वृत्तवाहिन्यांवर चोवीस तास राजकारण वाहत असतं. लोकही आता बातम्या मनोरंजन म्हणूनच पाहतात. त्यामुळे राजकारण म्हणजे त्यांच्या लेखी कधीही न संपणारी मालिका उर्फ सीरीयल झाली आहे.
या ‘मालिके’तले अजित पवार हे ‘पात्र’ किती लोकप्रिय होते हे आज सोशल मिडियातील प्रतिक्रियांवरून कळावे. सकाळी उठून झपाझप कामे करणारे, कोरोनाच्या काळातही मंत्रालयात येणारे, समोरच्यांना स्पष्टपणे वाजवणारे, अलिकडे गुलाबी कोट घालून स्वतःवर विनोद करणारे, काकांसमोर बराच काळ माघार घेणारे, नंतर काकांना ‘आता घरी बसा’ सांगणारे इत्यादी.
मराठी राजकारणाचा इतका डेली सोप झाला नव्हता त्या काळातली एक गोष्ट आहे. बहुदा २००४ च्या दरम्यानची असावी. एका कुठल्याशा प्रचारसभेत बोलताना दादा म्हणाले, “कामं आम्ही करायची आणि मतं मात्र तुम्ही दुसऱ्यांना देणार. हे यापुढे चालणार नाही. आम्हाला मतं मिळाली नाहीत तर कामंही होणार नाहीत.”
‘ही मतदारांना थेट धमकी आहे व सबब गुन्हा आहे’, असे म्हणून आम्ही इटीव्ही मराठीवर याची मोठी बातमी करून चालवली. त्यावर अनेकांच्या प्रतिक्रिया घेतल्या. तेव्हा वाहिन्या कमी होत्या. शिवाय निर्ढावलेपणा आजच्याइतका नव्हता. त्यामुळे त्याची थोडीफार (का होईना) चर्चा झाली.
त्यानंतर एकदा मुलाखतीसाठी अजितदादांच्या बंगल्यावर गेलो होतो. तेव्हा खासगी गप्पात त्यांनी स्वतःहूनच या बातमीचा संदर्भ दिला व ते म्हणाले, ‘लोकांना ज्या भाषेत कळते त्याच भाषेत आम्हाला बोलावे लागते.’ थोडक्यात, आपण काहीही चुकीचे केलेले नाही हे ते अगदी निर्मळपणे पटवून देत होते.
त्यानंतर काही दिवसांनी त्यांनी बहुदा सांगलीमध्ये, ‘होय मी टग्या आहे’, असे एका सभेत सांगितले. ही कबुलीही त्यांच्या त्याच ‘निर्मळ’पणाचा भाग होती.
अलिकडच्या काळात दादांची हीच ‘लोकांची भाषा’, स्वयंघोषित ‘टगे’गिरी राजकीय मालिकेच्या ‘प्रेक्षकां’मध्ये सुपरहिट झाली होती. “बाकी काही असो दादा ‘कामाचा माणूस’ आहे”, असे हे प्रेक्षक म्हणू लागले होते.
दादांची दोन वाक्ये तर सुपरडुपर हिट आहेत. इतकी की सध्याच्या राजकीय मालिकेतील सर्व पात्रे सोईस्कर असेल तेव्हा ती उच्चारून समोरच्यांना गप्प करतात. ती वाक्ये अशी- १) कोणी काय बोलावे, करावे…हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. २) ‘विकास करण्यासाठी आम्ही सत्तेत आलो’ किंवा ‘अरे, सत्तेत आलो म्हणूनच आम्ही हा विकास करू शकतो. (Ajit Dada – A role that was suddenly cut short)
सहकार क्षेत्र, मराठे, धर्मनिरपेक्ष राजकारण इत्यादींचे पुढारपण करण्याची शिकवण काकांकडून त्यांनी घेतली व आपल्या रीतीने त्यांनी ती इम्प्रोवाईज केली. म्हणजे बदलत्या काळानुसार सहकारी कारखान्यांच्या जागी खासगी कारखाने केले इत्यादी. सरकार असो की सहकार.. यातून पैशांची आवर्तने निर्माण करायला हवीत, जेणेकरून बरेच लोक त्यात ओढले जातात व आपले मतदार होतात हे काकांचे सूत्र त्यांनी चांगले पकडून ठेवले. किंबहुना, काकांच्या पुढच्या पिढीत मराठा राजकारणाचे मुखंड व्हायला तेच चांगले उमेदवार होते.
नागपूर अधिवेशनाला जाऊनही रा.स्व. संघाच्या मुख्यालयाच्या वाड्यावर हजेरीला न जाणे, भाजपचा प्रचंड विरोध असूनही नबाब मलिक यांची साथ न सोडणे, कटाक्षाने मुस्लिम व तरुणांना उमेदवाऱ्या देणे हे त्यांचे गुण होते व ते मात्र शेवटपर्यंत त्यांनी टिकवले.(Ajit Dada – A role that was suddenly cut short)
पालिका निवडणुकीत त्यांनी भाजपला ज्या रीतीने शिंगावर घेतले होते त्यावरून काकांच्या तरुणपणातल्यासारखी बंडखोर वृत्ती दादांच्यात पुन्हा येऊ लागल्याचे चिन्ह होते. भाजपच्या पक्षनिधीसाठी पुरंदरच्या एका प्रकल्पाची किंमत अमुक कोटी रुपयांनी वाढवली असा आरोप त्यांनी केला होता. सध्याच्या काळात ते धाडसाचे होते. तो तर त्यांनी केलाच शिवाय त्याची फाईलही आहे असे सांगून टाकले.
त्यामुळे अजितदादांचे हे ‘पात्र’ या ‘मालिके’त पुढे कोणते वळण घेणार याची उत्सुकता लागली होती. पण कोण्या ‘अज्ञात दिग्दर्शकां’नी या पात्राचा पुढचा ‘रोल’च आज कायमचा संपवून टाकला. (Ajit Dada – A role that was suddenly cut short)
अजितदादांना श्रध्दांजली!!
महाराष्ट्र दिनमान
जमीर काझी : मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकस्मित अपघाती निधनामुळे राज्यातील राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. गेल्या साडेतीन दशकाहून अधिककाळ राज्यातील राजकारणात सातत्याने चर्चेत राहिलेल्या अजित दादांनी काका शरद पवारांच्या बोटाला धरून सार्वजनिक व राजकीय जीवनात प्रवेश केला. त्यांच्या सावलीत राहून महत्वाची सत्तापदे मिळवली आणि स्वतः चे स्थानही निर्माण केले होते. महाराष्ट्राच्या राजकारणातील प्रभावी कुटुंबात जन्मलेल्या अजित पवार यांनी पाच वेळा राज्याचे उप मुख्यमंत्रीपद भूषविले. त्यांच्या राजकीय कारकिर्दीचा थोडक्यात घेतलेला हा आढावा.
