Home » Blog » Saif Ali Khan : सैफ अलीवर हल्ला करणारा बांगलादेशी, ठाण्यातून अटक

Saif Ali Khan : सैफ अलीवर हल्ला करणारा बांगलादेशी, ठाण्यातून अटक

संशयिताचे सात वर्षांपासून मुंबईत अवैधरित्या वास्तव्य; ५ दिवसाची पोलीस कोठडी

by प्रतिनिधी
0 comments
Attacker detained
  • जमीर काझी

मुंबई: अभिनेता सैफ अली खान याच्या घरात शिरून जीवघेणा हल्ला करणाऱ्याला अटक करण्यात मुंबई पोलिसांना अखेर यश आले. शनिवारी मध्यरात्री ठाण्यातील कासारवडवली येथील निर्जन झाडीत लपलेल्या संशयिताला संयुक्त शोध मोहीम राबवून त्याला पकडण्यात आले. (Saif Ali Khan)

शरीफुल इस्लाम शहजाद मो.रोहिल्ला अमीन फकीर (वय ३०, मूळ रा.ग्राम राजाबरीया, थाना नॉलसिटी जि. झलोकाठी) असे त्याचे नाव आहे. तो बांग्लादेशी असून गेल्या सात वर्षांपासून घुसखोरी करून मुंबईत राहत होता. चोरीच्या उद्देशाने त्याने सैफ अली खानच्या घरात प्रवेश केला होता, असे पोलिसांकडून सांगण्यात आले. दुपारी त्याला न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली. (Saif Ali Khan)

शहजाद हा एका कंपनीकडून हाऊस कीपिंगचे काम करत होता. त्यानिमित्ताने त्याने यापूर्वी सैफच्या घराची पाहणी केली होती. त्याला कामावर ठेवणाऱ्या पांडे नावाच्या व्यक्तीला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. (Saif Ali Khan)

सोळा जानेवारीच्या पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास त्याने वांद्रे (प) येथील सद्गुरू सदनमध्ये बाराव्या मजल्यावर राहत असलेल्या अभिनेता सैफ अलीच्या फ्लॅटमध्ये प्रवेश करुन त्याच्यावर चाकूने ६ वार केले होते. या घटनेमुळे बॉलीवूडसह राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती. ६५ तास उलटूनही त्याचा शोध घेण्यात पोलिसांना यश न आल्याने टीकेची झोड सुरू होती. त्यामुळे हल्लेखोराचा शोध घेऊन गुन्ह्याचा छडा लावण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर निर्माण झाले होते. (Saif Ali Khan)

संशयित हाऊसकीपिंगचे काम करणारा

हल्लेखोराच्या शोधासाठी ३५ पथके तयार करण्यात आली होती. अखेर फर्यादीने सांगितलेली माहिती, सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाईलच्या लोकेशनच्या आधारे तांत्रिक कौशल्याचा वापर करून त्याला पकडण्यात यश आले. तो ठाण्यातील कासारवडवली येथील लेबर कॉलनीत असल्याची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक पोलिसांसह सुमारे दोनशे पोलिसांचा फौजफाटा घेऊन शनिवारी रात्री शोध मोहीम राबवली. त्याला झाडीत लपलेल्या अवस्थेत पकडले. याबाबत रविवारी सकाळी मुंबई परिमंडळ -९चे उपायुक्त दिक्षित गेडाम यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, सैफ अली खानच्या घरात घुसून हल्ला करणारा शहजाद एका हाऊसकीपिंग फर्ममध्ये काम करत होता. घरकाम करणाऱ्या हरी याच्या मदतीने, सैफ कधीकधी घर स्वच्छ करण्यासाठी हाऊसकीपिंग फर्ममधील काही लोकांना बोलावत असे. १६ जानेवारीच्या रात्री इमारतीचा सुरक्षा रक्षक झोपलेला पाहिला तेव्हा तो इमारतीच्या अकराव्या मजल्यावर पोहोचला. आणि तिथून तो सैफ आणि करीनाच्या घरात घुसला. त्यानंतर डक्टमधून सैफ आणि करीनाच्या मुलांच्या खोलीजवळ पोहोचला. घरात प्रवेश केल्यानंतर तो बाथरूममध्ये लपला.

