ऑकलंड : डावखुरा फिरकीपटू मिचेल सँटनरची मर्यादित षटकांच्या क्रिकेटकरिता न्यूझीलंड संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती झाली आहे. यावर्षीच्या अखेरीस श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या टी-२० व वन-डे मालिकेपासून सँटनर पूर्णवेळ कर्णधार म्हणून जबाबदारी स्वीकारेल. (Santner)
सँटनरने आतापर्यंत बदली कर्णधार म्हणून २४ टी-२० आणि चार वन-डे सामन्यांमध्ये न्यूझीलंडचे नेतृत्व केले आहे. परंतु, पूर्णवेळ कर्णधार म्हणून श्रीलंकेविरुद्धची मालिका ही त्याची पहिली असेल. पुढील वर्षी फेब्रुवारी महिन्यात होणारी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा आणि २०२६ मध्ये होणारा टी-२० वर्ल्ड कप डोळ्यांसमोर ठेवून सँटनरकडे न्यूझीलंडचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे. या वर्षी झालेल्या टी-२० वर्ल्ड कपनंतर केन विल्यमसनने न्यूझीलंडच्या टी-२० संघाच्या कर्णधारपदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला होता. “या पदावर नियुक्ती होणे हा खूप मोठा सन्मान आहे. लहान असताना मी न्यूझीलंडकडून खेळण्याचे स्वप्न पाहिले होते. परंतु, दोन प्रकारांमध्ये संघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळणे हे खूप विशेष आहे. हे नवे आव्हान स्वीकारण्यासाठी मी उत्सुक आहे,” अशी प्रतिक्रिया सँटनरने कर्णधारपदी नियुक्ती झाल्यानंतर दिली. (Santner)
न्यूझीलंडच्या कसोटी संघाच्या नेतृत्वाची धुरा टम लॅथमकडे आहे. परंतु, टी-२० व वन-डे संघाचे पूर्णवेळ कर्णधारपद सोपवून त्याच्यावरचा ताण वाढवू इच्छित नसल्याचे न्यूझीलंडचे मुख्य प्रशिक्षक गॅरी स्टीड यांनी सांगितले. (Santner)
हेही वाचा :