काका शरद पवारांचा राजकीय प्रवास राज्य व देशात झपाट्याने वाढत राहिल्यानंतर बारामती व पुण्यात जी पोकळी निर्माण होत होती ती भरून काढण्याचे काम अजित पवारांनी केले . १९८२ पासून साखर कारखान्यांच्या संचालक मंडळांमधून त्यांचा वावर सुरू झाला होता.मात्र १९९१ हे वर्ष त्यांच्या राजकीय आयुष्याला निर्णायक वळण देणारे ठरले . पवार कुटुंबाचा होमग्राऊंड असलेल्या बारामतीतून ते थेट लोकसभेत निवडून गेले. लोकसभा तिकिटाचा किस्सा अजित पवारांनीच एका मुलाखतीत सांगितला. तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस अस्तित्वात नव्हती. राजीव गांधी काँग्रेसचे सर्वेसर्वा होते आणि उमेदवारीची अंतिम घोषणा त्यांच्याकडूनच होत असे. महाराष्ट्रात बारामती आणि कराड या दोन जागांवरील उमेदवार सर्वात शेवटी जाहीर झाले. बारामतीतून अजित पवार आणि कराडमधून पृथ्वीराज चव्हाण. दोघांचीही लोकसभेत एकत्र एन्ट्री झाली. पुढे तब्बल दोन दशकांनंतर हीच जोडी महाराष्ट्राच्या सत्ताकेंद्रात मुख्यमंत्री–उपमुख्यमंत्री म्हणून पुन्हा एकत्र आली. मात्र, अजित पवारांच्या राजकीय प्रवासातला सर्वात निर्णायक क्षण आला तो खासदारकीचा राजीनामा देण्याचा. पी. व्ही. नरसिंह राव यांनी शरद पवारांना संरक्षणमंत्री म्हणून केंद्रात बोलावल्यावर संसदेचं सदस्यत्व आवश्यक होते . सुरक्षित मतदारसंघ बारामती होता आणि तिथून काही महिन्यांपूर्वीच अजित पवार निवडून आले होते. काकांसाठी अजित पवारांनी खासदारकी सोडली आणि हा निर्णय त्यांच्या राजकीय निष्ठेचं प्रतीक मानला जातो. (kingmaker of state politics)
दिल्लीतील तीन-चार महिन्यांचा मुक्काम संपवून अजित पवार त्याच वर्षी बारामतीतून विधानसभेत पोहोचले. तेव्हापासून आजतागायत साडेतीन दशके बारामती हा अजित पवारांचा अभेद्य गड राहिला आहे. सलग सात वेळा आमदार म्हणून निवडून आले.खासदार ते आमदार, मंत्री ते उपमुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते ते पुन्हा सत्तेच्या केंद्रस्थानी अजित पवारांचा प्रवास हा सातत्य, संघर्ष आणि सत्तेच्या राजकारणातील चढउतार यांचं प्रतिबिंब आहे. १९९१ मधल्या त्या पहिल्या पावलानं महाराष्ट्राच्या राजकारणात ‘अजित पवार’ नावाचा स्वतंत्र अध्याय सुरू झाला, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. (kingmaker of state politics)
सत्तेच्या राजकारणात ते पक्षाचा कणा ठरले : राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून पक्षविस्तारापर्यंतची मोठी जबाबदारी अजित पवारांनी समर्थपणे सांभाळली. संघटन बांधणी, निवडणूक व्यवस्थापन आणि सत्तेच्या राजकारणात ते पक्षाचा कणा ठरले. मात्र, शरद पवार यांचे राजकीय उत्तराधिकारी म्हणून सुप्रिया सुळे यांच्याच नावाला मिळणारी पसंती आणि पक्षांतर्गत जाणवणारा दुजाभाव, या बाबी अजित पवारांच्या मनात अस्वस्थता निर्माण करणाऱ्या ठरल्या. या अस्वस्थतेचे उघड प्रकटीकरण २०१९मध्ये घडले. विधानसभा निवडणूक निकालानंतर राजकीय अस्थिरता निर्माण झाली असताना देवेंद्र फडणवीस यांच्याशी हातमिळवणी करत पहाटेचा शपथविधी उरकून अजित पवारांनी बंडाचा प्रयत्न केला. मात्र,हा प्रयत्न फार काळ टिकला नाही. सत्तास्थापनेसाठी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांनी एकत्र येत महाविकास आघाडी स्थापन केली. त्या वेळी अजित पवारांनी सत्तेतच राहण्याचा निर्णय घेतला. (kingmaker of state politics)
राष्ट्रवादीत दोन गटात विभागणी…. पक्षात ‘अजित पवार गट’ आणि ‘शरद पवार गट’ अशी विभागणी कार्यकर्त्यांमध्ये स्पष्टपणे जाणवू लागली. ही चर्चा २०२३ मध्ये अजित पवारांनी केलेल्या बंडानंतर प्रत्यक्षात उतरली. त्यांनी केवळ वेगळी वाटचालच निवडली नाही, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरही दावा सांगितला. पक्षाचं नाव आणि निवडणूक चिन्ह स्वतःकडे ठेवण्याची इच्छा व्यक्त करत, शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीपासून वेगळा अध्याय सुरू करण्याचे संकेत दिले. अखेर २ जुलै २०२३ रोजी अजित पवारांनी महायुतीसोबत हातमिळवणी केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राष्ट्रवादी काँग्रेसमधील दीर्घकाळ साचलेल्या अंतर्गत संघर्षाचा हा निर्णायक टप्पा ठरला होता.मात्र गेल्या दोन -अडीच महिन्यापासून विशेषतः महापालिका निवडणुका जाहीर झाल्यापासून काका-पुतणे यांच्यातील राजकीय विरोध मावळून ते एकत्र आले होते.जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणुकाही दोन्ही पक्ष एकत्र लढत असल्याने आगामी काळात दोन्ही पक्षाचे विलीनीकरण होईल ,अशी चर्चा उघडपणे रंगत असतानाच अजित दादाच्या अकाली अस्तामुळे राज्यातील राजकारणात मोठी पोकळी निर्माण करून गेली. (kingmaker of state politics)
अजित पवार : राजकीय प्रवास
कार्यकाळ
1991 – 2026 : सलग 32+ वर्षे सक्रिय राजकारण
1991 – आजतागायत : बारामतीतून 7 वेळा आमदार
संसद ते विधानसभेपर्यंत
जून 1991 – सप्टेंबर 1991 : खासदार
1991 – 1995 : पहिल्यांदा आमदार
1995 – 2026 : सलग आमदारकी
मंत्रिपदांचा आलेख
1991 – 1992 : कृषी फलोत्पादन, ऊर्जा राज्यमंत्री
1992 – 1995 : जलसंधारण, ऊर्जा राज्यमंत्री
1999 – 2004 : पाटबंधारे, फलोत्पादन मंत्री
2004 – 2009 : जलसंपदा, पाटबंधारे मंत्री
2009 – 2010 : जलसंपदा, ऊर्जा मंत्री
उपमुख्यमंत्री म्हणून पदभार
2010 – 2012 : उपमुख्यमंत्री (वित्त नियोजन, ऊर्जा)
2012 – 2014 : उपमुख्यमंत्री (वित्त, नियोजन, ऊर्जा)
2019 : उपमुख्यमंत्री (80 तास)
2019 – 2022 : उपमुख्यमंत्री (वित्त, नियोजन)
2023 – 2026 : उपमुख्यमंत्री, वित्त मंत्री
इतर भूमिका
2022 – जुलै 2023 : विरोधी पक्ष नेते
- डॉ. अमोल कोल्हे
