Home » Blog » Sam Pitroda : म्हणे, चीन हा काही शत्रू नाही

Sam Pitroda : म्हणे, चीन हा काही शत्रू नाही

सॅम पित्रोदा यांचे वादग्रस्त विधान; भाजपचा पलटवार

by प्रतिनिधी
0 comments
Sam Pitroda

नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे अध्यक्ष सॅम पित्रोदा पुन्हा एकदा वादग्रस्त विधानामुळे चर्चेत आले आहेत. चीन हा काही भारताचा शत्रू नाही. आपण हेतुपुरस्सर असे चित्र निर्माण केले आहे. भारताने चीनशी शत्रुत्व बाळगण्याऐवजी एकत्रित काम करण्यावर भर द्यायला हवा, असे पित्रोदा म्हणाले. (Sam Pitroda)

डोनाल्ड ट्रम्प आणि नरेंद्र मोदी यांच्या भेटीच्या पार्श्वभूमीवर एआयएनएस या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीदरम्यान पित्रोदा यांनी आपले विचार मांडले. चीनकडे ‘धोका’ म्हणून पाहण्याच्या दृष्टिकोनावर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “चीनकडून कोणता धोका आहे, हे मला समजत नाही. अमेरिकेला कोणालातरी शत्रू ठरवण्याची सवय असल्याने हा मुद्दा अवाजवीपणे वाढवण्यात आला आहे, असे मला वाटते. भारताने या शत्रुत्वाच्या मानसिकतेपासून फारकत घेत भागीदारीवर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. केवळ चीनच नाही, तर कोणत्याही देशाकडे फक्त शत्रू म्हणून पाहणे योग्य नाही. आपण संवाद, परस्परसहकार्य वाढवले पाहिजे,” असे पित्रोदा म्हणाले. (Sam Pitroda)

या विधानावरून भारतीय जनता पक्षाने पित्रोदा आणि काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला आहे. पित्रोदा हे भारताच्या सार्वभौमत्वाला कमी लेखत असून त्यांचे विधान काँग्रेसच्या चीनधार्जिण्या भूमिकेशी सुसंगत असल्याचे भाजपने म्हटले आहे. पित्रोदा यांचे विधान भारताची अस्मिता, मुत्सद्देगिरी आणि सार्वभौमत्व यांना ठेच पोहोचवणारे असल्याचे भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी म्हणाले. काँग्रेसने याप्रकरणी आपली भूमिका स्पष्ट करायला हवी, अशी मागणीही त्यांनी केली. (Sam Pitroda)

दरम्यान, पित्रोदांचे विधान हे व्यक्तिगत असून काँग्रेस पक्षाची ती भूमिका नसल्याचे सांगत काँग्रेसने याप्रकरणी हात झटकले आहेत. मोदी सरकारच्या चीनविषयीच्या भूमिकेवर काँग्रेसने सातत्याने प्रश्न उपस्थित केले आहेत. तथापि, चीनने निर्माण केलेल्या आव्हानांवर संसदेमध्ये चर्चा होण्याची संधी सरकारकडून नाकारण्यात आली, असे काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी सांगितले.

हेही वाचा :

उत्तर प्रदेश सरकारला अवमान नोटीस
दिल्लीचा मुख्यमंत्री कोण?
नवी दिल्लीला भूकंपाचे धक्के

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00