प्रयागराज : पीडितने स्वत: संकट ओढवून घेतले. बलात्काराच्या कथित कृत्यासाठी ती स्वत:च जबाबदार असल्याची टिप्पणी अलाहाबाद उच्च न्यायालयाने केली. तसेच संबंधित महाविद्यालयीन युवतीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या तरुणाला जामीन मंजूर केला.(Rape accused granted bail)
पीठाने असेही म्हटले आहे की, पीडिता एमएची विद्यार्थिनी आहे. याचाच अर्थ ती एफआयआरमध्ये नमूद केलेल्या ‘तिच्या कृत्याची नैतिकता आणि महत्त्व’ समजून घेण्याइतकी सक्षम होती.
‘‘या न्यायालयाचे असे मत आहे की पीडितेचा आरोप खरा मानला तरी, तिने स्वतःच त्रासाला निमंत्रण दिले. त्यासाठी ती जबाबदार होती असा निष्कर्ष काढता येतो. पीडितेने तिच्या जबाबातही अशीच भूमिका घेतली आहे. तिच्या वैद्यकीय तपासणीत डॉक्टरांनी लैंगिक अत्याचाराबद्दल कोणतेही मत दिले नाही,’’ असे निरीक्षण न्यायाधीश संजय कुमार सिंह यांच्या खंडपीठाने नोंदवले.
खटल्याची पार्श्वभूमी अशी की, संबंधित आरोपीला पीडिता एका बारमध्ये भेटली होती. ती तिच्या मैत्रिणींसह दिल्लीतील बारमध्ये गेली होती. त्यावेळी तिने मद्यपान केले होते. मद्यपान केल्यामुळे ती नशेत होती. (Rape accused granted bail)
ती पहाटे तीन वाजेपर्यंत बारमध्ये होती. यावेळी आरोपीने तिला त्याच्या घरी घेऊन जाण्याचा आग्रह धरला. ती नशेत असल्यामुळे तिलाही आधाराची गरज होती. त्यामुळे तिने त्याच्यासोबत जाण्यास सहमती दर्शविली.
तथापि, तिने आरोप केला की, आरोपीने तिला वाटेत चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला. नोएडा येथील त्याच्या घरी नेण्याऐवजी त्याने तिला गुडगाव येथील एका नातेवाईकाच्या फ्लॅटवर नेले. तिथे त्याने तिच्यावर बलात्कार केला. (Rape accused granted bail)
या प्रकरणात जामीन मिळविण्यासाठी, आरोपीने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. सर्व आरोप खरे मानले गेले तरी ते बलात्काराचे प्रकरण नाही तर दोघांत संमतीने झालेल्या संबंधांचे प्रकरण आहे, असा दावा आरोपीच्या वकिलाने केला. तसेच आरोपी डिसेंबर २०२४ पासून तुरुंगात आहे. त्याचा कोणतेही गुन्हेगारी रेकॉर्ड नाही. त्याला जामिनावर सोडले तर तो गैरवर्तन करणार नाही. तसेच खटल्यात सर्व ते सहकार्य करेल जेणेकरून खटल्याचा निकाल लवकर लागेल.
अतिरिक्त सरकारी वकिलांनी आरोपीच्या जामीनाला विरोध केला. दोघांचे युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने आरोपीला जामीन मंजूर केला.
हेही वाचा :
केंद्रीय मंत्र्यांच्या नातीची गोळ्या झाडून हत्या