अजितदादांची आणि माझी पहिली भेट अगदीच अनौपचारिक पद्धतीने साधारण २००३-०४ मध्ये झाली. त्यावेळी मी ‘केईएम’मध्ये वैद्यकीय शिक्षण घेत होतो. वडील कृष्णा खोरे महामंडळात नोकरीत होते. त्यांना अर्धांगवायूचा झटका आल्याने बदलीचा प्रश्न होता. त्यावेळी मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जनता दरबार आयोजित केला होता. माझी काहीच ओळख नव्हती. मी वडिलांचा अर्ज घेऊन जनता दरबारात अजित पवारांना भेटायला गेलो. दादांनी माझ्याकडून अर्ज घेतला. अर्ज पाहिला, ‘सगळी कागदपत्रे व्यवस्थित आहेत ना, मागणी रास्त आहे ना?’ असे विचारले. मी होय सांगताच उद्या ऑर्डर निघेल असे सांगितले. खरंच दुसऱ्या दिवशी बदलीची ऑर्डर हातात होती. कामाच्या या झपाट्याचा प्रभाव आजही माझ्या मनावर तसाच आहे. माझी काहीही ओळख नाही, माझी कागदपत्रे योग्य, मागणी करतो ती न्याय आहे, तत्क्षणी निर्णय घेण्याची कार्यपद्धती भावली. दादांविषयी कोणीही काहीही आक्षेप घेतात त्यावेळी ती आठवण आजही मनात उफाळून येते. (Amol Kolhe on Ajitdada)
हक्काची जागा
दादांशी दुसरी भेट झाली ती २००९ मध्ये. त्यावेळी मी राजकारणात नव्हतो. माझी ‘राजा शिवछत्रपती’ मालिका सुरू होती. मी विधानसभा निवडणूक लढवावी, अशी अनेक पक्षांकडून इच्छा होती. काही कार्यकर्त्यांनी सांगितले, दादांना भेटायचे आहे. त्यावेळी मी सांगितले की, ‘राजकारणात मला अजिबात स्वारस्य नाही.’ मालिका अर्धवट असल्याने राजकारणात येणे शक्य नव्हते. त्यावेळी दादांबरोबर भेट झाली. स्वतः साहेब (शरद पवार), दादा, आर. आर. आबा, दिलीप वळसे-पाटील, विजयदादा, छगन भुजबळ असे सर्व असताना ती भेट झाली. तिथे नम्रपणे मला शक्य नाही, असे सांगून बाहेर पडलो होतो. त्यावेळी दादांचा आश्वासक हात, नव्याने राजकारणात येणाऱ्या माणसाला विश्वास देणे मला भावले. त्यानंतर २००९ ते २०१४ या काळात मंत्रालयात कोणत्याही कामासाठी जायचे असल्यास हक्काची जागा म्हणजे अजितदादा. आपुलकी किंवा स्नेह जपणे, मान देणे काय असते, ते दादांकडून मला कायम अनुभवायला मिळाले. (Amol Kolhe on Ajitdada)
२०१४ मध्ये राजकारणात येण्याविषयी मला पुन्हा विचारणा झाली. त्यावेळीही देवगिरी बंगल्यावर एक ते दीड तास चर्चा करताना दादांनी वडिलकीच्या नात्याने अनेक गोष्टी समजावून सांगितल्या. मी २०१४ मध्ये शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची गोष्ट दादांच्या कानावर आदल्या रात्री घातली, इतके ते आपुलकीचे आणि विश्वासाचे नाते दादांनी तयार केले होते. माझे ऐकून घेतल्यावर दादांनी ‘गडबड करू नका, मी रात्री उशिरा मुंबईत येत आहे, भेटून बोलू’ असे सांगितले. ‘दादा आता निर्णय झालेला आहे. शब्द देऊन बसलो आहे, आणि मी प्रवेश करीत आहे, माझा तुमच्यावर एवढा विश्वास आहे की, तुम्हाला अंधारात ठेवून मी काही निर्णय घेणार नाही.’ असे सांगितले. (Amol Kolhe on Ajitdada)
समोरच्याच्या निर्णयाचा आदर
मी शिवसेनेत प्रवेश केल्यावर दोन दिवसांनी फोनवर शुभेच्छा देत ‘सांभाळून करा’ हे दादांचे वाक्य आपुलकी व्यक्त करणारे होते. माझ्या २०१९ च्या प्रवेशाचे पडद्यामागील खरे सूत्रधार दादाच आहेत. माझ्या मनाची तयारी झाल्याशिवाय मी त्यांच्यावर दबाव आणणार नाही, असे सांगून दादांनी वेळ दिला. सत्तेच्या पदावर असणाऱ्या तसेच प्रभावशाली व्यक्तिने समोरच्याच्या निर्णयाचा आदर करणे, याचे खरोखरच अप्रूप वाटते. निवडणुकीच्या काळात अनेक प्रश्न मनात होते. सर्व प्रश्नचिन्हांवर एकच उत्तर होते अजितदादा. दादांनी शब्द दिला की तो पाळला जातोच, हा त्यांच्याबद्दलचा कार्यकर्त्यांमध्ये अनुभव आहे आणि त्याचा अनुभव पहिल्या भेटीपासून घेत आहे. लोकसभा निवडणुकीत दादांनी खूप प्रयत्न केले. सर्वसामान्य कार्यकर्ता शब्दावर विश्वास ठेवून निवडणूक लढवत आहे. पक्ष, नेतृत्व हा भाग बाजूला ठेवू यात… कार्यकर्त्याचा विश्वास तुटू नये, यासाठी चाललेली दादांची धडपड मी त्या काळात पाहिली.
शिवस्वराज्य यात्रेच्या निमित्ताने दादांना खूप जवळून अनुभवता आले. दादा म्हणजे सत्तेच्या धबडग्यात नसलेले दादा होते. महाराष्ट्राच्या राजकारणाकडे, समाजकारणाकडे, विकासकारणाकडे पाहण्याची त्यांची दृष्टी अनुभवता आली. शिवस्वराज्य यात्रेदरम्यान रात्री अपरात्री मुक्कामाच्या ठिकाणी पोचायचो आणि सकाळी सात वाजता दादा सर्वांना ‘तयार झाले का बघा’ म्हणून विचारायचे. ‘हा मुलगा राजकारणात नवीन आहे, त्याला या लाइफस्टाइलची सवय व्हायला वेळ लागणार आहे,’ याचे भान त्यांना असायचे. रात्री कार्यकर्त्यांच्या बैठका सुरू झाल्यानंतर ते हळूच मला सांगायचे, ‘तुम्ही जाऊन झोपा, तुम्हाला झोप जास्त लागते.’ इतक्या बारकाव्याने वडिलधारी व्यक्ती काळजी घेणारा असल्यास त्याबद्दल तुम्हाला आपुलकी का वाटणार नाही?
शिवस्वराज्य यात्रेच्या आठवणी
मनातील सर्व प्रश्न विचारण्याची हक्काची जागा म्हणजे दादांची गाडी. दादा प्रत्येक प्रश्नाचे दिलखुलासपणे उत्तर द्यायचे. दादांना कार्यकर्त्यांची नस किती चपखल माहीत आहे, याचा प्रत्यय शिवस्वराज्य यात्रेत आला. मराठवाड्याच्या दौऱ्यावर असताना त्यांनी या भागात केलेली कामे सांगितली. बंधारे व अन्य कामातून शेती कशी फुलली ते सांगितले. खरंतर ते मला सांगायचे काही कारण नव्हते. परंतु ते त्यांचे आत्मचिंतन होते. अनेकांना विश्वासही बसणार नाही. प्रशासनावर पकड असल्याचा अनुभव ठायीठायी येतो. (Amol Kolhe on Ajitdada)
शिवस्वराज्य यात्रेच्या काळातील अशीच एक आठवण आहे. एकदा आम्ही दोघेच गाडीतून निघालो होतो. शिवस्वराज्य यात्रेचा तो सुरुवातीचा काळ होता. राज्यातील राजकीय वातावरण अस्थिर होते. बरेचसे नेते अद्याप शिवस्वराज्य यात्रेत सहभागीही झाले नव्हते. अशावेळी मी काळजीच्या स्वरात त्यांना विचारलं, `आपण निघालोय पण यात्रेचं पुढं कसं होणार?`त्यावर ते म्हणाले, `काहीही झालं तरी आता थांबायचं नाही. प्रचंड प्रतिसाद मिळतोय. कुणी आलं नाही तरी आपण दोघं मिळून यात्रा पूर्ण करायची. मला खात्री आहे की, यात्रा पूर्ण होईल तेव्हा आपण सत्तेच्या जवळ पोहोचलेले असू.` पुढं अमोल मिटकरी आले. जयंत पाटील यांच्यासह बाकीचे नेतेही आले आणि शिवस्वराज्य यात्रेने इतिहास घडवला. महाविकास आघाडीची सत्ता आली आणि अजितदादा उपमुख्यमंत्री झाले. उपमुख्यमंत्रिपदावर असताना शिवस्वराज्य यात्रेसंदर्भातली कृतज्ञता म्हणू किंवा जाणीव त्यांच्या मनात कायम होती. अनेकदा सत्ता आल्यावर लोक अशा गोष्टी विसरतात. अजितदादांनी कधी बोलून दाखवले नसेल, परंतु सत्ता येण्यात शिवस्वराज्य यात्रेची भूमिका महत्त्वाची ठरली, याचा त्यांनी कधी विसर पडू दिला नाही.