मिळालेल्या माहितीनुसार, हल्लेखोर शरीफुल इस्लाम शहजाद पूर्वी वरळी येथे राहत होता. घटनेच्या दिवशी तो रेल्वेने ठाण्याला गेला होता. ठाण्यात एक बाईकस्वार त्याला घ्यायला आला. बाईकच्या नंबरच्या मदतीने पोलिसांना त्याचा माग काढण्यात यश आले आणि त्यानंतर पोलिसांनी ठाण्यातील हिरानंदानी इस्टेटजवळील लेबर कॅम्पजवळील झुडपांमधून त्याला पकडले. त्याच्याकडे भारतातील वास्तव्याचे कोणतेही वैध भारतीय कागदपत्र सापडलेले नाही. त्यामुळे त्याच्याविरुद्ध अनधिकृत वास्तव्याबाबत संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.

सैफ-करिनाच्या घराबद्दल अनभिज्ञ

हल्लेखोर शहजादने चौकशी दरम्यान पोलिसांना सांगितले की, तो सैफ अली खानच्या घरात प्रवेश करत आहे हे त्याला माहित नव्हते. त्याचा हेतू फक्त चोरी करण्याचा होता आणि म्हणूनच तो घरात घुसला. अचानक सैफ अली खान त्याच्यासमोर आला आणि त्याने चाकूने हल्ला केला. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, आरोपीचा कोणताही गुन्हेगारी इतिहास नाही. मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजादबद्दल पोलिस अधिक माहिती गोळा करत आहेत. जर तो बांगलादेशी नागरिक असेल तर त्याने बेकायदेशीरपणे भारतात कसा प्रवेश केला हे शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. (Saif Ali Khan)

आरोपीचे खरे नाव आले बाहेर

पकडल्यानंतर संशयित सतत पोलिसांना दिशाभूल करत होता. तो पुन्हा पुन्हा त्याचे नाव बदलून सांगत होता. त्याने पोलिसांना त्याची चार नावे सांगितली. त्यानंतर, त्याची ओळख पटवता येईल असे कोणतेही ओळखपत्र सापडले नाही.
नेमकी घटना काय घडली होती?

१६ जानेवारीच्या पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास एका अज्ञात व्यक्तीने सैफ अली खानच्या घरात प्रवेश केला. उपस्थित असलेल्या मोलकरणीशी वाद घालण्यास सुरुवात केली. आवाज ऐकून सैफ अली खान बाहेर आला. कुटुंबाला वाचवण्याचा प्रयत्न करताना तो त्या व्यक्तीशी झटापट करू लागला. आरोपीने रागाच्या भरात अभिनेत्यावर चाकूने हल्ला केला. हल्लेखोराने सैफवर चाकूने ६ वेळा वार केल्याचे सांगण्यात येत आहे, ज्यामुळे तो गंभीर जखमी झाला.

या हल्ल्यात मुलांची आया देखील जखमी झाली. हल्लेखोर पळून गेल्यानंतर, सैफ स्वतः तैमूरला घेऊन ऑटोने मुंबईच्या लीलावती रुग्णालयात गेला. अभिनेत्याच्या मणक्याजवळ चाकूचा एक तुकडा अडकला होता, लीलावती रुग्णालयाच्या डॉक्टरांनी शस्त्रक्रियेद्वारे काढला. सैफ आता धोक्याबाहेर असून त्याला सोमवारी डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे.

हेही वाचाः
Saif Attack : अंडरवर्ल्ड कनेक्शन नाही
Saif Ali : जखमी सैफला रिक्षातून का दाखल केले?
Mumbai Unsafe : सलमान, सिद्दीकी आणि सैफ

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00