Home » Blog » काँग्रेसचे माजी केंद्रीय मंत्री सुरेश कलमाडी यांचे निधन

काँग्रेसचे माजी केंद्रीय मंत्री सुरेश कलमाडी यांचे निधन

by प्रतिनिधी
0 comments
Suresh Kalmadi has passed away

पुणे : प्रतिनिधी : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय मंत्री पुण्याचे माजी खासदार सुरेश कलमाडी (वय ८२) यांचे निधन झाले आहे. अनेक दिवसांपासून सुरेश कलमाडी हे आजारी होते . मंगळवारी पहाटे साडे तीन वाजण्याच्या सुमारास त्यांनी प्राणज्योत  मालवली. त्यांच्यावर दुपारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे, अशी माहिती मिळत आहे.

गेल्या काही वर्षांपासून कलमाडी हे सक्रिय राजकारणापासून दूर होते. अलीकडेच त्यांना प्रकृती बिघडल्याने दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. परंतु, मंगळवारी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास त्यांचे निधन झाले. त्यांच्यावर पुण्यातील वैकुंठभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. (Suresh Kalmadi has passed away)

सुरेश कलमाडी यांचा जन्म १ मे १९४४ मध्ये झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण सेंट व्हिन्सेंट हायस्कूलमध्ये झाले. त्यानंतर त्यांनी पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयातून उच्च शिक्षण पूर्ण केले. त्यांनी १९६० मध्ये नॅशनल डिफेन्स अकॅडमी मध्ये प्रवेश घेतला. १९६४ ते १९७२ या काळात त्यांनी भारतीय हवाई दलात पायलट म्हणून सेवा बजावली. त्यांनी १९६५ आणि १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धांमध्ये सक्रिय सहभाग घेतला होता.

१९७७ मध्ये कलमाडी यांनी पुणे युवक काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून राजकीय प्रवासाला सुरुवात केली. ते पुण्यातून तीन वेळा लोकसभेवर निवडून आले. तसेच त्यांनी चार वेळा राज्यसभा सदस्य म्हणूनही काम केले. पी. व्ही. नरसिंह राव यांच्या सरकारमध्ये ते रेल्वे राज्यमंत्री होते. रेल्वे अर्थसंकल्प सादर करणारे ते पहिले राज्यमंत्री ठरले होते. (Suresh Kalmadi has passed away)

कलमाडी  हे १९९६  ते २०१२  या प्रदीर्घ काळासाठी  भारतीय ऑलिंपिक संघटनाचे अध्यक्ष होते. त्यांनी एशियन ॲथलेटिक्स असोसिएशनचे अध्यक्ष आणि भारतीय ॲथलेटिक्स महासंघाचे अध्यक्ष म्हणूनही काम पाहिले. पुण्यात दरवर्षी होणारी ‘पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन’ आणि ‘पुणे फेस्टिव्हल’ सुरू करण्याचे श्रेय कलमाडी यांना जाते. पुण्यात बालेवाडी येथे झालेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे यशस्वी आयोजन केले होते. पुण्याच्या राजकारणावर त्यांचे काही काळ वर्चस्व होते. क्रीडा क्षेत्रातील कुशल संघटक म्हणून त्यांची ओळख होती. (Suresh Kalmadi has passed away)

२०१० मध्ये दिल्लीत झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेच्या आयोजनात भ्रष्टाचार झाल्याच्या आरोपावरून कलमाडी यांना २०११मध्ये अटक करण्यात आली होती आणि काही काळ तुरुंगवासही झाला होता. तब्बल १५ वर्षांनंतर, २०२५ मध्ये अंमलबजावणी संचालनालयाने या प्रकरणी त्यांच्याविरोधात कोणतेही ठोस पुरावे नसल्याचे सांगत न्यायालयात क्लोजर रिपोर्ट सादर केला. न्यायालयाने तो मान्य केल्याने कलमाडी यांना या सर्व आरोपांतून क्लीन चीट मिळाली. (Suresh Kalmadi has passed away)

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00