महानाट्याचे पहिले निमंत्रण दादांना
पिंपरी-चिंचवडमध्ये `शिवपुत्र संभाजी` महानाट्याचे प्रयोग होत असताना त्याचे पहिले निमंत्रण मी अजितदादांना दिलं. याचं एक फार वेगळं कारण आहे. गेली कित्येक वर्षे, कित्येक शतके छत्रपती संभाजी महाराजांची समाधी वढू-तुळापूर येथे होती. हे आपण सगळ्यांनी मान्य केले पाहिजे की, अजितदादा हे पहिले राजकीय नेते आहेत, ज्यांनी या समाधीचा जिर्णोद्धार करण्याचे ठरवले, ज्यांनी त्या समाधीसाठी अडीचशे कोटी रुपयांचा निधी दिला. ही फक्त भावनिक गोष्ट नाही. त्यासाठी आपण म्हणतो ना, पाहिजे जातीचे. ती शिव-शंभू भक्ती आहे. मला आठवतं, शिवस्वराज्य यात्रा काढायची ठरवलं तेव्हा त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा ध्वज असायला पाहिजे याचा पहिला पुरस्कार करणारे अजितदादा होते. दादांच्या मनात शिव-शंभू भक्ती असल्याचेच हे निदर्शक आहे. छत्रपती संभाजीराजे समाधीस्थळासाठी त्यांनी वित्त आणि नियोजन मंत्री असताना जे योगदान दिले आहे, ते एवढ्या वर्षात घडले नव्हते. प्रत्येक शिव-शंभूप्रेमीने त्यांचे हे योगदान लक्षात ठेवायला पाहिजे. (Amol Kolhe on Ajitdada)
महाविकास आघाडी सत्तेवर आल्यावर पहिल्या अधिवेशनात एकहाती किल्ला लढविणे म्हणजे काय असते ते दादांनी दाखवून दिले. कोरोनाच्या लाटेमध्ये पुणे देशात हॉटस्पॉट होते. त्यासाठी लागणारे तज्ज्ञ डॉक्टर, प्रशासनाला काय सूचना कराव्या लागतात, हे त्यांनी दाखवून दिले. पुणे जिल्ह्याने कोरोनावर मात केली. त्यामध्ये दादांचे नेतृत्व ही फार मोठी बाब आहे. तुटपुंज्या वैद्यकीय मनुष्यबळाच्या जोरावर कोरोनाचा मुकाबला त्यांनी केला.
कोविडच्या काळात आपल्या एकूण आरोग्य व्यवस्थेच्या मर्यादा समोर आल्या होत्या. त्यावेळी मी इंद्रायणी मेडिसिटीची संकल्पना अजितदादांच्यापुढे मांडली होती. २६ सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल्स एकाच संकुलात उभारण्याची ही योजना होती. अजितदादांनी ती योजना समजून घेतली आणि त्यांना पटल्यावर ती साकारण्यासाठी झपाटून कामाला लागले. त्यासाठीची जागा निश्चित करणे किंवा अन्य बाबींसाठी पावले टाकायला सुरुवात केली. तीन बैठका झाल्या. दरम्यानच्या काळात सत्तांतर झाल्यामुळे ती पूर्णत्वास जाऊ शकली नाही. मात्र त्यादृष्टिने प्रयत्न सुरू आहेत. संकल्पना मांडल्यानंतर अजितदादांनी ती पटकन समजून घेतली आणि कामाला लागले. राजकीय नेतृत्वाच्याठिकाणी एवढी तत्परता अपवादानेच आढळते.
दमदार अर्थमंत्री (Amol Kolhe on Ajitdada)
अर्थमंत्रिपदाची धुरा वाहत असताना आर्थिक अडचण दादांनी कोठेच जाणवू दिली नाही. कोविड काळात दोन वर्षांचा खासदार निधी गोठवला. खासदार म्हणून काम करताना दोन वर्षे खासदार निधी नाही. संसदेत आमच्या गटनेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी अर्थमंत्र्यांना सांगितले, निधी कशा पद्धतीने देता येतो हे तुम्ही आमच्या अजितदादांकडून काहीतरी शिका. दादांनी आमदार निधी थांबविला नाही. तीन कोटी आमदार निधी असतानाही कोरोनासाठी प्रत्येक आमदारांना दादांनी एक-एक कोटींची तरतूद करून दिली. ही सांगड घालत असतानाचा ताण त्यांच्या कामावर कधीच दिसला नाही..पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्प आणि चाकणच्या चौकातील उड्डाणपूल हे प्रश्न आपण मार्गी लावण्यात दादांचा पाठपुरावा कारणीभूत आहे.
पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्पाचे सादरीकरण पाहिल्याबरोबर ते म्हणाले, “या भागाचा चेहरामोहरा बदलणारा हा प्रकल्प आहे. यासाठी निधीची तरतूद करून तशी घोषणाही केली. चाकणच्या उड्डाणपुलाच्या प्रश्नी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी घेतलेल्या बैठकीत दादांनी पाठपुरावा केला. खासदार म्हणून प्रश्न मांडल्यानंतर राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी पाठबळ देणे व त्याबाबत आग्रही राहणे हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला खूप अप्रूप वाटते. हडपसर लोणी-काळभोरपर्यंत मेट्रोची आमची मागणी होती. दादांनी निर्णय घेऊन ती सासवडपर्यंत नेली आहे.
विकास प्रकल्पांमागे सौंदर्यदृष्टी
विकासाचे प्रकल्प मार्गी लावत असताना दादांची सौंदर्य दृष्टी कायम जागरूक असते. एका प्रकल्पाचे दादांसमोर सादरीकरण झाले. ते पाहिल्यावर त्यांनी सांगितले की, हा प्रकल्प योग्य नाही. मी दादांकडे आश्चर्यकारकरित्या पाहिले. मी म्हणालो, ‘प्रकल्प चांगला आहे.’ त्यावर ते म्हणाले, ‘डॉक्टर’ याने शहराचे सौंदर्य कमी होऊन जाईल.’ दादा एखाद्या इमारतीची पाहणी करत असतात त्यावेळी अधिकाऱ्यांच्या चेहऱ्यावर चिंतेचे जाळे असते, ते दादांच्या सौंदर्यदृष्टीचे द्योतक आहे, असे मला वाटते. पिंपरी-चिंचवडच्या जडणघडणीत दादांचा सिंहाचा वाटा आहे. शहरावर जिवापाड प्रेम आहे. पिंपरी-चिंचवडबाबत एखादा प्रकल्प येतो, त्यावेळी पोटच्या पोराकडे आपुलकीने बघावे, तसे त्या शहराविषयी वात्सल्य, त्या शहराविषयी ममत्व हे दादांच्या प्रत्येक शब्दात जाणवत राहते. पिंपरी-चिंचवडमध्ये गेल्यावर दादांच्या विकासाच्या दृष्टीची साक्ष प्रत्येकाला पटते. दादांची दूरदृष्टी, विकासाची दृष्टी आणि त्याचबरोबर सौंदर्यदृष्टी याचा ठायी ठायी प्रत्यय येतो. राजकीय नेतृत्व म्हणून दादा नव्या तंत्रज्ञानाच्या फार पुढे गेले आहेत. मीडियाची फारशी फिकीर करीत नाहीत. कार्यकर्ता म्हणून असे वाटते दादांनी मीडियाशी इन्ट्रॅक्ट करायला पाहिजे. त्याचा तरुणांना फायदा होईल. दादांविषयी लोकांच्या मनात काही शंका आहेत, त्या दूर होतील. त्यांचा त्यांच्या कामावर विश्वास आहे. ते म्हणतात, `माझे काम बोलेल, मी बोलणार नाही, माझ्याकडे तेवढा वेळ नाही.’
