जयसिंगपूर : प्रतिनिधी : स्वाभिमानी शेतकरी संघटनेची २४ वी ऊस परिषद जयसिंगपूर येथील विक्रमसिंह क्रीडांगणावर गुरूवारी १६ ॲाक्टोंबर रोजी होणार असल्याची माहिती माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिली. जयसिंगपूर येथील कल्पवृक्ष गार्डन येथे झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. (Sugarcane Council)
यावेळी बोलताना राजू शेट्टी म्हणाले कि गेल्या पाच वर्षापासून ऊसदराच्या एफ.आर.पी मध्ये वाढ झाली मात्र शेतकऱ्यांना वाढीव एफ.आर.पी चा कोणताच फायदा झाला नाही. खते, बि -बियाणे, किटकनाशके, मजूरी, मशागत व तोडणी- वाहतूक यामध्ये भरमसाठ वाढ झाली आहे. केंद्र सरकार व राज्य सरकार साखर उद्योगात दुर्लक्ष करू लागल्याने साखरेसह उपपदार्थाबाबत चुकीचे निर्णय होवू लागले आहेत. (Sugarcane Council)
साखर कारखान्यांना अंतराची अट घालून नवीन परवाने देणे बंद केले आहेत मात्र दुसरीकडे याच कारखान्याचे गाळप परवाने तिप्पट व चौपटीने वाढवू लागले आहेत. देशातील व राज्यातील साखर कारखानदार एकत्रित येवून उस उत्पादक शेतक-यांना संकटात आणण्यासाठी एफ.आर.पी मध्ये मोडतोड करण्याचा प्रयत्न करू लागले आहेत. केंद्रातील व राज्यातील मुख्यमंत्र्यांसह मंत्री तसेच प्रशासकीय अधिकारी व झारीतील शुक्राचार्य याला पाठबळ देत आहेत, असा आरोप राजू शेट्टी यांनी केला.
राजू शेट्टी म्हणाले, राज्य साखर संघ व राज्य सरकार एकत्रित येवून बेकायदेशीररित्या एक रक्कमी एफ.आर.पी मोडतोड करून दोन किंवा तीन टप्यात देण्यासाठी प्रयत्न करू लागले आहेत. सध्या राज्याच्या उच्च न्यायालयात एक रक्कमी एफ.आर.पी ची लढाई जिंकली आहे. या निर्णयाविरोधात राज्य सरकार व राज्य साखर संघ सर्वोच्च न्यायालयात गेले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने या आव्हान याचिकेस स्थगिती दिली नसली तरीही ऊस उत्पादक शेतकऱ्यांना कायदेशीर अडकविण्याचा कट रचला जात आहे. (Sugarcane Council)
राज्यातील उस उत्पादक शेतकऱ्यांना यापुढे संघटित होवून लढाई लढण्याची गरज आहे. रिकव्हरी चोरी , काटामारी व साखर उत्पादन खर्चात वाढ करून गेल्या पाच वर्षापासून साखर कारखानदार उस उत्पादकांना २८०० ते ३००० हजार पर्यंतच दर देवू लागले आहेत. नैसर्गिक आपत्ती, महापूर , अतिवृष्टी यासारख्या अस्मानी व सुल्तानी संकटाने शेतकरी रसातळाला गेला आहे, याकडे शेट्टी यांनी लक्ष वेधले.
स्वाभिमानीच्यावतीने २४ व्या ऊस परिषदेनिमित्त् सांगली , कोल्हापूर , सोलापूर , सातारा , उत्तर कर्नाटक याठिकाणी शेतकरी मेळावे घेतले जाणार आहेत. या मेळाव्यास जिल्हाध्यक्ष अजित पोवार, धनाजी पाटील, राजाराम देसाई, विठ्ठल मोरे, राजेंद्र गड्यान्नावर, आण्णासो चौगुले, बाळासाहेब पाटील, वसंत पाटील, जयकुमार कोले, महेश खराडे, यांच्यासह सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.