- विजय चोरमारे
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. सोमवारी रात्री भिडे यांना कुत्रा चावला. त्याची बातमी मंगळवारी सकाळी सगळीकडं व्हायरल झाली. आणि मंगळवारी संपूर्ण दिवसभर सोशल मीडियावर त्याचाच धुमाकूळ सुरू होता.(Sambhaji Bhide)
खरंतर एखाद्या वयोवृद्ध गृहस्थांना किंवा सिनिअर सिटिझनला कुत्रा चावला असेल तर ती चिंतेची गोष्ट आहे. अर्थात कुत्रा कुणालाही चावला तरी ती गंभीरच बाब असते. संभाजी भिडे यांना कुत्रा चावला हीसुद्धा दुर्दैवी बाब आहे. परंतु ज्यासंदर्भात चिंता व्यक्त करायची त्याबाबत टिंगलटवाळी केली जाते, तेव्हा त्याच्या मुळाशी जाणं आवश्यक ठरतं. संभाजी भिडे यांच्याविरोधात एवढं मोठं जनमत का आहे? त्याचं कारण म्हणजे संभाजी भिडे बहुजन समाजाच्या पोरांची डोकी फिरवण्याचं काम करतात. त्यांच्या डोक्यात हिंदू-मुस्लिम विद्वेषाचं विष भरतात असा त्यांच्यावर आक्षेप आहे. त्यांच्याकडं कुणी ब्राह्मण मुलगा गेला तर त्याला ते उच्चशिक्षण घेण्याचा सल्ला देतात. आणि बहुजन मुलगा गेला तर त्याला दुर्गामाता दौड, गडकोट मोहिमेत सहभागी होण्याचा सल्ला देतात, असं परवाच एका माहितगारांनी जाहीर कार्यक्रमात सांगितलं. भिडेंनी विद्वेषाचं विष डोक्यात भरलेली पोरं अलीकडं ठिकठिकाणी धार्मिक दंगलीमध्ये सहभागी असल्याचे पोलिसांचे आढळून आले आहे. (Sambhaji Bhide)
त्याशिवाय भिडेंनी अनेकवेळा वादग्रस्त विधाने केली आहेत. महात्मा गांधी, महात्मा जोतिबा फुले, राजा राममोहन रॉय आणि साईबाबांबद्दल वादग्रस्त विधाने केली आहेत. मनुस्मृतीचे समर्थन केले आहे. जेम्स लेनने जिजाऊ माँसाहेबांची बदनामी केली तेव्हा हे काही बोलले नाहीत. राहुल सोलापूरकर किंवा प्रशांत कोरटकर यांनी शिवरायांबाबत अपमानास्पद विधाने केली तेव्हा काही बोलले नाहीत. वाघ्या कुत्र्याच्या प्रकरणात मात्र वाघ्या कुत्र्याची बाजू घेऊन बोलले. रायगडावर ३२ मण सोन्याचं सिंहासन बसवणार होते. त्यासाठी किती मण सोनं जमलं आणि त्या एकूण प्रकल्पाचं काय झालं, याबाबत कुणी चकार शब्द काढत नाही. (Sambhaji Bhide)
- त्यांच्यासंदर्भातील वाद बघूया.
- २०२२ मध्ये एका महिला पत्रकाराने त्यांना प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांनी, तू आधी टिकली लाव, मग तुझ्याशी बोलेन, असे म्हणत त्यांनी त्या पत्रकाराशी बोलण्यास नकार दिला होता.
- भारत देशाला संभाजी भिडेंनी ‘निर्लज्ज लोकांचा देश’ म्हटले होते. परकीयांचे खरकटं आणि उष्ट खाणारे. स्वाभिमानाची शून्य, निर्लज्ज लोकांचा देश म्हणजे हिंदुस्तान. भारतातील लोकांना गुलामी, दास्याच्या नरकात राहण्याचा विषमपणा वाटत नाही. लाजही वाटत नाही. अशा बेशरम लोकांचा भारत देश आहे, असे भिडे एके प्रसंगी म्हणाले होते. (Sambhaji Bhide)
- देशाच्या स्वातंत्र्याविषयीही भिडेंनी वादग्रस्त विधान केले आहे. १५ ऑगस्ट हा आपला खरा स्वातंत्र्य दिवस नाही. उलट यादिवशी भारताची फाळणी झाली होती. त्यामुळे या दिवशी सर्वांनी उपवास करून दुखवटा पाळावा, असे वक्तव्य केले होते.