आरोग्याबाबत जागरूक
दादा खूप हेल्थ कॉन्शिअस आहेत. मला नेहमी प्रश्न पडतो, एवढ्या व्यग्रतेत ते हे कसे करू शकतात. जेवणं वेळेवर व्हावीत, यावर दादांचा कायम कटाक्ष असायचा. दादांना मांसाहाराची आवड आहे. ते तितकेच आवडीने खिलवतात. सकाळी लवकर उठणे हे खरोखरच कौतुकास्पद आहे. दादांचा फिटनेस अफाट आहे. शिवस्वराज्य यात्रेदरम्यान ते माहूरगड न थांबता चढले. त्यानंतर मी दादांकडे पाहिल्यावर त्यांनी फक्त स्माइल दिले. त्यावर मी त्यांना म्हणालो, ‘युवर एज इज जस्ट नंबर.’ दादांचे हसणे आणि दादांना विनोद हा खूप वेगळा भाग आहे. साहेबांचा विनोद हा बोचरा आहे, परंतु दादांचा विनोद ओरखडे काढणारा आहे. ते विरोधकाला सहज नामोहरण करतात. मोकळ्या ढाकळ्या स्वभावामुळे अनेकदा गैरसमजुतींचे वादळ निर्माण होते. त्यांच्याविषयी वावड्या तयार केल्या जातात. त्याला दादा सोईस्करपणे उत्तर देतात. मोठ्या वटवृक्षाच्या सावलीत छोटे वृक्ष वाढत नाहीत. परंतु आदरणीय साहेबांच्या पावलावर पाऊल टाकत आमच्यासारख्या कार्यकर्त्यांसाठी हक्काचे सावली देणारे डेरेदार झाड दादांच्या रूपाने नक्की वाढले आहे.
मुंबई : प्रतिनिधी : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूनंतर राज्यातील तीन दिवसांचा दुखवटा पाळण्यात येणार आहे. तसेच आज शासकीय सुट्टी जाहीर करण्यात आली. महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने (राजशिष्टाचार) आदेश काढला आहे. आज बुधवारी सकाळी अजित पवारांचे बारामती येथे विमान अपघातात मृत्यू झाला. (Three days of mourning in Maharashtra)
महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने जारी केलेल्या अधिकृत पत्रात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे त्यांच्याविषयी आदर व्यक्त करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र राज्यात तीन दिवस (२८ जानेवारी २०२६ ते ३० जानेवारी २०२६) शासकीय शोक पाळला जाईल. या कालावधीत ज्या इमारतींवर नियमितपणे राष्ट्रध्वज फडकवला जातो, तिथे तो अर्ध्या काठीवर फडकवला जाईल. या तीन दिवसांच्या कालावधीत कोणताही अधिकृत मनोरंजन किंवा करमणुकीचा कार्यक्रम आयोजित केला जाणार नाही. तसेच आज शासकीय सुट्टीची घोषणा करण्यात आली. राज्यातील सर्व शासकीय कार्यालये बंद ठेवण्याची घोषणा केली आहे. त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत. हे आदेश महाराष्ट्र शासनाचे अवर सचिव ह. पं. बाविस्कर दिले आहेत. (Three days of mourning in Maharashtra)
नवी दिल्ली : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विमान अपघातात मृत्यू झाल्याने संपूर्ण देश हळहळला आहे. त्यांच्या निधनानंतर राष्ट्रपती द्रोपदी मुर्मु, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी श्रद्धाजंली वाहिली. सोशल मिडियावर श्रद्धाजंली वाहताना पंतप्रधान मोदी यांनी अजित पवारांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करत या दु:खाच्या क्षणी शोकाकुल कुटुंबियांना शक्ती, धैर्य मिळो अशी भावना व्यक्त केली आहे.
तळागाळाशी मजबूत नाळ असलेले नेते : नरेंद्र मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स पोस्ट करताना असे म्हटले आहे की , “महाराष्ट्रातील बारामती येथे झालेल्या दुर्दैवी विमान अपघातामुळे मी अत्यंत दुःखी आहे. या अपघातात आपल्या प्रियजनांना गमावलेल्या सर्वांच्या दुःखात मी सहभागी आहे. या दुःखाच्या क्षणी शोकाकुल कुटुंबांना शक्ती आणि धैर्य मिळो, ही प्रार्थना करतो. अजित पवार हे जनतेशी घट्ट नाते असलेले, तळागाळाशी मजबूत नाळ असलेले लोकनेते होते. महाराष्ट्रातील जनतेच्या सेवेत सदैव अग्रभागी राहणारे एक मेहनती व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांना व्यापक आदर होता. प्रशासकीय बाबींची त्यांना सखोल जाण होती. गरीब आणि वंचितांच्या सक्षमीकरणासाठीची त्यांची तळमळ विशेष उल्लेखनीय होती. त्यांचे अकाली निधन अत्यंत धक्कादायक आणि दुःखद आहे. त्यांच्या कुटुंबीयांप्रती आणि असंख्य चाहत्यांप्रती मनःपूर्वक शोकसंवेदना.” असे म्हणत आपल्या भावना व्यक्त केल्या. (President Murmu, Prime Minister Modi pay tribute to Ajit Pawar)
सहकारातील योगदान कायम स्मरणात राहील : द्रोपदी मुर्मु
राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांनी अजित पवारांच्या निधनाबद्दल श्रद्धाजंली वाहिली. त्यांनी शोकसंदेशात असे म्हटले आहे की, “महाराष्ट्रातील बारामती येथे झालेल्या विमान अपघातात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक जणांच्या मृत्युची बातमी ऐकून खूप दुःख झाले आहे. अजित पवार यांचे अकाली निधन हे एक कधीही भरून न येणारे नुकसान आहे. महाराष्ट्राच्या विकासात, खासकरून सहकार क्षेत्रात त्यांनी दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल ते नेहमीच स्मरणात राहतील. मी त्यांच्या कुटुंबियांना, समर्थकांना आणि चाहत्यांना माझ्या मनापासून संवेदना व्यक्त करते. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या सर्वांच्या कुटुंबियांनाही देव हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो.” असे म्हणत आदरांजली वाहिली आहे. (President Murmu, Prime Minister Modi pay tribute to Ajit Pawar)
महाराष्ट्राच्या राजकारणातील अढळ स्थान : नितीन गडकरी
“महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाचे वृत्त अतिशय धक्कादायक, दुर्दैवी आणि दुःखद आहे. त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली. गेली अनेक वर्षं राज्याच्या विधिमंडळात सोबत काम करताना अजितदादांशी अतिशय जवळचा संबंध राहिला आहे. त्यांचे प्रशासनिक कौशल्य, विकासात्मक दृष्टिकोन आणि लोकांना जोडण्याची हातोटी यांमुळे अजितदादांचे कायमच महाराष्ट्राच्या राजकारणात एक अढळ स्थान राहिले आहे. महाराष्ट्राच्या विकासाची आकांक्षा असलेल्या या लोकनेत्याचे अकाली निधन होणे, ही केवळ महाराष्ट्राचीच नव्हे, तर संपूर्ण देशाची कधीही भरून न निघणारी हानी आहे. या दुःखद प्रसंगी संपूर्ण पवार कुटुंबीयांसोबत माझ्या संवेदना आहेत. ईश्वर दिवंगत आत्म्यास शांती प्रदान करो.” अशी भावना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली आहे. (President Murmu, Prime Minister Modi pay tribute to Ajit Pawar)
