सिडनी : बॉर्डर-गावसकर ट्रॉफी मालिकेतील सिडनी येथील अखेरच्या कसोटीसाठी भारताचा कर्णधार रोहित शर्मालाच संघातून वगळण्यात येणार असल्याची चर्चा आहे. सामन्याच्या पूर्वसंध्येस झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये रोहितऐवजी प्रशिक्षक गौतम गंभीर उपस्थित राहिले. यावेळी, गंभीर यांनी अंतिम संघनिवडीबाबत मोघम उत्तर दिल्यामुळे रोहितला वगळण्यात येणार असल्याची शक्यता बळावली आहे. (Rohit Dropped)
या मालिकेतील तीन कसोटींमध्ये रोहित खेळला असून त्याला सहा डावांमध्ये मिळून केवळ ३१ धावा करता आल्या आहेत. ॲडलेड व ब्रिस्बेन येथील कसोटीत रोहित सहाव्या स्थानी फलंदाजीस आला होता. परंतु, मधल्या फळीत अपयशी ठरल्यानंतर मेलबर्न कसोटीमध्ये त्याने पुन्हा सलामीला खेळण्याचा निर्णय घेतला. यामुळे, त्याच्या कामगिरीत सुधारणा झाली नसली, तरी संघाचा समतोल मात्र बिघडला. रोहित सलामीला खेळल्याने त्याअगोदरच्या सामन्यांमध्ये सलामीला खेळलेल्या लोकेश राहुलला तिसऱ्या स्थानावर फलंदाजीस यावे लागले, तर शुभमन गिलला संघाबाहेर जावे लागले.
या पार्श्वभूमीवर सिडनी कसोटीसाठी शुभमनला पुन्हा अंतिम संघात स्थान मिळेल आणि यशस्वीसह राहुल सलामीला येईल, असे समजते. गुरुवारी झालेल्या अखेरच्या सरावसत्रामध्येही रोहितने थोडासा वेळच सराव केला. त्यामुळे रोहित सिडनी कसोटीत खेळणार नसल्याच्या शक्यतांना बळ मिळाले. मेलबर्न कसोटीत भारताचा पराभव झाल्यानंतर रोहित सिडनी कसोटीनंतर निवृत्ती पत्करेल, अशा चर्चा सुरू झाल्या होत्या. आता सिडनी कसोटीसाठी वगळल्यास मेलबर्न कसोटीच रोहितच्या कारकिर्दीतील अखेरची कसोटी ठरण्याची शक्याता आहे. (Rohit Dropped)
रोहितच्या अनुपस्थितीत उपकर्णधार जसप्रीत बुमराह भारतीय संघाचे नेतृत्व सांभाळेल. या मालिकेतील भारताचा एकमेव विजय हा बुमराहच्या नेतृत्वाखालीच मिळवलेला आहे. पर्थ येथील पहिल्या कसोटीत बुमराहने भारताचे नेतृत्व केले होते.
हेही वाचा :
- मनू भाकर, डी. गुकेश यांना मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार जाहीर
- परेराच्या शतकाने श्रीलंकेचा विजय
- बुद्धिबळपटू आर. वैशालीला ब्राँझ