- ‘कोरोना’ ने जगभरात थैमान घातले होते. त्यावेळीही संभाजी भिडेंनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. कोरोनामुळे जे माणसे मरतात, ते जगायला लायक नाहीत. दारुची दुकाने उघडायला परवानगी आणि कुठे काही रस्त्यावर विकत आहे त्याला पोलीस काठ्या मारत आहे. काय चावटपणा चालू आहे? हा सर्व प्रकार महानालायकपणाचा आहे. तसेच कोरोना हा रोगच नाही. हा गांडू वृत्तीच्या लोकांना होणारा मानसिक रोग असल्याचे भिडे म्हणाले होते. (Sambhaji Bhide)
- ‘कोरोना’ काळात दिवसरात्र कोरोनाशी लढणाऱ्या डॉक्टरांविषयीही संभाजी भिडेंनी वादग्रस्त विधान केले होते. कोरोना काळात लोकांचा मृत्यू भीतीने झाला. डॉक्टर नालायक आहेत, ते लुटारू आहेत. डॉक्टर मारायच्या लायकीचे आहेत. त्यांच्या या विधानामुळे डॉक्टरांच्या संघटना आक्रमक झाल्या होत्या.
- लग्न होऊन आठ-आठ, दहा-दहा वर्ष झालेल्यांना पोर होत नाहीत, अशा स्त्री-पुरुषांनी आंबा खाल्ला तर त्यांना नक्कीच मुलं होतील. माझ्याकडे असे एक झाड आहे त्याचे आंबे खाल्ल्याने मुले होतात. मी आतापर्यंत १८० पेक्षा जास्त जणांना, पती-पत्नींना, जोडप्यांना हे आंबे खायला दिले आहेत. पथ्य सांगितले आणि १५० पेक्षा जास्त जणांना मुले झाली. विशेष म्हणजे ज्यांना मुलगा हवा असेल, त्यांना मुलगाच होईल. असा आंबा माझ्याकडे असल्याचे भिडे म्हणाले होते. (Sambhaji Bhide)
- महात्मा गांधी यांचे वडील हे मुस्लिम जमीनदार असल्याचे विधान संभाजी भिडेंनी अमरावती येथील एका कार्यक्रमात केले. यवतमाळ येथे त्यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी संभाजी भिडे यांनी पंडित नेहरुंवर टीका करताना, अखंड हिंदुस्थानासाठी पंडित नेहरु यांचे नखाएवढेही योगदान नसल्याचे म्हटले होते.
संभाजी भिडे हे हिंदुत्ववादी वर्तुळातले असल्यामुळे त्यांच्यावर काही कारवाई होत नाही. नरेंद्र मोदी यांनी एकदा त्यांचा गौरवपूर्ण उल्लेख केला होता. त्यामुळे नरेंद्र मोदी त्यांना गुरू मानतात असा एक गैरसमज आहे. त्यामुळे फडणवीस वगैरे कंपनी त्यांच्या प्रत्येक कृतीला संरक्षण देण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्या अनुयायांची दादागिरी सगळीकडे वाढत जाते. त्यामुळे असा चुकीच्या पद्धतीने त्यांच्याविरोधात रोष प्रकट होतो आहे. खरेतर असे बरोबर नाही. माणुसकीला धरून नाही. संभाजी भिडे आणि त्यांचे समर्थकही यापासून बोध घेऊन आपल्या वर्तनात सुधारणा करतील. आणि त्यांचे विरोधकही चुकीच्या पद्धतीने वागणार नाहीत, अशी अपेक्षा करूया.
हेही वाचा :
पाच लुटेरे…
अलाहाबाद हायकोर्टाच्या टिप्पणीवर आक्षेप