पुणे : प्रतिनिधी : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पाच जणांचा विमान अपघातात मृत्यू झाला. बुधवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास बारामती विमानतळावर हा अपघात झाला. विमान बारामती विमानतळावर लँडिंग होताच मोठा स्फोट झाला. अजित पवारांच्या मृत्यूची बातमी कळताच संपूर्ण महाराष्ट्राला धक्का बसला. महाराष्ट्र शोकसागर बुडाला आहे. डीजीसीएने दिलेल्या अधिकृत माहितीनंतर अजित पवारांच्या मृत्यूची घोषणा करण्यात आली. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अंगरक्षक विदीप जाधव, पिंकी माळी, तसेच कॅप्टन सुमित कपूर आणि कॅप्टन शांभवी पाठक यांचा समावेश आहे. (Ajit Pawar dies in a plane crash)
डीजीसीएने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे विमानात होते. त्यांच्यासोबत इतर दोन लोक म्हणजे एक पीएसओ आणि एक अटेंडंट तसेच दोन क्रू मेंबर्सही होते. सुरुवातीच्या माहितीनुसार, अपघातात विमानातील कोणीही वाचले नाही. दरम्यान, राज्यामध्ये पंचायत समित्या आणि जिल्हा परिषद निवडणुकीसाठी रणधुमाळी सुरू आहे. बुधवारी अजित पवार यांचा बारामती दौरा होता. मुंबईहून बारामती दौऱ्यासाठी ते सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास बारामतीसाठी प्रस्थान केले होते. बारामतीमध्ये विमान लाँडिंग होत असतानाच विमानामध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने विमान अपघातग्रस्त झाले. विमान कोसळण्यापूर्वी विमानाचा मोठा आवाज येत होता. विमान कोसळताच मोठा स्फोट झाला. घटनास्थळी विमानतळावरील कर्मचारी आणि अधिकारी धावले. आग विझवण्याचा प्रयत्न करण्यात आला. घटनास्थळीच सहा जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवली. (Ajit Pawar dies in a plane crash)
दरम्यान, ही माहिती येताच खासदार सुप्रिया सुळे आणि खासदार सुनेत्रा पवार या दिल्लीवरून पुण्याकडे रवाना झाल्या आहेत. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांनी माध्यमांसमोर आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यांच्या अश्रूंचा बांध फुटल्याचे दिसून आले. यावेळी त्यांनी आम्ही पोरके झाल्याचे मत व्यक्त केले. दरम्यान, प्रफुल पटेल, अनिल देशमुख, खासदार निलेश लंके, आमदार धनंजय मुंडे यांनाही माहिती कळताच अश्रूंचा बांध फुटल्याचे दिसून आले. (Ajit Pawar dies in a plane crash)
महाराष्ट्राच्या राजकारणात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणारे परंतु बदलत्या राजकीय संस्कृतीशी तडजोड न करणारे ध्येयवादी नेते अलीकडच्या काळात राजकारणातू बाहेर फेकले गेले. गडहिंग्लजचे श्रीपतराव शिंदे हे त्यापैकीच एक. अखेरच्या श्वासापर्यंत समाजवादी विचारसरणीशी निष्ठा बाळगलेल्या श्रीपतराव शिंदे यांच्या पुढच्या पिढीने भाजपचा रस्ता धरला. श्रीपतरावांच्या कन्या स्वाती कोरी यांनी भाजपमध्ये प्रवेश करताना कोल्हापूर जिल्ह्यातल्या समाजवादाच्या शवपेटीवर शेवटचा खिळा ठोकला.
विजय चोरमारे
स्वाती कोरी यांची दखल घ्यावी, अशी परिस्थिती नाही. आणि त्यांचे राजकारणही तेवढे प्रगल्भ नाही. परंतु शेवटच्या श्वासापर्यंत समाजवादी विचारसरणीची कास न सोडणा-या श्रीपतराव शिंदे यांच्या कन्या म्हणून त्यांची दखल घेणे भाग पडते. भाजपमध्ये प्रवेश करून त्यांनी आपल्या वडिलांच्या विचारसरणीला श्रद्धांजली वाहिली म्हणून त्यांची दखल घेणे भाग पडते. परवा गडहिंग्लजमध्ये उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील, खासदार धनंजय महाडिक यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. (Final nail in the coffin of socialism was hammered in at Gadhinglaj)
मुश्रीफांच्या राजकारणाला कंटाळून भाजपात प्रवेश
वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या कागल मतदारसंघात गडहिंग्लज शहर येते. विधानसभेला मुश्रीफ यांचे वर्चस्व आहेच. परंतु आता नगरपरिषदही त्यांनी ताब्यात घेतली आहे. मुश्रीफ यांचा मुकाबला करण्यासाठी स्वाती कोरी यांनी नगरपालिका निवडणुकीत भाजप, जनसुराज्य शक्ति या पक्षांसोबत आघाडी केली होती. परंतु त्या आघाडीचा निभाव लागला नाही. नगरपालिका निवडणुकीत भाजपशी आघाडी करून एक पाऊल पुढे टाकलेल्या स्वाती कोरी यांनी थेट भाजपमध्ये प्रवेश करून पुढचे पाऊल टाकले आहे. सत्तेशिवाय राजकारण करण्याची कुणाचीच तयारी नसल्याचे त्यांच्या भाजप प्रवेशाने पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. मुश्रीफ यांच्या दबावाच्या राजकारणाला कंटाळून आपण भाजपमध्ये प्रवेश करीत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. (Final nail in the coffin of socialism was hammered in at Gadhinglaj)
काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात समाजवादीचा झेंडा
.गडहिंग्लज हा खरेतर मूळचा काँग्रेसचा बालेकिल्ला. साठ वर्षांपूर्वी तिथे जनार्दन पेडणेकर, एस. एन. खन्ना आणि श्रीपतराव शिंदे यांनी समाजवादी विचारसरणीचे बीज रोवले. पेशाने वकिल असलेल्या श्रीपतराव शिंदे यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरवात १९५६ साली समाजवादी पक्षातून झाली. १९७४ मध्ये त्यांनी गडहिंग्लज नगरपरिषदेची निवडणूक लढविली. नगरपालिका शिक्षण मंडळाचे ते पहिले सभापती बनले. नगरपालिकेनंतचा पुढचा टप्पा स्वाभाविकपणे विधानसभेचा होता. गडहिंग्लज हा काँग्रेसचा बालेकिल्ला. डॉ. एस. एस. घाळी हे स्थानिक पातळीवरील मोठे प्रस्थ होते. १९८५ साली डॉ. घाळी यांचा पराभव करून श्रीपतराव शिंदे पहिल्यांदा विधानसभेत पोहचले. त्यानंतर १९९० मध्ये त्यांनी विधानसभा निवडणुकीत बाबा कुपेकर यांना पराभूत केले. काँग्रेसमधील गटबाजीचा फायदा घेत त्यांनी दोन वेळा आमदारकी मिळवली. काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात त्यांनी समाजवादी विचारांच्या कार्यकर्त्यांची फळी निर्माण केली होती. निव्वळ सत्तेचे राजकारण न करता कार्यकर्त्यांची वैचारिक जडणघडण करण्याचा प्रयत्न ते करीत होते, त्याचेच फळ त्यांना विधानसभेच्या लागोपाठच्या दोन निवडणुकांमधील विजयाच्या रुपाने मिळाले.
गडहिंग्लज नगरपालिकेवर त्यांची सत्ता होती. गडहिंग्लज सहकारी साखर कारखाना हा अप्पासाहेब नलवडे यांनी स्थापन केलेला. स्वतः नलवडे त्यांना बारा-तेरा वर्षेच सत्ता मिळाली. उलट श्रीपतराव शिंदे यांनी तेवीस वर्षे कारखान्याचे अध्यक्षपद भूषवले.
