Home » Blog » Sindhu : सिंधू उपांत्यपूर्व फेरीत पराभूत

Sindhu : सिंधू उपांत्यपूर्व फेरीत पराभूत

पुरुष एकेरीत किरण जॉर्जेचे आव्हानही संपुष्टात

by प्रतिनिधी
0 comments
Sindhu

नवी दिल्ली : भारताची आघाडीची महिला बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूला इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेमध्ये एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले. पुरुष एकेरीमध्ये भारताचा किरण जॉर्जही उपांत्यपूर्व फेरीत पराभूत झाला. (Sindhu)

उपांत्यपूर्व फेरीत इंडोनेशियाच्या चौथ्या मानांकित जॉर्जिया मरिस्का तुनजंगने सिंधूचा २१-९, १९-२१, २१-१७ असा पराभव केला. हा सामना १ तास २ मिनिटे रंगला. विवाहबद्ध झाल्यानंतर सिंधूची ही पहिलीच स्पर्धा होती. सामन्यातील पहिला गेम ९-२१ असा गमावल्यानंतर सिंधूने दुसऱ्या गेममध्ये खेळ उंचावला. हा गेम २१-१९ असा जिंकून सिंधूने सामन्यात बरोबरी साधली. तिसऱ्या गेममध्ये दोन्ही खेळाडूंदरम्यान प्रत्येक गुणासाठी चुरस पाहायला मिळाली. तथापि, निर्णायक क्षणी जॉर्जियाने सिंधूला मागे टाकले आणि हा गेम २१-१७ असा जिंकून विजय निश्चित केला. उपांत्य फेरीमध्ये जॉर्जियाचा सामना दक्षिण कोरियाच्या अग्रमानांकित से यंग ॲनशी होईल. (Sindhu)

पुरुष एकेरीत चीनच्या वेंग हाँग यांगने किरण जॉर्जला २१-१३, २१-१९ असे पराभूत केले. पुरुष एकेरीमध्ये उपांत्यपूर्व फेरीपर्यंत पोहोचलेला किरण हा भारताचा एकमेव खेळाडू होता. पहिल्या गेममध्ये वेंगने किरणला फारशी प्रतिकाराची संधी दिली नाही. दुसऱ्या गेममध्ये मात्र किरणने सामन्यात पुनरागमन करण्याचे कसोशीने प्रयत्न केले. एका टप्प्यावर या गेममध्ये तो १५-१४ ने आघाडीवर होता. मात्र, वेंगने मोक्याच्या क्षणी प्रभावी खेळ करत ही आघाडी मोडून काढली. दुसरा गेम २१-१९ असा जिंकून वेंगने ५१ मिनिटांत विजयावर शिक्कामोर्तब केले. उपांत्य फेरीत त्याचा सामना हाँगकाँगच्या ली चेयूक यू याच्याशी होणार आहे. (Sindhu)

हेही वाचा :
अन्यथा खेळाडूंना ‘आयपीएल’बंदी

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00