मुंबई : शेअर बाजारावर आठवड्याच्या प्रारंभीच (सोमवारी) विक्रीचा प्रचंड मारा झाला. त्यामुळे मुंबई शेअर निर्देशांकासह निफ्टीही कोसळला. विदेशी गुंतवणूकदारांनी काहीशा विरामानंतर शुक्रवारी ४,२२७.२५ कोटी समभागांची रक्कम काढून घेतली. त्याचा परिणाम सोमवारी बाजारावर झाला. त्यातच एचएमपीव्ही व्हायरस संसर्गाचा परिणामही बाजारावर तत्काळ जाणवला. दुसरीकडे कमकुवत रुपया आणि आशियाई बाजारातील खराब कामगिरीमुळे परिस्थिती आणखी बिकट झाली. परिणामी बाजार कोसळल्याने गुंतवणूकदारांना १०.९८ लाख कोटीला फटका बसला. (Stock Market Crash )
मुंबई शेअर बाजार १२५८.१२ अंकांनी घसरला. तो ७८,००० अंकांवरून ७७,९६४.९९ वर बंद झाला. तर निफ्टी ३८८.७० अंकांनी म्हणजेच १.६२ टक्क्यांनी घसरून २३, ६१६.०५ वर आला.(Stock Market Crash )
‘बीएसई’तील टाटा स्टील, एनटीपीसी, कोटक महिंद्रा बँक, इंडसइंड बँक, पॉवर ग्रिड, झोमॅटो, अदानी पोर्ट्स, एशियन पेंट्स, महिंद्रा अँड महिंद्रा आणि रिलायन्स इंडस्ट्रीजला लक्षणीय फटका बसला. टायटन आणि सन फार्माने सकारात्मक कामगिरी केली.
‘मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेस’च्या वेल्थ मॅनेजमेंटचे संशोधन प्रमुख सिद्धार्थ खेमका म्हणाले, ‘एचएमपी विषाणूचा प्रादुर्भाव आणि बँकिंग समभागांमध्ये मोठी घसरण झाली. त्यामुळे भारतीय समभागांना विक्रीच्या तीव्र दबावाचा सामना करावा लागला.’(Stock Market Crash )
- बाजार कोसळण्याची प्रमुख कारणे
- विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी शुक्रवारी ४,२२७.२५ कोटी रुपयांच्या इक्विटी काढून घेतल्या.
- चीनमध्ये सापडलेल्या ह्युमन मेटाप्युमो व्हायरसचे (एचएमपीव्ही) कर्नाटक आणि गुजरातेत एकूण तीन रुग्ण आढळले. त्यामुळे गुंतवणूकदारांनी सावध भूमिका घेतली.
- या आठवड्यात मोठ्या कंपन्यांतील मंद वाढीबद्दल गुंतवणूकदार सावध आहेत. नफा कमाईसाठी ते ‘वेट ॲण्ड वॉच’च्या भूमिकेत आहेत.