आणीबाणीच्या काळात श्रीपतरावांनी दीड वर्षे तुरुंगवास भोगला. एस. एम. जोशी, नानासाहेब गोरे, ग. प्र. प्रधान, मधु दंडवते यांच्यासारख्या नेत्यांचे प्रेम आणि सहवास त्यांना लाभला. मूळचे आक्रमक स्वभावाचे श्रीपतराव शिंदे या थोर नेत्यांच्या सहवासात प्रगल्भ बनले. (Final nail in the coffin of socialism was hammered in at Gadhinglaj)
श्रीपतराव शिंदेंनी चळवळींना बळ दिले
राष्ट्र सेवा दलाच्या मुशीतून श्रीपतरावांच्या नेतृत्वाची घडण झाली होती. श्रोत्यांना आपले मुद्दे पटवून देण्यात माहीर होते. साखर कारखान्याचे अध्यक्षपद भूषवतानाही त्यांनी कारखान्याच्या माध्यमातून विविध चळवळींना बळ देण्याचा प्रयत्न केला. कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यात सहकारमहर्षी आप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील यांच्या नेतृत्वाखाली श्री दत्त साखर कारखाना होता. त्या माध्यमातून अप्पासाहेब समाजवादी परिवारातील संस्थांना, विविध चळवळींना मदत करीत होते. तोच वसा त्यांचे पुत्र गणपतरावदादा पाटील चालवत आहेत. श्रीपतराव शिंदे यांनीही तोच कित्ता गिरवला. साखर कारखान्याच्या सत्तेचा विधायक वापर केला. अशाच प्रकारे सांगली जिल्ह्यातील वाळवा येथे क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी यांच्या नेतृत्वाखाली हुतात्मा किसन अहिर शेतकरी सहकारी साखर कारखाना चळवळींचा ऊर्जास्त्रोत म्हणून काम करीत होता. श्रीपतराव शिंदे यांच्याकडे गडहिंग्लज नगरपालिकेची सत्ताही अनेक वर्षे होती. नगरपालिकेमार्फत अनेक साहित्यिक, सांस्कृतिक उपक्रम राबवले.
एकूण राजकीय कारकिर्दीत श्रीपतरावांनी आठवेळा विधानसभा, एकदा लोकसभा, दोन वेळा जिल्हा परिषद, एकदा विधानपरिषद निवडणूक लढवली. दोनवेळा ते आमदार झाले. राजकारणात वाटचाल करतानाच गडहिंग्लज उपविभागातील गरीब व गरजू विद्यार्थ्यांसाठी त्यांनी डॉ. ए. डी. शिंदे अभियांत्रिकी पदवी व पदविका महाविद्यालय सुरू केले. राधाबाई शिंदे फार्मसी महाविद्यालय, रचना पब्लिक स्कूलची स्थापना केली. संस्थात्मक काम म्हणावे तर एवढेच.
एक प्रसंग मुद्दाम सांगण्याजोगा आहे
१९९९च्या विधानसभा निवडणूकीत जनता दलाने राष्ट्रवादी काँग्रेसशी आघाडी केली होती. आघाडीच्या धोरणानुसार विद्यमान आमदारांना उमेदवारी देण्यात येणार होती. गडहिंग्लजमधून १९९५ साली बाबा कुपेकर निवडून आले होते. कुपेकर हे राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार आणि त्यातही शरद पवार यांचे अत्यंत जवळचे. स्वाभाविकपणे ती जागा त्यांच्याकडे जाणार होती. श्रीपतराव शिंदे यांचीही मतदारसंघात मजबूत व्होटबँक. १९८५ आणि १९९० अशा दोनवेळा ते निवडून आले होते. यावेळी श्रीपतरावांनी विधानसभेचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी तहसिलदार कार्यालयावर मोठी मिरवणूक काढली. शक्तिप्रदर्शन केले. कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह होता. अर्ज भरण्यापूर्वी झालेल्या प्रचंड सभेत त्यांनी अचानक जाहीर केले की, आघाडीचा धर्म म्हणून मी अर्ज भरणार नाही, आपण बाबा कुपेकर यांचे काम करावयाचे आहे. उभी हयात कुपेकर यांच्याविरोधात लढण्यासाठी घालवलेल्या कार्यकर्त्यांची काय प्रतिक्रिया झाली असेल कल्पना केलेली बरी. कार्यकर्त्यांनी प्रचंड विरोध केला. आक्रोश केला. परंतु श्रीपतराव बधले नाहीत. आपल्या निश्चयापासून ढळले नाहीत. त्या निवडणुकीत त्यांनी कुपेकर यांना पाठिंबा दिला आणि कुपेकर मोठ्या मताधिक्क्याने निवडून आले.
श्रीपतराव शिंदे केवळ राजकीय नेते नव्हते, तर गडहिंग्लज, चंदगड, आजरा, निपाणी, संकेश्वर या परिसरातील विविध परिवर्तनवादी चळवळींचे पाठिराखे होते. व्यक्तिगत राजकारणासाठी अडचणीच्या ठरणाऱ्या अनेक चळवळींमध्ये त्यांनी सहभाग घेतला. चळवळ आणि राजकारण याची कधी गल्लत केली नाही, की आपल्या राजकारणासाठी कुठल्या चळवळीचा कधी बळी घेतला नाही.
अखरेपर्यंत धर्मनिरपेक्ष विचारांची कास धरली
धर्मांध शक्तिंच्या आव्हानाचा मुकाबला करण्यासाठी व्यक्तिगत नुकसान सोसून त्यांनी शक्य त्या सर्व तडजोडी केल्या. अखेरपर्यंत त्यांनी धर्मनिरपेक्ष विचारधारेची कास सोडली नाही. कम्युनिस्ट पक्षाचे गोविंदराव पानसरे, शेतकरी कामगार पक्षाचे प्रा. एन. डी. पाटील हे कोल्हापूर जिल्ह्यातील महाराष्ट्राला ज्ञात असलेले मोठे नेते. सत्तेच्या माध्यमातून रचनात्मक काम उभे करणारे श्रीपतराव शिंदे त्याच पंगतीतले तेवढ्याच तोलामोलाचे नेते होते. श्रीपतरावांनी आयुष्यभर ज्या शक्तिंविरोधात संघर्ष केला त्याच शक्तिंच्या कळपात त्यांच्या कन्या स्वाती कोरी यांनी प्रवेश केला आहे.
श्रीपतराव शिंदे यांचा गडहिंग्लजमध्ये दखलपात्र गट होता. त्याचे नेतृत्व स्वाती कोरी यांच्याकडे होते. आता त्या भाजपमध्ये गेल्या आहेत. श्रीपतरावांचे कार्यकर्ते हे विचारांशी बांधिलकी असणारे होते. त्यामुळे ते त्यांच्यासोबत किती प्रमाणात जातात, हे पाहावे लागेल. (Final nail in the coffin of socialism was hammered in at Gadhinglaj)
बेळगाव : प्रतिनिधी : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागच्या वतीने मराठी अस्मिता व सीमाप्रश्नी जागृतीसाठी आयोजित करण्यात आलेल्या मराठी सन्मान यात्रेचा प्रारंभ किल्ले रायगडावरून करण्यात आला.
