कोल्हापूर : प्रतिनिधी : विधान परिषदेत मोबाईलवर ऑनलाईन रमी खेळण्याचा डाव कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या अंगलट आला आहे. कोकोटे यांच्याकडून कृषी खाते काढून घेण्यात आले असून ते दत्तात्रय भरणे यांच्याकडे दिल्याने भरणेंना यांना लॉटरी लागली आहे. तर कोकाटे यांच्याकडे भरणे यांच्याकडे असलेले क्रीडा व युवक कल्याण खाते देण्यात आले आहे. या खांदेपलटानंतर आता महायुती सरकारील कोणत्या वादग्रस्त मंत्र्याच्या खात्याचा नंबर लागणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे. गृहराज्यमंत्री योगेश कदम, सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यावर उचलबांगडी तलवार फिरणार का? याची चर्चा सुरू झाली आहे. (Kokate)
पावसाळी अधिवेशनात मोबाईलवर ऑनलाइन रमीचा डाव खेळताना मंत्री कोकाटे यांचा व्हिडिओ रोहित पवार यांनी व्हायरल केला होता. एकीकडे शेतकऱ्याच्या वाढत्या आत्महत्या, कर्जमाफी या गंभीर प्रश्नांकडे सरकारचे दुर्लक्ष होत असताना कोकाटेंच्या रमीच्या डावामुळे विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली. कोकाटे यांनी राजीनामा द्यावा यासाठी महाविकास आघाडी अनेक संस्थांनी मागणी केली होती. पण उप मुख्यमंत्री अजित पवार यांनी कोकाटेंचा राजीनामा न घेता मंत्रीपदाच्या खात्यामध्ये खांदेपालट करण्यात आला. (Kokate)
महायुती सरकारमध्ये राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागला तर माणिकराव कोकाटे यांच्या खात्यामध्ये बदल झाला आहे. त्यामुळे वादग्रस्त मंत्र्यावर टांगती तलवार फिरु लागली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापुढे मंत्र्याचे वादग्रस्त वक्तव्य आणि चूक खपवून घेतली जाणार नाही असा इशारा दिला आहे. राष्ट्रवादीचे मंत्र्यांवर कारवाई झाल्याने आता शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यावर कारवाई होणार का? याची चर्चा सुरू झाली. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या आईच्या नावावर असलेल्या बारवर पोलिसांनी कारवाई केली असल्याने शिवसेना उद्धव ठाकरे गटाने त्यांचे प्रकरण लावून धरले आहे. आमदार अनिल परब या विषयांवर चांगलेच आक्रमक झाले आहेत. सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ यांचा व्हिडिओ व्हायरल झाला. त्यामध्ये शिरसाठ बिछान्यावर सिगारेट ओढत असून शेजारी पैशाची बॅग दिसत आहे. त्यामुळे विरोधी पक्षांनी हे प्रकरणही लावून धरले आहे. मुंढे, कोकाटेप्रमाणेच मंत्री कदम आणि शिरसाट यांच्यावर कारवाई होणार का असा प्रश्न विचारला जात आहे. वसई विरारचे आयुक्त अनिलकुमार पवार यांच्या घरावर ईडीची धाड पडली आहे. पवार हे शिक्षण मंत्री दादा भुसे यांचे नातेवाईक असल्याची संशयाची सुई त्यांच्याकडे वळली आहे. (Kokate)
राष्ट्रवादी, शिवसेना शिंदे गटाबरोबर भाजपचे मंत्री आणि आमदारांच्या वागण्यामुळे सरकार अडचणीत येत आहे. नाशिकमधील हॅनी ट्रॅप प्रकरणात मंत्री गिरीष महाजन यांच्यावरही शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांच्यावर टीका केली जात आहे. हॅनी ट्रॅप मध्ये राज्यातील ३९ हून अधिक पोलिस आणि महसुल विभागातील वरिष्ठ अधिकारी अडकले आहेत. हॅनी ट्रॅपमध्ये लोकप्रतिनीधीही अडकले आहेत असे बोलले जात आहेत. भाजपमधील संकट मोचक महाजन हे मुख्यमंत्री फडणवीसांचे निकटवर्तीय असल्याने त्यांच्यावरील कारवाईत सूट मिळत असल्याची तक्रार महायुतीतील घटक पक्षांकडून होत आहे. मुंढे आणि कोकाटेंवर कारवाई झाली असल्याने आता मंत्री कदम, मंत्री शिरसाठ, मंत्री भुसे आणि मंत्री महाजन यांचा नंबर लागणार असल्याची चर्चा सुरू आहे. (Kokate)