नवी दिल्ली : नागरिकांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे मूल्य जाणून घेतले पाहिजे, असे मत सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी (१५ जुलै) व्यक्त केले. (Freedom of Expression)
अभिव्यक्ती स्वातंत्र्य उपभोगत असताना स्वनियमन पाळले पाहिजे, असेही न्यायालयाने म्हटले आहे. सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्ट नियंत्रित करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वांवर विचार करत असल्याचे सूतोवाचही न्यायालयाने व्यक्त केले.
हिंदू देवतेविरुद्ध ‘एक्स’ वर आक्षेपार्ह पोस्ट केल्याबद्दल पश्चिम बंगालसह अनेक राज्यांत एफआयआर दाखल झालेल्या वजाहत खानच्या याचिकेवर न्यायमूर्ती बी. व्ही. नागरत्न आणि के. व्ही. विश्वनाथन यांच्या खंडपीठाने सुनावणी केली. (Freedom of Expression)
२३ जून रोजीच्या सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयाने त्यांना १४ जुलैपर्यंत जबरदस्तीच्या कारवाईपासून अंतरिम संरक्षण दिले होते.
एका व्हिडिओमध्ये जातीयवादी भाष्य केल्याच्या आरोपाखाली आणखी एक सोशल मीडिया इन्फ्ल्युअन्सर शर्मिष्ठा पानोलीविरुद्ध खानने तक्रार दाखल केली होती. (Freedom of Expression)
अशाच प्रकारच्या पोस्टला प्रतिसाद म्हणून आक्षेपार्ह टिप्पण्या देऊ नयेत, असे त्याच्या वकिलांनी न्यायालयात सांगितले.
“नागरिकांना भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मूलभूत अधिकाराचे मूल्य माहीत असले पाहिजे. मर्यादेचे उल्लंघन केल्यास राज्य पाऊल उचलू शकते… राज्याने हस्तक्षेप करावा असे कुणालाही वाटत नाही,” न्यायमूर्ती नागरत्ना म्हणाले.
न्यायाधीश पुढे म्हणाले, “सोशल मीडियावरील या सर्व फुटीर प्रवृत्तीला आळा घालायला हवा.” याचा अर्थ ती सेन्सॉरशिप नाही, असेही खंडपीठाने स्पष्ट केले.
“नागरिकांमध्ये बंधुता असली पाहिजे,” अशी अपेक्षा खंडपीठाने व्यक्त केली. नागरिकांसाठी भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याबाबत मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्याचा विचार करत असल्याचेही कोर्ट म्हणाले. (Freedom of Expression)
संविधानाच्या कलम १९ (२) अंतर्गत भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर वाजवी निर्बंध आहेत यावर खंडपीठाने भर दिला आणि ते “योग्यरित्या” लावले गेले आहेत असे म्हटले.
दरम्यान, खंडपीठाने पुढील सुनावणीपर्यंत खानला अटकेपासून अंतरिम संरक्षण कायम ठेवले.
श्री. खानला ९ जून रोजी कोलकाता पोलिसांनी अटक केली. त्याविरोधत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्याच्या काही जुन्या ट्विटवरून आसाम, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र आणि हरियाणासह अनेक राज्यांमध्ये त्याच्याविरुद्ध एफआयआर आणि तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत, असे त्याच्या वकिलाने निदर्शनास आणून दिले.
पानोलीविरुद्ध दाखल केलेल्या तक्रारीचा बदला म्हणून हे एफआयआर दाखल करण्यात आले आहेत, असा युक्तिवादही त्याच्या वकिलाने केला.
हेही वाचा :
पुरे झाले, अहद ऑस्ट्रेलिया तहद कॅनडा; आधी मराठी मुलूख सांभाळा
गुप्तपणे रेकॉर्ड केलेले संभाषण स्वीकार्य पुरावे : सर्वोच्च न्यायालय