किल्ले रायगड येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीला भेट देऊन तिथे अभिवादन करण्यात आले.बेळगाव आणि परिसरातून गेलेल्या अडीचशेहून अधिक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. होळीचा माळ येथील शिवरायांच्या मूर्तीला अध्यक्ष शुभम शेळके,कार्याध्यक्ष धनंजय पाटील,सरचिटणीस मनोहर हुंदरे,खानापूर समितीचे सरचिटणीस आबासाहेब दळवी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. (Marathi Sanman Yatra commenced from Raigad)
शिवरायांना अभिवादन झाल्यानंतर याच ठिकाणी छोट्याशा सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेच्या दरम्यान शेकडो कार्यकर्त्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला. होळीचे माळ येथून येळ्ळूर भजनी मंडळाच्या अभंगांच्या गजरात शिवकालीन बाजारपेठेतून मिरवणूक काढण्यात आली यामध्ये सीमालढयातील पहिल्या पिढीपासून ते चौथ्या पिढीचे बालकही सामील होते. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या समाधीचे दर्शन घेऊन तेथील पवित्र मातीचे संकलन करून सीमाप्रश्नी एकजुटीची शपथ घेण्यात आली. (Marathi Sanman Yatra commenced from Raigad)
सीमाप्रश्न लवकरात लवकर सोडवून घेण्यासाठी महाराष्ट्रासह केंद्रसरकारवर दबाव आणण्यासाठी उठाव करावा व उदासीन महाराष्ट्र सरकारला जाग करण्यासाठी मराठी सन्मान यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. पुढील काळात अनेक गावात मराठी सन्मान यात्रा काढून जागरूकता निर्माण करण्यात येणार आहे. (Marathi Sanman Yatra commenced from Raigad)
मुंब्य्राचा रंग तिरंगा आणि तिरंगाच राहणार; जितेंद्र आव्हाड यांचे प्रत्यूत्तर
जमीर काझी : मुंबई : ‘ कैसे हराया…..?’आणि पुरा मुंब्रा हरा करेंगे ” या दोन उपरोधिक टोल्यामुळे केवळ राज्यातच नव्हे तर पूर्ण देशात चर्चेत आलेल्या मुंब्रा महापालिकेतील एमआयएम पक्षाची नवनियुक्त नगरसेविका सहर शेख हिला आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रत्यूत्तर दिले आहे. मुंब्र्याचा रंग तिरंगा असून तो कायमच तिरंगा राहील, असे सांगत बालिश वक्तव्यावर बोलणे योग्य नाही, असे सांगितले.
जितेंद्र आव्हाड यांनी निवडणुकीचे तिकीट नाकारल्याने अखेरच्या क्षणी एमआयएममधून उमेदवार मिळवित सहर शेख हिने आपल्यासह पॅनेल मधील पक्षाचे चारही जणांना निवडून आणले. त्याबद्दल झालेल्या विजयी रॅली मध्ये त्यांनी आव्हाड यांना उद्देशून कैसे हराया…?, असे म्हणत हिणवले होते. तर त्यानंतर येत्या पाच वर्षात मुंब्रा हिरवा करू, असे वक्तव्य केले. त्यामुळे भाजपाकडून त्याच्या या विधाना विरुद्ध तीव्र प्रतिक्रिया उमटल्याने राज्यात हा विषय चर्चेचा विषय ठरला. (Jitendra Awhad’s response)
मात्र आव्हाड यांनी त्याबद्दल काहीही प्रतिक्रिया दिली नव्हती. आज राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने विजयी नगरसेववकांची रॅली काढण्यात आली. यावेळी आव्हाड यांनी सहर शेखच्या हिला एक लहान मुलगी म्हणत तिचे वक्तव्य बालिशपणाचे असल्याचेही सांगितले. ते म्हणाले, ‘मुंब्रा हा तिरंगा आहे, इथे तिरंगाच राहणार आज काल प्रत्येक गल्लीबोळात ही घोषणा असते, हे नवीन पोरं जे असतात ते अशा कल्पक घोषणा करतात. काहींनी आव्हान दिले. ते त्यांचे काम असते. आपण त्यासाठी काही करत नाही, आपण आपल्या मनाप्रमाणे वागत असतो, असे म्हणत या वक्तव्यावर अधिक बोलणे आव्हाड यांनी टाळले. तसेच, ‘हाथी चले अपली चाल, कुत्ते भोके हजार’ म्हणत असे एखादी लहान पोरगी मिश्किलपणाने बोलते तर तिचं फार म्हणजे सोशल मीडियावरती तिच्या बालिशपणाची क्रेझ आहे, तिच्या त्या वक्तव्याला खूप काही अर्थ नाही. म्हणजे माझी लहान पोरगी हसत हसत म्हटली… चॉकलेट लाया.. तर तेही गाजेल त्यात काय विशेष नाही, असा पलटवार जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं. तसेच, मुंब्रा तिरंगा है, हा देश तिरंगा आहे, हा महाराष्ट्र तिरंगा आहे आणि मुंब्रा तिरंगा आहे. संविधानाने तिरंगा रंग दिलाय, तुम्ही कुठल्याही एका रंगाची मोनोपॉली या देशात आणू शकत नाही. असेही त्यांनी सांगितले. (Jitendra Awhad’s response)
मुंबई : प्रतिनिधी: छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ दरम्यान मेट्रो मार्गिका ८ च्या ३५ किलोमीटरच्या जोडणीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आयोजित मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. यासोबतच ६६ किलोमीटर लांबीचा नाशिक शहर परिक्रमा मार्ग महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून करण्यास आणि गडचिरोली जिल्ह्यात खनिज वाहतुकीसाठी नवेगाव मोर ते सुरजागड या चार पदरी सिमेंट काँक्रिट महामार्गाच्या सुधारित आखणीस मान्यता देण्यात आली.
बैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवार, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, अपर मुख्य सचिव (वित्त) ओ. पी. गुप्ता, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ व्यवस्थापकीय संचालक डॉ. अनिल गायकवाड, महाराष्ट्र राज्य पायाभूत विकास महामंडळ व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित आदी उपस्थित होते. बैठकीमध्ये अपर मुख्य सचिव (सार्वजनिक बांधकाम विभाग) मनीषा म्हैसकर आणि सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी सादरीकरण केले. (Mumbai airport will be connected to Navi Mumbai airport by metro)
पायाभूत सुविधा प्रकल्पाला आवश्यक असलेले भूसंपादन आणि सर्व प्रकारच्या परवानग्या प्राप्त करून घेण्याची कार्यवाही प्रकल्प सुरू होण्यापूर्वी पूर्ण करावी, असे आदेश मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिले. तसेच कुठलाही पायाभूत सुविधा प्रकल्प भूसंपादनानंतर पुढील तीन वर्षात पूर्ण करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, पायाभूत सुविधा प्रकल्पांची कामे वेळेत पूर्ण करण्यात यावी. कुठल्याही परिस्थितीत कामे रेंगाळू नये, काम पूर्ण होण्यास विलंब लागल्यास प्रकल्पाच्या खर्चामध्ये वाढ होते. नागपूर ते गोंदिया, भंडारा ते गडचिरोली या समृद्धी महामार्गाच्या विस्तारित कामांना गती द्यावी. प्रकल्प कार्यादेश देतानाच प्रकल्प पुढील तीन वर्षात पूर्ण करण्याची अट करण्यात यावी. गडचिरोली जिल्ह्यातील महामार्गाचे काम करीत असताना रस्त्याच्या बाजूला गॅस वाहिनीसाठी जागेची उपलब्धता असल्याची खात्री करावी. भविष्यात सुरजागडपर्यंत गॅस वाहिनी कार्यान्वित करण्यात येणार आहे. त्यासाठी आतापासून जागेची तरतूद महामार्गाच्या बाजूला करण्यात यावी, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. (Mumbai airport will be connected to Navi Mumbai airport by metro)
पायाभूत प्रकल्पांविषयी…
- छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला मेट्रो लाईन ८ जोडणीस मान्यता.
- मेट्रो मार्गाची एकूण लांबी ३५ किलोमीटर, भूमिगत मार्ग ९.२५ किलोमीटर, उन्नत मार्ग २४.६३६ किमी, एकूण २० स्थानके, ६ स्थानके भूमिगत, १४ स्थानके उन्नत.
- छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ टर्मिनल २ स्थानक ते घाटकोपर (पूर्व) पर्यंत भूमिगत स्थानके.
- घाटकोपर (पश्चिम) स्थानक ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ टर्मिनल दोन स्थानकापर्यंत उन्नत स्थानके, दोन स्थानकांतील सरासरी अंतर 1.9 किलोमीटर.
- ३०.७ हेक्टर भूसंपादनाची आवश्यकता, भूसंपादनासाठी ३८८ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित. प्रकल्प पूर्ण होण्यासाठी एकूण २२ हजार ८६२ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित. (Mumbai airport will be connected to Navi Mumbai airport by metro)