नागपूर : विदर्भ संघाने रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात केरळविरुद्ध पहिल्या डावात ३७९ धावा केल्या. त्यानंतर, गुरुवारी दिवसअखेरपर्यंत केरळच्या पहिल्या डावात ३ बाद १३१ धावा झाल्या असून विदर्भाकडे अद्याप २४८ धावांची भक्कम आघाडी आहे. (Ranji Final)
नागपूरच्या व्हीसीए स्टेडियमवर सुरू असलेल्या या सामन्यामध्ये पहिल्या दिवसअखेर विदर्भाच्या ४ बाद २५४ धावा झाल्या होत्या. पहिल्या दिवशी नाबाद राहिलेला शतकवीर दानिश मालेवार गुरुवारी २८५ चेंडूंमध्ये १५ चौकार व ३ षटकारांसह १५३ धावा करून बाद झाला. त्याची ही प्रथमश्रेणी क्रिकेटमधील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या ठरली. अकराव्या स्थानावरील नचिकेत भुतेने ३२ धावा करून संघाला पावणेचारशे धावांचा टप्पा ओलांडून दिला. केरळकडून एमडी निधीश आणि एडन ॲपल टॉम यांनी प्रत्येकी ३, तर नेदुंमनकुळी बासिलने २ विकेट घेतल्या. (Ranji Final)
उपाहारानंतर फलंदाजीस उतरलेल्या केरळला अपेक्षेप्रमाणे सुरुवात करता आली नाही. डावाच्या पहिल्याच षटकात दर्शन नळकांडेने सलामीवीर रोहन कन्नुमलचा शून्यावर त्रिफळा उडवला. तिसऱ्या षटकात नळकांडेनेच दुसरा सलामीवीर अक्षय चंद्रनला १४ धावांवर त्रिफळाचीत केले. सुरुवातीच्या या दोन धक्क्यांनंतर आदित्य सरवटे आणि अहमद इम्रान यांनी केरळचा डाव सावरला. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी ९३ धावांची भागीदारी रचून केरळचे शतक पूर्ण केले. यश ठाकूरने इम्रानला बाद करून ही जोडी फोडली. इम्रानने ८३ चेंडूंमध्ये ३ चौकारांसह ३७ धावा केल्या. त्यानंतर सरवटे आणि कर्णधार सचिन बेबी यांनी दिवसअखेरपर्यंत आणखी विकेट पडणार नाही, याची दक्षता घेतली. पूर्वाश्रमीचा विदर्भाचाच खेळाडू असणाऱ्या सरवटेने १२० चेंडूंचा सामना करत १० चौकारांसह नाबाद ६६ धावा केल्या. सचिन ७ धावांवर खेळत आहे.
संक्षिप्त धावफलक : विदर्भ – पहिला डाव १२३.१ षटकांत सर्वबाद ३७९ (दानिश मालेवार १५३, करुण नायर ८६, नचिकेत भुते ३२, एमडी निधीश ३-६१, एडन ॲपल टॉम ३-१०२) विरुद्ध केरळ – पहिला डाव ३९ षटकांत ३ बाद १३१ (आदित्य सरवटे खेळत आहे ६६, अहमद इम्रान ३७, सचिन बेबी खेळत आहे ७, दर्शन नळकांडे २-२२, यश ठाकूर १-४५).
हेही वाचा :
पाकिस्तान-बांगलादेश सामना पाण्यात
केविन पीटरसन ‘दिल्ली कॅपिटल्स’चे ‘मेंटॉर’