माणसांच्या जगातल्या चकित करणा-या प्रेमकहाण्या अधुनमधून समोर येत असतात. देशाच्या सीमा ओलांडून आणि संरक्षण कवच भेदून परस्परांना भेटलेल्या प्रेमी जिवांच्या अशा कहाण्या वेळोवेळी चर्चेत येतात. अशीच एक प्रेमकहाणी समोर आली आहे, परंतु ती माणसांच्या जगातली नाही, तर प्राण्यांच्या जगातली आहे. जगाला आश्चर्यचकित करणारी ही कहाणी आहे वाघ-वाघिणीची. प्राण्यांमधील प्रेमाची, विरहाची आणि परस्पर ओढीने एकत्र आलेल्या वाघ-वाघिणीची ही सुफळ संपूर्ण प्रेमकहाणी सध्या जगभरात चर्चेत आहे. माणसं प्रेमासाठी मैलोगणिक प्रवास करू शकतात, तर वाघही तसा प्रवास करू शकतात, हेच या कहाणीतून दिसून आले आहे.(Siberian Tiger Love story)
अनाथ बछड्यांचे संगोपन (Siberian Tiger)
रशियातील सिक्होटे-आलिन पर्वतरांगांमध्ये २०१२ साली सायबेरियन वाघाचे दोन अनाथ बछडे, बोरिस आणि स्वेतलया यांना वाचवण्यात आले. तसा त्यांचा परस्परांशी संबंध नव्हता. त्यांना निम्न-जंगली वातावरणात वाढवण्यात आले. त्याठिकाणी वैज्ञानिकांनी त्यांना जंगलातल्या राहणीमानासाठी तयार केले. त्यांचा मानवी संपर्क मर्यादित ठेवला. हे बछडे अठरा महिन्यांचे झाल्यानंतर त्यांना स्वतंत्र करण्यात आले. २०१४ साली दोघांना एकमेकांपासून वेगळे करून दोनशे किलोमीटरहून अधिक अंतरावर सोडण्यात आले. (Siberian Tiger)
तीन वर्षे वाघाचा सतत प्रवास (Siberian Tiger)
या काळात वैज्ञानिक आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने दोन्ही वाघांवर नजर ठेवून होते. वाघ आपल्या मर्यादित क्षेत्रात फिरत असतात. परंतु बोरिस वाघाचे वर्तन इतर वाघांपेक्षा वेगळे होते. वैज्ञानिकांना त्याच्या वागण्याबद्दल कुतूहल वाटू लागले. त्यामुळे ते त्याच्यावर बारीक नजर ठेवू लागले. वाघांच्या परिचित वर्तनापेक्षा बोरिस वेगळे वागत होता. अखेरच्या टप्प्यात तीन वर्षे सतत तो प्रवास करीत होता. तीन वर्षे प्रवास करून तो दोनशे किलोमीटरवर असलेल्या आपल्या जोडीदाराज,वळ स्वेतलयाजवळ पोहोचला. वाटेत अनेक अडथळे आले, त्या अडथळ्यांना पार करून मोठ्या जिद्दीने बोरिसने दोनशे किलोमीटरचा हा प्रवास केला. बोरिसचा प्रवास म्हणजे माणसांसारखा महामार्गावरचा प्रवास नव्हता. मळलेल्या वाटेवरचा प्रवास नव्हता. कुठल्या वाहनातून प्रवास नव्हता. जंगले, द-याखो-या पार करत तो प्रवास करीत होता. तीन वर्षे प्रवास करून तो आपली जोडीदार स्वेतलयापाशी पोहोचला. ताटातूट झालेल्या बोरिस आणि स्वेतलयाची तब्बल दहा वर्षांनी पुनर्भेट झाली. तेव्हा प्राणीही प्रेमासाठी वाट्टेल ते करू शकतात, याची प्रचिती वैज्ञानिकांना आली. प्रेमाची भावना, मग ती माणसांमधील असो किंवा प्राण्यांमधील, कोणतेही अडथळे पार करून इच्छित स्थळी पोहोचत असते, हेच या उदाहरणावरून दिसून येते.
बोरिस आणि स्वेतलया यांची पुन्हा भेट झाल्यानंतर अवघ्या सहा महिन्यांतच त्यांच्या घरात पाळणा हलला. त्यांनी बछड्याला जन्म दिला. या गोष्टीमुळे अभ्यासक आश्चर्यचकित झाले आहेत. वाघांची संख्या वाढण्यास यामुळे मदत होईल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. वाघांना योग्य रितीने वाढवले आणि शिकारीचे प्रशिक्षण दिले तर त्यांना यशस्वीपणे जंगलात सोडता येऊ शकते, असे तज्ज्ञांनी म्हटले आहे. मात्र, ही प्रक्रिया अत्यंत काळजीपूर्वक आणि योजनाबद्ध रीतीने करण्याची आवश्यकता असते.
सायबेरियन वाघ (Siberian Tiger)
सायबेरियन वाघ, ज्याला अमूर वाघ म्हणूनही ओळखले जाते, हा वाघांच्या भव्य आणि सामर्थ्यशाली उपप्रजातींपैकी एक आहे. रशियाच्या पूर्व भागात तो आढळतो. बेकायदेशीर शिकार आणि मानव-वाघ संघर्ष यामुळे त्यांची संख्या कमी होऊ लागली आहे. सायबेरियन वाघाला आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संघाच्या (IUCN) रेड लिस्टमध्ये लुप्तप्राय प्रजाती म्हणून सूचीबद्ध करण्यात आले आहे.
https://x.com/supriyasahuias/status/1868159309877817507