Home » Blog » सांगली महायुतीकडे

सांगली महायुतीकडे

भाजपला ४, राष्ट्रवादीला दोन, तर काँग्रेस, शिंदे सेनेला प्रत्येकी एक जागा

by प्रतिनिधी
0 comments
Maharashtra Government file photo

सांगली : प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला नाकारलेल्या सांगली जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीत मात्र मतदारांनी महायुतीला कल दिला. जिल्ह्यात शिराळा, मिरज, सांगली आणि जत या जागांवर भाजपने विजय मिळवला, तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला दोन आणि काँग्रेस व शिवसेना शिंदे गटाला प्रत्येकी एक जागा मिळाली.

सुरुवातीला एकाकी वाटणाऱ्या शिराळा विधानसभा मतदारसंघात भाजपचे सत्यजित देशमुख यांनी विजय मिळवला. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे मानसिंगराव नाईक यांचा या ठिकाणी पराभव झाला आहे. मानसिंगराव नाईक हे जयंत पाटील यांचे निकटवर्ती समजले जातात. त्यामुळे जयंत पाटील यांच्यासाठी ही नामुष्की समजली जात आहे. देशमुख यांनी नाईक यांची हॅटट्रिक रोखली.

मिरज विधानसभा मतदारसंघामध्ये मंत्री सुरेश खाडे यांनी विजय मिळवला. या ठिकाणी ठाकरे गटाचे तानाजी सातपुते यांनी निवडणूक लढवली होती. वंचित आणि एमआयएमनेही निवडणूक लढवली, मात्र पालकमंत्री असताना केलेल्या विकासकामांच्या जोरावर खाडे यांनी पुन्हा एकदा विजय मिळवला. खाडे यांना सुमारे ४५ हजारांची आघाडी मिळाली.

सांगली विधानसभा मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदार सुधीर गाडगीळ यांनी पुन्हा एकदा विजय मिळवत हॅटट्रिक साधली. गाडगीळ यांच्या विरोधात काँग्रेसचे पृथ्वीराज पाटील यांनी निवडणूक लढवली. त्याचबरोबर काँग्रेसमधून बंडखोरी करत जयश्री पाटील यांनी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज ठेवला, याचा परिणाम मतविभागणीमध्ये झाला आणि गाडगीळ यांची विजयाची वाट सुकर झाल्याचे या ठिकाणी पाहायला मिळाले.

इस्लामपूर- वाळवा विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना विजय मिळाला. त्यांच्याशी राष्ट्रवादी अजित पवार पक्षातून निशिकांत पाटील यांनी कडवी झुंज दिली. महायुतीतून माजी मंत्री सदाभाऊ खोत, सम्राट महाडिक, गौरव नायकवडी, आनंदराव पाटील असे सर्व घटक पक्ष आणि नेते एकत्र आल्याने जयंत पाटील यांचे मताधिक्य कमालीचे कमी झाले.

खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघातून दिवंगत आमदार अनिल बाबर यांचे चिरंजीव सुहास बाबर यांनी जिल्ह्यात सर्वाधिक मतांनी विजय मिळवला. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातून वैभव पाटील यांनी निवडणूक लढवली, तर माजी आमदार राजेंद्र देशमुख यांनी या ठिकाणी बंडखोरी केली होती. अनिल बाबर यांची सहानुभूती आणि केलेली विकासकामे यामुळे बाबर यांना मोठा विजय मिळाला.

पलूस- कडेगाव विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे नेते विश्वजित कदम हे विजयी झाले, मात्र त्यांच्या विरोधात भाजपचे संग्राम देशमुख यांनी कडवी झुंज दिल्याचे पाहायला मिळाले. विश्वजित कदम २०१९ मध्ये सुमारे पावणेदोन लाख मतांनी विजयी झाले होते, मात्र यावेळी ते १ लाख २९ हजार मतांपर्यंत खाली आले.

जतकरांचा छंद गोपीचंद

जत विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपचे गोपीचंद पडळकर यांनी विजय मिळवला. या ठिकाणी स्थानिक भूमिपुत्र विरुद्ध बाहेरील उमेदवार हा मुद्दा चर्चेचा राहिला. मात्र पडळकर यांनी प्रचाराच्या माध्यमातून हा मुद्दा खोडून काढला. या ठिकाणी काँग्रेसचे विक्रम सावंत यांनी पडळकर यांच्या विरोधात निवडणूक लढवली. भाजपमध्ये झालेल्या बंडखोरीनंतरही पडळकर यांना हा विजय मिळवता आला. देवेंद्र फडणवीस यांनी सभेवेळी पडळकर यांना दिलेल्या मंत्रिपदाच्या संधीचा उल्लेख देखील त्यांच्या विजयाला कारणीभूत ठरला.

तासगावात रोहितच दादा

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातून तासगाव- कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघामध्ये दिवंगत उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील यांनी विजय मिळवला. त्यांच्याविरोधात दोन वेळा खासदार राहिलेले संजय पाटील यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटातून निवडणूक लढवली. या ठिकाणी नवीन युवक विरुद्ध मुरब्बी राजकारणी अशी लढत झाली, ज्यामध्ये रोहित पाटील यांनी सुमारे २८ हजारपेक्षा जास्त मतांनी विजय मिळवला.

रोहित पाटलांचे बॅनर्स टाइम्स स्क्वेअरवर

रोहित आर. आर. पाटील यांचा तासगाव- कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघातून विजय निश्चित झाल्यानंतर अमेरिका, न्यूयॉर्क येथील टाइम्स स्क्वेअरवर त्यांचे बॅनर त्यांच्या मित्रपरिवाराने झळकवले. याचे फोटो आणि व्हिडिओ समाज माध्यमातून व्हायरल झाले.

  • मानसिंगराव नाईक यांच्या हॅटट्रिकला ब्रेक
  • जयंत पाटील, विश्वजित कदम यांचे मताधिक्य घटले
  • सुधीर गाडगीळ यांची हॅटट्रिक
  • गोपीचंद पडळकर विधान परिषदेतून विधानसभेत

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00