नागपूर : ध्रुव शौरी, दानिश मालेवारच्या अर्धशतकांमुळे विदर्भाने रणजी स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात मुंबईविरुद्ध पहिल्या डावामध्ये ५ बाद ३०८ धावा केल्या. दुसऱ्या उपांत्य सामन्यात केरळने गुजरातविरुद्ध पहिल्या दिवशी पहिल्या डावामध्ये ४ बाद २०६ धावांपर्यंत मजल मारली. (Ranji semi final)
गतविजेते मुंबई आणि गतउपविजेते विदर्भ या संघांमध्ये नागपूरच्या व्हीसीए स्टेडियमवर सोमवारी उपांत्य सामना सुरू झाला. नाणेफेकीचा कौल विदर्भाच्या बाजूने लागल्यानंतर त्यांनी घरच्या मैदानावर प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीवीर अथर्व तायडेला अवघ्या ४ धावांवर बाद करून रॉयस्टन डायसने विदर्भाला पहिला धक्का दिला. त्यानंतर ध्रुव शौरीने पार्थ रेखाडे व दानिश मालेवार यांच्यासोबत अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदाऱ्या रचल्या. ध्रुव १०९ चेंडूंमध्ये ९ चौकारांसह ७४ धावा करून बाद झाला. त्यानंतर, मालेवारने करुण नायरसोबत चौथ्या विकेटसाठी ७८ धावा जोडून संघाला २०० धावांचा टप्पा ओलांडून दिला. (Ranji semi final)
दानिशने १५७ चेंडूंमध्ये ७ चौकार व एका षटकारासह ७९ धावा केल्या. दानिश बाद झाल्यानंतर, यश राठोड आणि कर्णधार अक्षय वाडकर यांनी दिवसअखेरपर्यंत यशस्वीपणे किल्ला लढवून संघाची धावसंख्या तीनशेपार पोहचवली. खेळ थांबला, तेव्हा राठोड ४७, तर वाडकर १३ धावांवर खेळत होते. मुंबईकडून शिवम दुबे आणि शम्स मुलाणी यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. (Ranji semi final)
केरळ-गुजरात यांच्यातील उपांत्य सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरू आहे. केरळने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. सुरुवातीपासूनच संथ खेळ करणाऱ्या केरळने ४०.२ षटकांत ३ बाद ८६ धावा केल्या होत्या. त्यानंतर कर्णधार सचिन बेबीने जलज सक्सेनासोबत चौथ्या विकेटसाठी ७१ धावांची भागीदारी रचली. सक्सेना बाद झाल्यानंतर सचिनने मंहमद अझरुद्दीनसह संघाचे द्विशतक पूर्ण केले. दिवसअखेरीस नाबाद राहत सचिनने १९३ चेंडूंमध्ये ८ चौकारांसह ६९ धावा केल्या. अझरुद्दीन ३० धावांवर खेळत आहे.
संक्षिप्त धावफलक : विदर्भ – पहिला डाव ९० षटकांत ५ बाद ३०८ (ध्रुव शौरी ७४, दानिश मालेवार ७९, करुण नायर ४५, शिवम दुबे २-३५, शम्स मुलाणी २-४४) विरुद्ध मुंबई.
हेही वाचा :
शमी करेल भारतीय माऱ्याचे नेतृत्व