Home » Blog » अनुवादक हा दोन संस्कृतींमधील नाविकः डॉ. दामोदर खडसे

अनुवादक हा दोन संस्कृतींमधील नाविकः डॉ. दामोदर खडसे

कोल्हापूरच्या वर्षा गगराणी यांच्या १४ पुस्तकांचा शानदार प्रकाशन सोहळा

by प्रतिनिधी
0 comments

कोल्हापूर: अनुवादक हा दोन भाषा आणि संस्कृतींमधील ‘नाविक’ असतो. विचार आणि साहित्य एका किनाऱ्यावरून दुसऱ्या किनाऱ्यापर्यंत पोहोचवण्याचे काम अनुवादक करीत असतो, असे मत ज्येष्ठ हिंदी साहित्यिक आणि समीक्षक डॉ. दामोदर खडसे यांनी व्यक्त केले.

श्रीमती वर्षा अशोक गगराणी यांनी मराठीतून हिंदीमध्ये अनुवादित केलेल्या १४ पुस्तकांचे प्रकाशन डॉ. दामोदर खडसे यांच्या हस्ते करण्यात आले. वयाच्या ८३ व्या वर्षीही वर्षा गगराणी यांचा व्यासंग आणि साहित्य निर्मितीची ऊर्जा थक्क करणारी असून, ग्रंथाली व राजकमल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या सोहळ्यात त्यांच्या या प्रवासाचा गौरव करण्यात आला.

अनुवाद हे आव्हानात्मक काम

डॉ. दामोदर खडसे म्हणाले, मला कोल्हापूरपासून नेहमीच प्रेरणा मिळते. लेखिका वर्षा गगराणी यांनी वयाच्या ८३ व्या वर्षी केलेले पुस्तकांचे भाषांतर अत्यंत उल्लेखनीय आहे. मराठीतून हिंदीत भाषांतर करताना प्रतिभेचा कस लागतो. मराठी शब्दाला हिंदीत योग्य पर्यायी शब्द शोधून लिहिताना खूप काळजी घ्यावी लागते. अनुवादात मूळ भाषेचा भाव, संस्कृती आणि भावनिक खोली अचूकपणे उतरवणे हे मोठे आव्हान असते. साहित्य हे माणसाच्या अंतर्मनात कायमस्वरूपी सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्याचे प्रभावी माध्यम असते. हिंदी ही देशाची केंद्रीय भाषा असल्याने मराठी साहित्य देशभरात पोहोचिण्यासाठी ती प्रभावी ठरते.

कोल्हापुरातील रेसिडेन्सी क्लब येथे उत्साहात संपन्न झालेल्या कार्यक्रमास ज्येष्ठ हिंदी कवी हुबनाथ पांडे, अशोक माहेश्वरी, रमन मिश्र, राकेश शर्मा, अरुण पुराणिक, संजय कृष्णाजी पाटील, अशोक गगराणी, भूषण गगराणी, डॉ. कविता गगराणी, डॉ. सुनीलकुमार लवटे, डॉ. विजय चोरमारे, ग्रंथालीचे विश्वस्त सुदेश हिंगलासपूरकर, धनश्री धारप यांच्यासह साहित्य क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

स्त्रियांनी आर्थिक स्वातंत्र्य जपावे

अनुवादक वर्षा गगराणी म्हणाल्या, प्रत्येक स्त्रीचे जीवन एका कादंबरीसारखे असते. आपल्या प्रवासात कुटुंबाचे योगदान सर्वात महत्त्वाचे आहे. यावेळी त्यांनी आपल्या आयुष्यातील चढ-उतार आणि साहित्य प्रवासाचा सविस्तर पट उपस्थितांसमोर मांडला. घरातील आणि बाहेरील जबाबदारी पार पाडताना स्त्रियांना पुरुषांची आणि पुरुषांना स्त्रियांची गरज असते असेही त्यांनी यावेळी सांगितले. बदलत्या काळानुसार स्त्रियांनी थोडे तरी आर्थिक स्वातंत्र्य राखले पाहिजे, असेही त्या म्हणाल्या.

संजय कृष्णाजी पाटील यांनी आपल्या मनोगतात ‘ग्रंथाली’ चळवळीच्या आठवणींना उजाळा दिला. ‘ग्रंथाली’च्या सुरुवातीच्या काळात विजय तेंडुलकर, कुमार केतकर, रवींद्र लागू, अरुण साधू आणि दिनकर गांगल यांच्यासोबत काम करताना एसटी बसच्या छतावर पुस्तकांचे गठ्ठे चढवल्याचे त्यांनी सांगितले. मुंबई विद्यापीठाच्या हिंदी विभागाचे माजी प्रमुख डॉ. हुबनाथ पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली चार हिंदी चित्रपटांचे लेखन व संवाद पूर्ण केल्याचा उल्लेख त्यांनी केला.

लेखक अरुण पुराणिक यांनी देवानंद यांचा ‘हम दोनों’ चित्रपट पाहिल्यानंतर सिनेमाच्या प्रेमात पडल्याची आणि गिरगावातील शाळेच्या दिवसांत नियमित चित्रपट पाहिल्याची आठवण सांगितली.

डॉ. हुबनाथ पांडे म्हणाले, हिंदी ही सुमारे २०० वर्षांची भाषा आहे, तर मराठीला तब्बल बाराशे वर्षे जुनी समृद्ध परंपरा आहे. मराठी भाषेचे साहित्यातील योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. वयाच्या ८० व्या वर्षीही वर्षा गगराणी यांनी मराठीतील उत्कृष्ट कृतींचा हिंदीत अनुवाद करून दोन्ही भाषांमधील संवादाचा पूल बांधला आहे.

रमन मिश्र म्हणाले, वर्षा गगराणी यांनी अनुवाद क्षेत्रात केलेले कार्य हिंदी भाषिक वाचकांना मराठी साहित्याकडे आकर्षित करणारे ठरेल.

राकेश शर्मा म्हणाले, वर्षा गगराणींनी केलेले भाषांतराचे काम हिंदी वाचकांसाठी ज्ञानाची आणि मनोरंजनाची नवी कवाडे उघडून देईल.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!