मुंबई : केंद्रीय अर्थसंकल्पाच्या पूर्वसंध्येला शेअर बाजारात नवचैतन्य परसरल्याचे दिसून आले. विशेषत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अर्थसंकल्पाविषयीच्या आशावादामुळे बाजारात तेजी दिसून आली. (Sensex hike)
जबरदस्त आशावादातून सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही प्रमुख निर्देशांकांसाठी सलग चौथे सत्र मजबूत कमाईचे राहिले. बीएसई सेन्सेक्सला ७७,५००, तर एनएसई निफ्टीने २३,५०० या महत्त्वाच्या पातळ्यांना त्यामुळे ओलांडता आले.
शुक्रवारी व्यवहारात मुंबई शेअर निर्देशांक ७४०.७६ अंकांच्या दमदार कमाईसह ७७,५००.५७ या पातळीवर स्थिरावला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी २५८.९० अंशांची भर घालून २३,५०८.४० वर बंद झाला. बाजारात झालेल्या सर्वव्यापी खरेदीने दोन्ही निर्देशांकांनी जवळपास एक टक्क्यांची वाढ साधली.
शेअर बाजारातील ही सलग चौथा सकारात्मक बातमी अर्थसंकल्पाच्या महत्त्वपूर्ण घडामोडीबाबत अपेक्षा स्तरही उंचावणारी असल्याचे सुचविणारी आहे.
काय म्हणाले मोदी?
पंतप्रधानांनी आपल्या भाषणात मध्यमवर्गीय, महिला आणि गरीब या त्रिसूत्रीवरच संभाव्य धोरणांतून लक्ष केंद्रीत केले जाईल असे संकेत दिले. यंदाच्या अर्थसंकल्पात समावेशकता (Inclusion), गुंतवणूक (Investment) आणि नाविन्यता (Innovation) यावर भर दिला जाईल, असेही त्यांनी सूचित केले. देशापुढची सध्याची आर्थिक आव्हाने आणि लोकांच्या आस-अपेक्षांचा समतोल अर्थसंकल्प साधेल, अशा आशांना प्रत्यक्षरूप मिळेल असाच त्यांच्या भाषणाचा रोख राहिला. (Sensex hike)
अर्थसंकल्पाआधी लोकसभेपुढे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आर्थिक पाहणी अहवाल सादर केला. यात भारतीय अर्थव्यवस्थेत सर्व काही आलबेल असल्याचा निर्वाळा दिला आहे. हे वृत्त शेअर बाजारात गुंतवणूकदारांना सुखावून गेले. पाहणी अहवालाचे तपशील आणि मुख्य आर्थिक सल्लागार व्ही. अनंत नागेश्वरन यांच्या पत्रकार परिषदेनंतर शेअर बाजारात दोन्ही निर्देशांकांनी उच्चांकी सूर मारल्याचे आढळून आले.
वाढ कोणत्या कंपन्यांची?
निफ्टीमध्ये टाटा कंझ्युमर, ट्रेंट, भारत इलेक्ट्रॉनिक्स, नेस्ले इंडिया, एल अँड टी या कंपन्यांची सर्वाधिक वाढ झाली. तर भारती एअरटेल, आयसीआयसीआय बँक, बजाज फिनसर्व्ह, अपोलो हॉस्पिटल्स, जेएसडब्ल्यू स्टीलचे शेअर्स शुक्रवारी घसरले. विशेष म्हणजे सर्व क्षेत्रीय निर्देशांक हिरव्या रंगात बंद झाले. यांमध्ये ग्राहकोपयोगी वस्तू, तेल आणि वायू, ऊर्जा, सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या, स्थावर मालमत्ता हे निर्देशांक प्रत्येकी २ टक्क्यांनी वाढले, तर भांडवली वस्तू निर्देशांक जवळजवळ ४ टक्क्यांनी वाढले. व्यापक बाजारात खरेदीचा जोर राहिल्याने बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकही जवळजवळ प्रत्येकी २ टक्क्यांनी वाढले. (Sensex hike)