतु “एआय” च्या संभाव्य वाढत्या वापराने वाढणाऱ्या बेरोजगारांच्या संख्येवर या पक्षाकडे तोडगा काय असेल ? त्यातही उद्योगपतींना व भांडवलदारांना सोयीस्कर अशी टोकाची उजवी राजकीय विचारसरणी असेल तर हा गंभीर होऊ शकणारा सामाजिक प्रश्न कसा सोडवला जाऊ शकेल ? एआय – आधारित यांत्रिकीकरणापेक्षा खर्च कमी व्हावा म्हणून कामगारांना कमी वेतन देणे हे एका मर्यादेपलिकडे शक्य होणार नाहीच. कमी वेतनामुळे सामान्य लोकांची क्रयशक्तीच कमी झाल्यास एआयच्या मदतीने केलेले अधिकचे उत्पादन कोण खरेदी करणार ? यामुळे उद्योगपतींचे अतिरिक्त भांडवलही आळशी वा अनुत्पादक बनू शकेल. एआयच्या अतिरेकी वापराने निर्माण होणारे बेकारांचे तांडे जर रस्त्यावर फिरु लागले तर निर्माण होणाऱ्या गंभीर सामाजिक समस्यांचे उत्तर आमच्याकडे कोणते असेल ? या समस्या धार्मिक कर्मकांडांनी वा पाकिस्तानला शिव्या देऊन किंवा अल्पसंख्याक धार्मिकांचा द्वेष करुन सोडवल्या जाऊ शकणार नाहीत. एआय – प्रणित मोठे मॉल व मोठे कारखाने बाजारांचा ताबा घेऊ लागले तर सहा कोटी लघुउद्योजकांचे व त्यांनी निर्माण केलेल्या रोजगाराचे भवितव्य काय असेल ? एक बाब मात्र नक्की की विज्ञानाधिष्ठित वाटचाल करणाऱ्या दक्षिणी राज्यांना या संभाव्य सामाजिक समस्यांचे निराकरण बहुदा जमू शकेल. परंतु चातुर्वर्ण्यव्यवस्था, धार्मिक अंधश्रद्धा व अवडंबरे आणि राजकीय र्हासाने ग्रस्त असणाऱ्या उत्तरी राज्यांसाठी हा मोठा समरप्रसंग होऊ शकेल, याबाबत दुमत होऊ नये. तेव्हा भारतीय युवकांनो, रोजगाराची आपापली आयुधे तपासा नि त्यांना एआयची धार देऊ लागा ! आजपासून. नव्हे, आत्तापासून.